Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीभुजबळांच्या मतदारसंघातच 'भुजबळ गो बॅक'च्या घोषणा

भुजबळांच्या मतदारसंघातच ‘भुजबळ गो बॅक’च्या घोषणा

मराठा आंदोलकांनी विरोध केल्याने भुजबळांनी दौरा अर्धवट आटोपला

महेश साळुंके

लासलगाव : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा ताफा सोमठाण देश गावातून जात असताना मराठा आंदोलकांनी भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी केली. छगन भुजबळ गो बॅक! छगन भुजबळ गो बॅक! अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. भुजबळ निघून जाताच मराठा आंदोलकांनी रस्त्यावर गोमूत्र शिंपून रस्त्याचे शुद्धीकरण केले.

मंत्री छगन भुजबळ हे आज येवला लासलगाव मतदार संघात दौऱ्यावर होते. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची ते पाहणी करण्यासाठी आले होते. भुजबळांच्या या दौऱ्याला त्यांच्या बालेकिल्ल्यातच मराठा समाजाने कडाडून विरोध केला. आज सकाळपासूनच येवला लासलगाव मतदार संघातील गावांमधून मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांचा निषेध केला जात आहे. मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत भुजबळांना गो बॅकच्या घोषणा देत गावात घुसू न देण्याचा चंगच बांधला होता.

अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे द्राक्ष बागा, कांदा पीक, संपूर्ण हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे फोटो पाठवल्यामुळे तसेच ओबीसी एल्गार यात्रेत मग्न असल्याची टीका होत असल्याने मंत्री छगन भुजबळ हे नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. या पहाणी दरम्यान छगन भुजबळ यांना मराठा आंदोलकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी आंदोलन करत भुजबळांचा तीव्र निषेध नोंदवला.

दौरा आटोपून भुजबळ परतीच्या प्रवासाला निघालेले असताना आंदोलकांनी पुन्हा घोषणाबाजी केली. अर्धनग्न होत आंदोलकांनी काळे शर्ट फिरवत भुजबळांचा निषेध केला. यावेळी छगन भुजबळ गो बॅकच्या घोषणा देण्यात आल्या.

लासलगावाजवळील कोटमगाव रेल्वे पुलाजवळ ‘छगन भुजबळ गो बॅक’ च्या पाट्या हातात घेवून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली. ‘भुजबळ गो बॅक’ चे पोस्टर रेल्वे पुलाच्या भिंतीला चिकटवले. रस्त्याचे आणि पाण्याचे काम होत नसल्याने कोटमगाव परिसरातील लोक संतप्त झाले होते. आश्वासने नकोत तर कामं करा, असे म्हणत या ग्रामस्थांनी ताफा थांबवून छगन भुजबळांना निवेदन दिले.

दरम्यान, मराठा आंदोलक रस्त्यावर आंदोलन करत असताना भुजबळ हे नुकसानग्रस्त भागात आडमार्गाने जाऊन नुकसानीची पाहणी करत होते. भुजबळांनी आंदोलकांना चकमा देत काही भागात आपला नुकसानग्रस्त पाहणी दौरा सफल केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -