रात्री उशिरा आणि पहाटेच्या रेल्वेच्या वेळांवर होणार परिणाम
कर्जत : मध्य रेल्वेच्या (Central railway) उल्हासनगर (Ulhasnagar) स्थानकाजवळ पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी कल्याण ते अंबरनाथ (Kalyan To Ambernath) स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर रात्रीचा विशेष वाहतूक ब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. शनिवार-रविवारी मध्य रात्री १.२० वाजल्यापासून ते पहाटे ३.२० वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकल सेवांच्या वेळेत बदल करण्यात येणार आहेत.
सीएसएमटी (CSMT) येथून रात्री ११.५१ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल आणि अंबरनाथ येथून रात्री १०.०१ आणि १०.१५ वाजता सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी येथून मध्य रात्री १२.०४ वाजता अंबरनाथसाठी सुटणारी लोकल कुर्ला स्थानकापर्यंत तर रात्री १२.२४ वाजता कर्जतसाठी सुटणारी लोकल ठाणे स्थानकापर्यंत चालविण्यात येईल. कर्जत येथून रात्री २.३३ वाजता सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल कर्जतऐवजी ठाणे येथून पहाटे ४.०४ वाजता सुटेल.
ब्लॉकपूर्वीची सीएसएमटी येथून कर्जतसाठी शेवटची लोकल रात्री ११.३० वाजता सुटेल. तर ब्लॉकपूर्वीची खोपोली येथून सीएसएमटीसाठी शेवटची लोकल १०.१५ वाजता सुटेल. सीएसएमटी येथून ब्लॉकनंतर कर्जतकरिता पहिली लोकल सीएसएमटी येथून पहाटे ४.४७ वाजता सुटेल. कर्जत येथून सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल कर्जत येथून पहाटे ०३.४० वाजता सुटेल. ब्लॉक कालावधीत कल्याण आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान सर्व अप आणि डाऊन मार्गावर गाड्या थांबणार नाहीत.