Monday, July 15, 2024
Homeमहत्वाची बातमीUnseasonal Rain : 'मिचाँग' चक्रीवादळाचा धोका; शेतकर्‍याला पुन्हा एकदा अवकाळीची चिंता...

Unseasonal Rain : ‘मिचाँग’ चक्रीवादळाचा धोका; शेतकर्‍याला पुन्हा एकदा अवकाळीची चिंता…

कुठे होणार अवकाळी पाऊस? मुंबईवर नेमका काय परिणाम होणार?

मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यभरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) मुंबईला फायदा झालेला असला तरी राज्यभरात इतरत्र मात्र बळीराजाचे (Farmers) प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. टरारुन आलेली पिके पाण्यामुळे वाहून गेली, तसेच त्यांच्यावर रोग पडल्याने शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय आता आणखी एक नवे संकट बळीराजासमोर उभे ठाकले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आणि वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात पुढील २४ तासांत काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार डिसेंबर महिन्यातही अवकाळी पावसाची हजेरी कायम राहणार आहे. तसेच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं लवकरच चक्रीवादळात (Cyclone) रुपांतर होण्याची शक्यता आहे. या दोन्ही गोष्टींमुळे राज्यासह देशाच्या तापमानावर परिणाम होणार आहे. तर दुसरीकडे पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुढील २४ तासांत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती या भागात वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता असल्याने या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

‘मिचाँग’ चक्रीवादळाचा धोका

दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ‘मिचाँग’ (Cyclone Michaung) चक्रीवादळाचा धोका आहे. हे संभाव्य वादळ देशाच्या दक्षिण भागात धडकणार असले तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार आहे. चक्रीवादळ मिचाँग सोमवारी पहाटे पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. उत्तर तामिळनाडू आणि शेजारील दक्षिण आंध्र प्रदेशातील किनारपट्टी जिल्हे सर्वाधिक प्रभावित होऊ शकतात. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) अद्याप हे वादळ नेमके कोठे धडकेल हे सांगितलेले नाही.

मुंबईवर काय परिणाम होणार?

मुंबईच्या वातावरणात सध्या गारवा जाणवत आहे. या महिन्यात थंडी वाढणार आहे. यंदाच्या हंगामात पहिल्यांदा मुंबईत किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्या खाली गेलं आहे. पुढील चार ते पाच दिवस मुंबईत थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तरेकडील वाऱ्यांमुळे मुंबईच्या तापमानात घट झाली असून, पुढील काही दिवस ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातही तापमान १५ अंशांच्या खाली गेलं आहे. अवकाळी पावसामुळे राज्याच्या विविध भागात तापमानात घट होईल.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात मिचॉन्ग चक्रीवादळ तयार झाल्यामुळे मुंबई आणि उपनगरातील तापमानात पुन्हा वाढ होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -