
शनिशिंगणापुर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचे आज सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने झापवाडी (ता. नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला यावेळी उपस्थित होते.
महामहिम राष्ट्रपतींनी शनी शिंगणापूर (Shani Shingnapur) येथे शनी देवाच्या शिळेवर तेल अर्पण करून पूजा केली. यावेळी राज्यपालही उपस्थित होते.
राष्ट्रपतींचे श्री शनैश्वर मंदिरात आगमन झाल्यावर त्यांनी उदासी महाराज मठात त्यांनी अभिषेक करत चौथ-यावर जाऊन शनीदेवाच्या मूर्तीवर तेल अर्पन करत दर्शन घेतले.
अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला. तसेच श्री शनैश्वर देवस्थानच्या वतीने अध्यक्ष भागवत बनकर, उपाध्यक्ष विकास बनकर, कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ दरंदले, अनिल दरंदले यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शनिदेवाची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
शनीदेवाचे दर्शन झाल्यानंतर प्रसादालयात राष्ट्रपतींनी प्रसादाचे सेवनही केले. तसेच पुढील नियोजीत दौर्यासाठी दिल्लीला रवाना झाल्या.
राष्ट्रपती प्रथमच शिंगणापूरला येत असल्याने प्रशासनाच्या वतीने मोठी तयारी केली होती. सकाळपासूनच शनीमंदिर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. केंद्र व राज्याची गुप्तचर यंत्रणा, सुरक्षा विभाग, जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग तसेच शनैश्वर देवस्थानच्या वतीने उत्तम नियोजन केले होते.