माझे कोकण: संतोष वायंगणकर
जगभरात पर्यटन या एकाच व्यवसायाने आर्थिक समृद्धी आणली आहे. यामुळे जगातील अनेक देश हे पर्यटन व्यवसायावर भर देताना दिसत आहेत. जगभरातील पर्यटक कोकणच्या शेजारी असलेल्या गोवा राज्यात गेल्यामुळे अनेक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर जगभरातील पर्यटक येतात. १९९७ मध्ये कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंढे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. सिंधुदुर्ग हा देशातील पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला पहिला जिल्हा होता.
गेल्या २६ वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठी आहे. मात्र, राज्य सरकारने नंतरच्या काळात कोकणातील पर्यटन व्यवसायाकडे दुर्लक्षच केलं आहे. ज्या पायाभूत सुविधा कोकणातील पर्यटनस्थळांवर निर्माण करणे आवश्यक होते, त्या पायाभूत सुविधा अद्यापही निर्माण केलेल्या नाहीत. गोवा राज्यातील समुद्र किनाऱ्यांपेक्षाही सर्वांग सुंदर, स्वच्छ समुद्र किनारे कोकणामध्ये आहेत. महाराष्ट्रात पर्यटन विकास महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे; परंतु या पर्यटन महामंडळाच काम नेमकेपणाने कसं आणि कुठून चालतं हेच कुणालाही माहिती नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन महामंडळाचे कार्यालय आहे. तेही नावापुरतेच आहे.
महाराष्ट्रात सरकार बदलले, मंत्री बदलले की निर्णय बदलतात. आश्वासन आणि घोषणांमध्ये कोकणातील पर्यटन झोके घेतंय. कोकणातील पर्यटन व्यवसाय आज बहरतोय; परंतु त्यासाठी आणखी प्रयत्नांची आवश्यकता आहे. निवास न्याहारीसारख्या पर्यटनातील व्यवसायाने अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाहाचेच नव्हे तर आर्थिक समृद्धीचे साधन बनले आहे. कोकणात पंचतारांकित हॉटेल प्रकल्पांची संख्याही फार कमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचतारांकित प्रकल्पातही गेली पंचवीस वर्षे खोडा घालण्याचाच प्रकार आहे. रोजगार निर्मितीसाठी कोणी काही करणार नाही; परंतु एखादा प्रकल्प होतोय असं सूतोवाच जरी झालं तरीही विरोध सुरू होतो. पर्यटनातील पंचतारांकित प्रकल्पांना विरोध, कोणताही नवीन प्रकल्प सिंधुदुर्गात येतोय ना मग लगेच तो प्रकल्प कोकणासाठी योग्य नाही. यासाठी गळा काढणाऱ्यांची संख्या कमी नाही. पर्यटन जिल्हा जाहीर झाला तेव्हाही विरोध झालाच. तेव्हाचा विरोध कशाला तर म्हणे पंचतारांकित संस्कृतीने कोकण बिघडले.
कोकणातील कुटुंब संस्थेचे संस्कार एवढे बेगडी आहेत का? कोकणात विरोध करणाऱ्यांना आणि विरोधांसाठी काहीही कारण पुरेसे ठरते. कोकणात येणाऱ्या प्रकल्पांसंबंधी संबंधित प्रशासनातील अधिकारी, प्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून परिपूर्ण माहिती जनतेसमोर ठेवण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच वेळा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना जनतेला गृहीत धरले जाते. यातूनच संभ्रमावस्था, संभ्रमाचे वातावरण तयार होते. यात विरोध करण्यासाठी कोकणात कमी नाहीत. त्यातलं काही कळलं, समजलं नाही तरीही विरोधासाठी ठाम असतात. आतापर्यंतचे नुकसान हे असंच झालेलं आहे. एखादा प्रकल्प कोकणात जाहीर झाला की त्याचे फायदे-तोटे याचं विश्लेषण कोण करणार नाही. पर्यावरणाची हानी होणार या एका वाक्यात सर्वांची वासलात लावून आपण मोकळे होतो. बरं त्यापुढचं म्हणजे जे कोणी विरोध करतात त्यांच्याकडून हा नको तर काय हवंय. यावर कधी भाष्य होत नाही.
जेव्हा आपण नको म्हणतो तेव्हा दुसरं चांगलं काही आणण्याची, सांगण्याची जबाबदारी आपलीच असायला हवी ना! नाहीतर विरोध काय ज्यांना काहीच करायचं नाही ते फक्त विरोधच करतायत ना. शिरोडा-वेळागरमध्ये त्या सर्व्हे नंबर ३९ चा प्रश्न आहे. पूर्वीही होता! त्या सर्व्हेनंबर विषय हा राजकीय बनविला गेला. अन्याय-अन्याय म्हणून हाकाटी पिटली गेली; परंतु त्यावर चर्चा करून मार्ग काढण्याचा कोणीच प्रयत्न केला नाही. ज्या शेतकऱ्यांचं नुकसान होत होते त्या शेतकऱ्यांनी विरोधाची भूमिका घ्यावी म्हणून जे त्या प्रकल्पा आडून राजकारण करत राहिले. आजही या प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या सुख-दु:खाशी कोणाला काहीही पडलेलं नाही. फक्त कोणीतरी एकाने बाजू घेतली तर दुसऱ्याने विरोध करायचा हे असंच सुरू आहे.
विकासावर बोलायचे झालं तर विकास होणारच, तो थांबत नाही. मात्र विरोधाने विकासाची गती थांबते, मंदावते. जे पाच वर्षांत होणार आहे ते पन्नास वर्षांत होतं. पाच वर्ष आणि पन्नास वर्षे हा जो काही फरक यामध्ये जे नुकसान, हानी होते ती पुढे कधीही भरून येत नाही. कालावधी किती वाढतो हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे; परंतु त्याचा कधीच विचार होताना दिसत नाही. काहींचा विरोध हा प्रसिद्धी स्टंट असतो. त्या विरोधाला काही अर्थ नसतो. आता सामान्य माणसानाही कळतं. विरोध करणारे कशासाठी विरोध करतात. विरोध करणाऱ्यांचा नेमका हेतू काय आहे हे समजतं. समजत नसतं असंही नाही. काही वेळा कशासाठी आणि का विरोध होतोय हे विरोध करणाऱ्यांनाही सांगता येत नसतं.
‘आमची वाट लागात’ या एका वाक्यासाठी विरोध होत राहातो. पर्यटन प्रकल्पांना झालेल्या विरोधामागे कोणती कारणं होती. पर्यटनातूनच कोकणचा विकास होणार असेल तर त्यासोबत येणाऱ्या अनेक गोष्टी आपण स्वीकारायलाच हव्यात; परंतु आपली तीच मानसिकता नसते. येणारा पर्यटक पर्यटनासाठी येणार. तो त्याचा वैयक्तिक कुटुंबासह, मित्रांसह आनंद घ्यायला येणार असेल तर सर्वच आपणच बंधन घालणार असू तर कोण कशाला पर्यटनासाठी आपल्याकडे येणार? अमली पदार्थ सेवन करणार पर्यटन कोकणात नको. इथपर्यंत सर्व ठीक आहे. पर्यटक कोकणात वाढल्याशिवाय पर्यटनातून येणारी आर्थिक समृद्धी कोकणात वाढू शकणार नाही. यासाठी पर्यटनवाढीसाठी आपणच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.