
मराठा आरक्षणावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे खळबळजनक वक्तव्य
जळगाव : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी विरोधकांवर आरोप करताना तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कधीही विचार केला नाही, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. तसेच सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचा विचार केला. देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी फडणवीस यांनी कायदा केला. पण या नतद्रष्टांनी मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे, हे मांडण्याची पद्धत चुकवली. जेव्हा ही केस अंतिम टप्प्यात होती तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नेते झोपी गेले होते, अशा कठोर शब्दात बावनकुळे यांनी टीका केली.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकार प्रयत्नशील आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत एकमत झाल्याचेही त्यांनी सांगितले.