Monday, February 17, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखकाळ रात्र होता होता झाला उष:काल

काळ रात्र होता होता झाला उष:काल

संपूर्ण देश दिवाळीसारखा मोठा आणि आनंद द्विगुणित करणारा सण साजरा करीत असतानाच १२ नोव्हेंबरची पहाट, सूर्य नुकताच वर येत होता, हाडे गोठवणाऱ्या थंडीत उत्तरकाशीत कामगार बोगदा खणण्याचे काम करत होते. मात्र त्याचवेळी बोगद्याचा काही भाग कोसळला आणि अवाढव्य बोगदा निर्माण करणारे शिल्पकार त्यात अडकले. या कामगारांच्या सुटकेसाठी संपूर्ण देश आतुर झाला होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी उत्तराखंडमधील सिलक्यारा चारधाम यात्रेच्या मार्गावरील निर्माणाधीन बोगद्याचा काही भाग कोसळला आणि तब्बल ४१ मजूर बोगद्यात अडकून पडले व त्यांच्यासमोर अंध:कार पसरला. आपल्या देशबांधवांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या उत्तराखंडमधील चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा ते बारकोट या पाच किलोमीटरच्या बोगद्याचे काम करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत होते. पण बांधकाममधीन असलेल्या या बोगद्याच्या सिलक्यारा दिशेकडील सुमारे ६० मीटरचा भाग अचानक खचल्याने ४१ कामगार अडकले. बोगद्याच्या बांधून तयार असलेल्या दोन किलोमीटर भागात हे कामगार अडकून पडले होते.

१२ नोव्हेंबरला पहाटे सिलक्यारा ते बारकोटदरम्यान बोगद्यात भूस्खलन झाल्याने त्यात मजूर आत अडकले. बोगद्यात २६० ते २६५ मीटर आत मातीच्या ढिगाऱ्यापलीकडे अडकलेल्या मजुरांना बाहेर काढणे उत्तराखंड सरकारसमोर एक मोठे आव्हान होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा मजुरांना बाहेर काढण्याच्या कामात गुंतल्या. बचावकार्यात भारतीय लष्कराची मदत घेण्यात आली. यासाठी इंजिनीअर रेजिमेंटचे ३० जवान घटनास्थळी उपस्थित होते. पाइपच्या माध्यमातून त्यांना प्राणवायू आणि खाद्यपदार्थ पाठवणे सुरू ठेवले होते. वॉकी-टॉकीच्या माध्यमातून मजुरांशी संपर्कही साधण्यात आला होता. बोगद्यात अडकलेले मजूर सिलक्याराच्या बाजूने आत गेले होते. ज्या बोगद्यात ते अडकले होते, त्यात हालचाल करण्यासाठी जवळपास दोन किलोमीटरचा भाग उपलब्ध होता. त्यामुळे मजुरांची घुसमट वगैरे झाली नाही. तसेच विजेचे दिवे असल्यामुळे वावरही सुलभ राहिला. मजुरांना वेळ घालवण्यासाठी आणि गुंतून राहण्यासाठी लुडो, पत्ते आणि बुद्धिबळ आदी खेळ बोगद्यात पाठवण्यात आले होते. मजुरांना तणावमुक्त ठेवण्यासाठी त्यांना योगासने करण्याचा सल्ला देण्यात आला होता. सरकारने मजुरांकडे मोबाइल फोनही पाठवले होते, जेणेकरून हे आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहू शकतील.

या ४१ कामगारांना तब्बल १७ दिवसांनी बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले आहे. बोगद्यात दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ अडकलेल्या ४१ मजुरांची अखेर महत्प्रयासानंतर सुखरूप सुटका करण्यात आली. बचाव पथकांनी मंगळवारी या मजुरांना बोगद्यातून बाहेर काढले. विविध यंत्रणांचा सहभाग असलेल्या या बचावकार्याची रात्रीच्या सुमारास यशस्वी सांगता झाली. बोगद्यातील ढिगाऱ्यात खोदकाम करण्यासाठी ऑगर मशीन मागवण्यात आले होते; परंतु हे मशीन सातत्याने नादुरुस्त ठरत होते. अखेर हे मशीन निकामी झाले. त्यामुळे, यंत्राची मदत न घेता कामगारांमार्फत खोदकाम करण्याबरोबरच अन्य पर्यायांचा विचार सुरू झाला. मोहिमेच्या अंतिम टप्प्यात ‘रॅट होल मायनिंग’ तंत्राचा वापर करून मजुरांपर्यंत पोहोचणे शक्य झाले. विज्ञानानेही हात टेकल्यानंतर ड्रिलिंग तज्ज्ञांनीही देवाचा धावा केला.

मजुरांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणांना तब्बल ६० मीटरपर्यंत खोदकाम करावे लागले. या खोदकामासाठी अमेरिकेहून ऑगर मशीन मागवण्यात आली. तसेच दिल्लीतले तज्ज्ञ बोलावण्यात आले होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाहून बोगद्याच्या कामातले तज्ज्ञ अर्नाल्ड डिक्स यांनादेखील बोलावले होते. मजुरांची सुखरूप सुटका झाल्यानंतर अर्नाल्ड डिक्स यांचेही कौतुक होत आहे. कारण, मजुरांना बाहेर काढण्यात डिक्स यांचे देखील मोठे योगदान आहे. डिक्स यांनी हे मजूर नाताळपर्यंत बाहेर येतील. कोणालाही कसलीही दुखापत होणार नाही, असे ठामपणे सांगितले होते व ते त्यांनी खरे करून दाखविले. एक टीम म्हणून भारतातील यंत्रणा, त्यांचे अभियंते, कर्मचारी अहोरात्र झटत होते.

गेल्या १७ दिवसांपासून हे मजूर बोगद्यात अडकले होते. त्यांनी सूर्याची किरणेही पाहिली नाहीत. पाइपद्वारे त्यांना जेवढे अन्न-धान्य, पाणी आणि ऑक्सिजन पुरवला जात होता, त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह होत होता. त्यामुळे त्यांच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न सुरू होते आणि देशभरातून प्रार्थना केल्या जात होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्याशी फोनद्वारे सतत संपर्क ठेवला होता. या बचाव कार्यात व कामगारांच्या सुटकेसाठी देशभरातील विविध यंत्रणा उत्तराखंडमध्ये एकवटल्या होत्या. त्यात नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन, नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस, वेस्टर्न कोल फिल्ड लि.सह विविध एजन्सी सहभागी झाल्या होत्या.

बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यासाठी बोगद्याबाहेरच जवळपास ४० रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या होत्या. सर्व कामगारांची प्रकृती उत्तम आहे. कामगार बोगद्यात अडकल्यापासून सातत्याने त्यांच्या बचावासाठी प्रयत्न सुरू होते. कामगार बाहेर येताच स्थानिकांनी आणि अनेक ठिकाणी मिठाईचे वाटप करण्यात आले व जणू दिवाळीच साजरी झाली. अनेक यंत्रणांनी केलेले हे संघटित प्रयत्न आहेत. गेल्या काही वर्षांतील महत्त्वाच्या बचावकार्यापैकी हे फार मोठे महत्त्वाचे यशस्वी बचावकार्य ठरले. विविध विभाग आणि प्रत्येत यंत्रणांनी एकमेकांना पूरक सहकार्य केले. इतर अनेक आव्हानांना तोंड देत असतानाही सर्वांच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे संपूर्ण ऑपरेशनचे वैयक्तिकरीत्या निरीक्षण केले आणि बोगद्यात अडकलेल्या आमच्या कामगार बांधवांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सर्व शक्य संसाधने उपलब्ध करून दिली, त्यावरून त्यांची संवेदनशीलता दिसून येते. या ऑपरेशनसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आणि सहकार्य देण्याचे आश्वासनही मोदींनी दिले होते. त्यामुळेच, कामगार बाहेर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याही नावाचा जयघोष करण्यात आला. एकूणच मृत्यूच्या कराळ दाढेतून सुखरूप बाहेर आल्याने मजुरांच्या आयुष्यात ‘काळ रात्र होता होता, झाला उष:काल’ अशी स्थिती निर्माण झाली असेच म्हणायला हवे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -