दोन कोटी दहा लक्ष रूपयांचा मुद्देमाल जप्त
नाशिक : नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील गुटखा व्यवसायास पायबंद घालण्यासाठी यापूर्वी चार अभियान राबविली होती. दिनांक ६/११/२०२३ पासून जिल्ह्यातील गुटखा व्यवसाय नेस्तनाबूत करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांनी गुटखा विरोधी अभियान ५ सुरू केले होते.
दिनांक ६/११/२०२३ ते दिनांक ३०/११/२०२३ या कालावधीत नाशिक ग्रामीण पोलीसांनी गुटखा विरोधी ९३ कारवाया करून ९९ आरोपीना भारतीय दंड संहितेच्या कलम ३२८ खाली अटक केली आहे. सदर कारवायात एकूण ९८ लक्ष ७८ हजार २०४ रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. सदर मोहिमेदरम्यान विशेष पथकाने केलेल्या कारवाईत, परराज्यातील एका आयशर ट्रकमध्ये चांदवड शहरातून मुंबई आग्रा महामार्गाने मुंबईच्या दिशेने घेवून जात असलेला ५० लाखांचा अवैध गुटखा पकडण्यात आला होता. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून सुमारे ७० लाख ८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
गुटखा व्यवसायाबरोबरच जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय बंद व्हावेत या दृष्टीकोनातून नाशिक ग्रामीण पोलीसांनी याच कालावधीत वेगवेगळ्या सदराखाली एकूण ५५६ ठिकाणी छापे मारून सर्वच प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कारवाई केली आहे. यात गुटखा कारवाईच्या ९३ केसेससह मुंबई दारूबंदी कायद्याखाली ३४३, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली ८७, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाखाली १९, जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली १०, अंमली पदार्थ विरोधी कायद्याखाली ४ कारवायांचा समावेश असून, यात एकूण ७५४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एकूण २ कोटी १० लक्ष रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच जिल्ह्यातील अपघात कमी होण्याच्या दृष्टिकोनातून, नाशिक ग्रामीण घटकातील वाहतूक पोलीसांनी अवैध प्रवासी वाहतूक व वाहनांच्या कागदपत्रांच्या तपासणीची मोहीम हाती घेतली होती. दिनांक ०१/११/२०२३ रोजी पासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या एकूण ४,४४२ वाहन चालकांविरुद्ध कारवाई करून त्यांच्याकडून ३१,३३,८५०/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्हयातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार करण्यासाठी अशा व्यवसायांची माहिती पोलीसांपर्यंत पोहोचावी, या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीसांनी खबर ही हेल्पलाईन सुरू केली असून, नागरिकांनी ६२६२ २५ ६३६३ या हेल्पलाईनवर संपर्क साधून आपल्या परिसरात चालणा-या अवैध व्यवसायांची माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.