सातारा : मनसेच्या (MNS) आंदोलनानंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्रातील सर्व दुकानांना मराठी पाट्या (Marathi Boards) लावण्याचा आदेश दिला. यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र काही व्यापार्यांनी या आदेशाचे पालन न केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे महापालिकेने अशा दुकानांवर धडक कारवाई सुरु केली आहे. अमराठी पाट्यांविरोधात मनसैनिकही आक्रमक झाले आहेत आणि याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. सातारा (Satara) येथे कराडमध्ये मनसैनिकांनी दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही कराड शहरासह तालुक्यातील अनेक दुकानांना इंग्रजी भाषेत पाट्या आहेत. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित दुकानांवर कारवाई करावी, असे निवेदन मनसेकडून तहसीलदारांना देण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष अॅड. विकास पवार, तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण, शहराध्यक्ष सागर बर्गे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक भोसले, सतीश यादव, नितीन महाडिक, हणमंत भिंगारदेवे, नितीन शिंदे, अमोल सकट, विश्वास संकपाळ, केतन जाधव, शंभूराजे भिसे यांच्या वतीने तहसीलदार विजय पवार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, महाराष्ट्रातील प्रत्येकाला मराठी भाषेविषयी आदर असणे गरजेचे आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही काही व्यावसायिक दुकानाला मराठीत पाटी लावत नाही. सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्या लावण्यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. मात्र, कराड शहर व तालुक्यातील अनेक दुकानांना अद्याप इंग्रजीत पाट्या आहेत. प्रशासनाने अशा दुकानांचा सर्व्हे करावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी, तसेच येत्या आठ दिवसांत सर्व दुकानांना मराठीत पाट्या लावण्यात याव्यात अन्यथा मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.