Saturday, May 10, 2025

श्रध्दा-संस्कृतीसाप्ताहिक

Wamanrao pai : शोधायला पाहिजे तिथे शोधा...

Wamanrao pai : शोधायला पाहिजे तिथे शोधा...

  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


प्रत्येक माणसाला आनंद पाहिजे असतो व तो आनंद शोधत असतो. तो शोध का करतो? त्याच्या हृदयात तो जो आनंद आहे, त्याचा त्याला वास येत असतो. उदाहणार्थ “नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंडे वनांतरी”. त्या कस्तुरीचा वास त्या मृगाला येत असतो. हा वास येतो कुठून म्हणून तो शोधतो. त्याच्या बेंबीतून तो वास येत असतो, पण त्याला ते कळत नाही. तसा या आनंदाला माणूस शोधात असतो, पण तो आनंद आपल्याच ठिकाणी आहे हे त्याला कळत नाही व त्या वासाच्या दिशेने जाण्याऐवजी तो उलट दिशेने जातो तेवढेच आपले चुकते. ज्या ठिकाणी त्याचा वास आहे व जिथून त्याचा वास येतो. कळले की नाही जिथे त्याचा वास आहे व जिथून त्याचा वास येतो आहे, ते ठिकाण न कळल्यामुळे तो शोधायला लागतो. शोधण्यासाठी हिमालयांत गेला, गुहेत जाऊन बसला, कोण साधू होतो, बैरागी होतो.



शोधायला पाहिजे तिथे शोधा ना!!
ठायीच बैसोनि करा एकचित्त, आवडी अनंत आळवावा।
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्वकाळ।



तो आपल्याच ठिकाणी आहे पण तो आपल्याच ठिकाणी आहे हे न कळल्यामुळे आणि कुणी जरी सांगितले, तरी हँय असे कसे शक्य आहे असे म्हणतो. ईश्वर नाहीच असे म्हणणारे लोक आहेत. एवढा मोठा ईश्वर आमच्या हृदयांत कसा राहील? हा प्रश्न विचारतात. सांगायचा मुद्दा परमेश्वराबद्दल प्रचंड अज्ञान आहे त्यामुळे माणूस दुःखी आहे. आपल्याजवळ तो आहे. आनंद तिथूनच येतो आहे हे न कळल्यामुळे तो त्याचा शोध जगात करतो. किती शोध तुम्ही केला, किती तीर्थयात्रा केल्या, किती व्रतवैकल्य केली म्हणजे तुम्हाला शोध लागेल? शोध लागणे शक्यच नाही. आम्ही हे सांगितले, तर आमच्यावर लोक रागावतात. हा आटापिटा कशासाठी करता. त्यापेक्षा,
बैसोनि निवांत शुद्ध करी चित्त,तया सुख अंत नाही पार।
येवून अनंत राहील गोपाळ,सायासाचे फळ बैसलिया।



तुकाराम महाराज सांगतात, तू आहेस तिथेच तो आहे. त्याला शोधायला कुठे जातो? त्याचा काही फायदा आहे का? पहिला शोध बंद कर. सद्गुरूंना शरण जा. सद्गुरू पहिले तुला जागे करतील व तुला देवाची जागा दाखवतील मग तुझी वाटचाल सुरू होईल. “अरे देव इथे आहे” हे दाखवतील व त्या दिशेने पाऊल टाकायला सद्गुरू शिकवतात. त्यासाठी सद्गुरुंना किती शरण गेले पाहिजे? सद्गुरूंवर किती प्रेम केले पाहिजे? सद्गुरू हाच देव, ते सांगतात तो वेद, त्यांचा असावा वेध, त्यांचे लागावे वेड असे जेव्हा होते तेव्हाच आपल्याला देवाचा साक्षात्कार होतो. सद्गुरूंना शरण जायचे की न जायचे हे तू ठरव म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.

Comments
Add Comment