वर्षा निवासस्थानी झाली भेट
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियावर फोटोज पोस्ट करत या भेटीसंदर्भात माहिती दिली आहे. या भेटीची दोन कारणे समोर आली आहेत. पहिलं म्हणजे सध्याचा मराठी पाट्यांचा (Marathi Boards) धगधगता मुद्दा आणि दुसरं म्हणजे काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेला टोलनाक्यांचा (Toll naka) प्रश्न. यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी राज ठाकरे वर्षा बंगल्यावर गेले होते. मनसे आमदार राजू पाटील देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते.
सध्या राज्यात मराठी पाट्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनसेने केलेल्या आंदोलनामुळेच महाराष्ट्रात दुकानांवर मराठी पाट्या लावाव्यात, असा आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिला होता. मात्र, त्याची २५ नोव्हेंबर ही मुदत संपून आठवडा उलटल्यानंतरही काही दुकानांवर मराठी पाट्या लागलेल्या नाहीत. याबाबत मनसेने आक्रमक पावित्रा घेतला आहे. प्रशासनाडून मुख्यत: मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) कारवाई केली जात आहे. मात्र, ही कारवाई थातूर-मातूर असल्याचा आरोप मनसैनिकांचा आहे. त्यामुळे मनसेकडून ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. याबाबत आजच्या भेटीमध्ये चर्चा करण्यात आली.
तर दुसरा मुद्दा म्हणजे काही दिवसांपूर्वी तापलेला टोलनाक्यांचा प्रश्न (Toll Naka). जितका टोल आकारला जातो तितक्या सुविधा मिळत नाहीत, तसेच हा टोल अवाजवी असल्याचा मनसेचा आरोप होता. यासाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. मुंबईच्या एन्ट्री पॉईंट्ससंदर्भात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबतही बैठक पार पडली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना काही आश्वासनं दिली होती. त्या आश्वासनांच्या पूर्ततेसंदर्भात आजच्या भेटीत चर्चा करण्यात आली.
या भेटीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ”महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी येऊन माझी भेट घेतली. या भेटीत राज्यातील टोल नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी आणि दंडात्मक कारवाईबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते.”