स्नेह भोजनासोबत राजकीय चर्चा झाल्याच्या शंकेने नाशिकच्या राजकारणात खळबळ
नाशिक (प्रतिनिधी) – लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्याने निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापू लागले आहे त्यातच भारतीय जनता पक्षाचे विचार कुंभ म्हणून ओळखले जाणारे तसेच महाराष्ट्रात भाजपची व्यूह रचना तयार करून निवडणूक नीती निश्चित करणाऱ्या समितीचे सर्वेसर्वा आ. श्रीकांत भारतीय यांनी नाशिक दौऱ्यावर येत ऍड शिवाजी सहाणे यांच्या घरी भेट देत त्यांच्या सोबत स्नेह भोजन घेतल्याने नाशिक जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आले आहे.
ऍड शिवाजी सहाणे यांनी या आधी दोन वेळा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. पहिल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे भुजबळ समर्थक जयंत जाधव यांच्याशी निकराची झुंज दिली होती. यावेळी तांत्रिक त्रुटीच्या कारणास्तव प्रशासनाने जयंत जाधव यांना विजयी घोषित केले होते. त्या निकालाला सहाणे यांनी उच्च न्यायालयात आव्हानही दिले होते. त्यात सहाणे यांची सरशी होऊन उच्च न्यायालयाने सहाणे यांना विजयी घोषित केले होते. तथापी त्यावर प्रती पक्षाने सन २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र हा निकाल येई पर्यंत विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ संपल्याने तो खटला रद्दबातल ठरला.त्यानंतरच्या निवडणुकीत देखील चुरशीची लढत देऊन विजय टप्यात आणला होता. त्यावेळी त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला.
ऍड सहाणे हे निष्कलंक व उच्च शिक्षित, सर्व समाजात जनसंपर्क असलेले म्हणून राजकारणात ओळखले जात असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यासाठी काही राजकीय पक्षांत खलबते सुरु असतानाच आ. श्रीकांत भारतीय यांनी नाशिक दौऱ्यात नियोजित भेट नसतांना अचानक ऍड सहाणे यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन स्नेह भोजन घेतल्याने अनेक राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या भेटीत काय चर्चा झाली याविषयी अधिकृत माहिती हाती आली नसली तरी या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.