मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नाशिकमधील दुकानदारांचा सवाल
नाशिक : मनसेने मुंबईसह महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी आपल्या व्यवसायाच्या, दुकानाच्या, कार्यालयाच्या नावाच्या पाट्या मराठी भाषेतच लावाव्यात असे आवाहन यापूर्वी केले आहे. ज्यांनी हे आवाहन धुडकावून लावले त्या व्यवसायिकांविरुद्ध मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. दुकानांच्या इंग्रजी पाट्यांना काळे फासत आहेत. नाशिक शहरात देखील हे आंदोलन सुरु असून शहराच्या विविध भागात फिरून जिथे इंग्रजी किंवा अन्य भाषेत दुकानाचे फलक दिसतील तिथे मराठी मनसे असे काळ्या शाहीने लिहून पुढील दुकान शोधले जात आहे. यावर मनसेने पुन्हा एकदा मराठी भाषेत पाट्यांचा मुद्दा हाती घेऊन निवडणुकीपूर्वी मराठी भाषेची अस्मिता जागृत करण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्याकडे विदेशी जातीचे श्वान आहेत, त्यांचे नाव ते मराठीत कधी करणार? असा सवाल नाशिकमधील दुकानदार मनसे कार्यकर्त्यांना विचारत आहेत.
राज ठाकरे यांची मनसे महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरित आहे. व्यवसायाच्या पाट्या मराठी भाषेत लावाव्यात यासाठी आंदोलनही सुरु आहे. या आंदोलनाचे मराठी माणसाकडून स्वागत होत असले तरी मराठी भाषेच्या उत्थानासाठी, मराठी शाळांचा घसरलेला दर्जा उंचावण्यासाठी, इंग्लिश मिडीयम ऐवजी मराठी मुलांना मराठी शाळेत दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी, मराठी भाषेतील साहित्य अधिक वाचकांपर्यंत पोहचावे यासाठी राज ठाकरे किंवा मनसेने कुठला ठोस कृती कार्यक्रम राबविला, त्याची ब्लु प्रिंट तयार करून पक्ष पातळीवर कुठली अंमलबजावणी केली? असे सवाल मराठी माणूस विचारू लागला आहे. त्याही पलीकडे जाऊन राज ठाकरे यांच्याकडे विदेशी ब्रिडर जातीचे दोन श्वान होते. त्यांची नावे जेम्स आणि बॉण्ड अशी होती. त्यापैकी बॉण्ड दोन वर्षापूर्वी आणि जेम्स याचा २०१८ मध्ये मृत्यू झाला. मात्र आजही त्यांच्याकडे आणखी चार कुत्री पाळलेली आहेत. त्यांची नावे ते कधी बदलणार? असाही सवाल विचारला जात आहे.
दरम्यान, आजही नाशिकमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी दुकानांच्या इंग्रजी पाट्यांना काळे फासले. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक भाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, मनसे कामगार सेना प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाताई डेरे, मनोज घोडके, नामदेव पाटील, अमित गांगुर्डे, संजय देवरे, मिलिंद कांबळे, उपशहराध्यक्ष सचिन सिन्हा, संतोष कोरडे, विजय आहेरे, अक्षय खांडरे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, भाऊसाहेब निमसे, साहेबराव खर्जुन, धीरज भोसले, बंटी लबडे, नितीन माळी, प्रमोद साखरे, अर्जुन वेताळ, निकितेश धाकराव, निलेश शहाणे, देवचंद केदारे, विजय ठाकरे, निखिल सरपोतदार, राकेश परदेशी, किरण सिरसागर, ज्ञानेश्वर बगडे, महिला सेना जिल्हाध्यक्ष ज्योतीताई शिंदे, शहराध्यक्ष आरती खिराडकर, अरुणाताई पाटील, स्वागताताई उपासने, अक्षरा घोडके, मीराताई आवारे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कौशल बापू पाटील, शहराध्यक्षा ललित वाघ, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष रोहन जगताप, जनहित विधी जिल्हाध्यक्ष प्रफुल बनबैरू, शहराध्यक्ष सौरभ खैरनार, नितीन पंडित, शाम गोहाड, संदेश जगताप शंकर कनकुसे, मनोज सोनवणे, गणेश जोमान, विशाल भावले, गोकुळ नागरे, भूषण शिरसाट, सचिन रोजेकर, मनोज सावंत, रोनी पवार, अजिंक्य पारक, नितीन अहिरराव, अमोल निसळ, योगेश दाभाडे, साई गुंजाळ, किरण पवार, संदिप मालोकर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.