
सबसे कातील गौतमी पाटीलचा पहिलाच चित्रपट
मुंबई : सबसे कातील गौतमी पाटीलची (Gautami Patil) तरुणांमध्ये भलतीच क्रेझ आहे. तिच्या नृत्य अदाकारींवर भले भले राजकारणी पण ठेका धरतात. तिच्या कार्यक्रमात तोडफोड, राडा हे तर ठरलेलं असतं. आपल्या लावणीने गौतमी पाटीलने अनेकजणांना भुरळ पाडली आहे. आता मात्र गौतमी कार्यक्रम नव्हे तर तिचा थेट नवा चित्रपट भेटीला येणार असल्याने चर्चेत आली आहे. गौतमी पाटीलचा पहिलावहिला चित्रपट 'घुंगरु' (Ghungroo) येत्या १५ डिसेंबरला प्रदर्शित (Release) होणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर (Poster) आऊट झालं आहे.
गौतमी पाटीलने घुंगरू या सिनेमात लावणी कलावंताची मुख्य भूमिका निभावली आहे. अभिनय करण्याची तिची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावरील तिची अदाकारी पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. तर आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमाची गौतमीलाही उत्सुकता आहे. गौतमीने आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून हा सिनेमा पूर्ण केला आहे. काही दिवसांपूर्वीच हा सिनेमा प्रदर्शित होणार होता, मात्र राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. आता १५ डिसेंबर या तारखेला सिनेमाचं प्रदर्शन होणार आहे.
गौतमीचा 'घुंगरु' हा सिनेमा लोककलावंतांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा आहे. त्यामुळे गौतमीसाठी नक्कीच हा सिनेमा खूप खास असेल. या सिनेमात लव्हस्टोरी, लोककलावंतांचं आयुष्य, त्यांचा संघर्ष, रहस्य अशा सर्वच गोष्टी पाहायला मिळणार आहेत. बाबा गायकवाड (Baba Gaikwad) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. महत्त्वाचं म्हणजे बाबा गायकवाड यांनीच या सिनेमाची कथा, पटकथा लिहिली आहे. तसेच तेच या सिनेमाचे निर्माते आहेत.
'घुंगरु' या सिनेमात गौतमी पाटील आणि बाबा गायकवाड मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच सुदाम केंद्रे, उषा चव्हाण, वैभव गोरे, शीतल गीते हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सोलापूर, माढा आणि हंपीसह परदेशात या सिनेमाचं शूटिंग झालं आहे. दरम्यान, आज या सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर लॉन्चिंग होणार आहे. पण यासाठी गौतमी उपस्थित राहू शकणार नाही. निर्माते बाबा गायकवाड यांच्या हस्ते या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात येईल.