Tuesday, October 8, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखअवकाळीचा तडाखा

अवकाळीचा तडाखा

महाराष्ट्राच्या अनेक भागांत पुन्हा काल अवकाळी पावसाने यावेळी तडाखा दिला असून खासकरून नाशिक भागात त्याचा तडाखा सर्वात जास्त बसला आहे. यावेळी नाशिक जिल्ह्यात जास्तच नुकसान झाले असून मोठ्या प्रमाणात द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. नाशिकमध्ये द्राक्ष बागांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. महाराष्ट्रात गेल्या महिनाभरापासून ८० टक्के अवकाळी पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत सतत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक भागातील द्राक्ष उत्पादनाला जबर फटका बसला असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येते. अवकाळीमुळे राज्यभरात सर्वत्र शेतीचे नुकसान झाले आहे. नाशिक भागात वायनरी उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. त्यालाही या अवकाळीचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे वायनरी उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिकला ‘द्राक्ष पंढरी’ म्हटले जाते. पण याच नगरीत आता तेथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा नुकसानामुळे खर्च वाढला आहे. हवामान बदल हे एक कारण या स्थितीसाठी आहे.

हवामान बदलाच्या या आविष्कारांमुळे शेतकऱ्यांना सर्वात जास्त नुकसान सोसावे लागत आहे. पॅरिस येथे झालेल्या हवामान परिषदेत हवामान बदलाच्या परिणामांचे निराकरण करण्यासाठी सर्व देशांनी खर्च करण्याचा निर्णय घेतला होता. पण अमेरिकेने त्यातून नंतर अंग काढून घेतले. पण हवामान बदलाच्या संकटांचा सामना सध्या जास्तीत जास्त शेतकरी वर्गालाच करावा लागत आहे. द्राक्ष बागा फुलोऱ्यात असतानाच द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळीचे संकट भेडसावत आहे. नाशिक जिल्हा हा द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जात असून तेथे २० टन प्रतिहेक्टर या प्रमाणानुसार १० लाख टन द्राक्ष उत्पादन होते. ८००० हेक्टर जमिनीचा उपयोग वेगवेगळ्या द्राक्षाच्या जातींचे उत्पादन घेण्यासाठी केला जातो. आता यातील बहुतेक द्राक्ष उत्पादन मातीत गेले आहे. महाराष्ट्र हेच भारतात द्राक्ष पिकवणारे सर्वात मोठे राज्य आहे. पण येथे शेतकऱ्यासमोर गेल्या महिनाभरापासून अवकाळीचे संकट आ वासून उभे आहे. राज्यात एकूण देशातील द्राक्ष उत्पादनापैकी ८१ टक्के उत्पादन केले जाते. नाशिक जिल्हा हा वाइन कॅपिटल म्हणून ओळखला जातो. एकट्या नाशिक जिल्ह्यात २५ वायनरी सध्या सुरू आहेत. यामुळे नाशिक जिल्ह्याने द्राक्ष राजधानी म्हणून लौकिक प्राप्त केला असला तरीही अवकाळीमुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. देशात वाइनची विक्री वाढली आहे आणि त्यामुळे द्राक्षाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. पण हे सारे चांगले घडत असतानाच अवकाळीच्या संकटाने उद्योगाला वेढून टाकले आहे. वायनरी उद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगारही निर्माण होत असल्याने अवकाळीमुळे नुकसान झाल्याचा दुष्परिणाम वाढत्या बेरोजगारीवर होण्याची शक्यता आहे. एक शेतकरीच संकटात सापडलेला नाही, तर इतरही अनेक घटक या अस्मानी संकटामुळे अडचणीत आले आहेत.

अवकाळीचे संकट आता नेहमीचे झाले आहे. त्यात आता नवीन काही राहिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता या संकटाशी तोंड देण्यास तयार राहिले पाहिजे. राज्य सरकार आता पाहणी करून द्राक्षबागांच्या उत्पादकांना भरपाई देईल. पण त्यासाठी पंचनामे करावे लागतील. त्या प्रक्रियेत कितीतरी वेळ जाईल. पण सरकारने आता लवकर शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे, तरच शेतकऱ्यांना भरपाई लवकर मिळेल. अवकाळीमुळे द्राक्षबागांचे नुकसान प्रचंड झाले आहे, कित्येक एकरावर बागा आडव्या झाल्या आहेत. कितीतरी बागांची द्राक्ष फुलोऱ्यात असतानाच नष्ट झाली आहेत. हे नुकसान फार मोठे आहे. राज्याच्या इतर भागांतही पावसाने शेतकऱ्याचे नुकसान केले आहे. पण नाशिकमध्ये जे द्राक्षांचे नुकसान झाले आहे, ते फार मोठे आहे. द्राक्ष राजधानीत अशा प्रकारे नुकसान होणे हा राज्याच्या अर्थव्यवस्थेला फार मोठा झटका आहे आणि त्यामुळे राज्याच्या प्रगतीवरही परिणाम होणार आहे. नाशिकची अर्थव्यवस्था संपूर्ण द्राक्षबागांवर चालते. त्यातच अवकाळीने तडाखा दिल्याने तीच कोसळण्याच्या बेतात आली आहे. पण याचा सर्वात वाईट परिणाम असा होणार आहे की, नाशिकमधून देशाचे जे अर्धे द्राक्ष उत्पादन निर्यात केले जाते. त्याला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेलाही झटका बसणार आहे. ६५ हजार टन द्राक्ष उत्पादन निर्यात केले जाते. त्यामुळे देशाला कितीतरी अधिक परकीय चलन मिळते. पण आता हे नुकसान लक्षणीय आहे.

द्राक्ष बागांचा अभ्यास केला असता असे दिसते की, निर्यात होणारे उत्पादन जास्तीत जास्त अमेरिका आणि इतर युरोपीय देशांना जाते. तेव्हा द्राक्षबागांचे नुकसान हे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान आहे. त्याशिवाय रशिया आणि चीन याही भारतातील द्राक्ष उत्पादनांच्या मोठ्या बाजारपेठा आहेत. आता शेतकरी यातून कसे सावरणार हा प्रश्न आहे. सरकार त्यांना मदत करेल आणि ते पुन्हा आपल्या पायावर उभे राहतील. पण त्या प्रक्रियेला विलंब होईल. भारतात द्राक्ष पिकाचे नुकसान नेहमीचेच आहे आणि त्यामुळे द्राक्ष बागा जळून जाण्याचा धोकाही मोठा असतो. नाशिक जिल्हा हा द्राक्षंसाठी प्रसिद्ध असला आणि एकट्या नाशिक जिल्ह्यात राज्यातील ५५ टक्के उत्पादन होत असले तरीही शेतकऱ्यांचे प्रश्न सारखेच आहे. जे मराठवाडा किंवा विदर्भातील शेतकऱ्याचे प्रश्न आहेत तेच नाशिकमधील शेतकऱ्याचे आहेत. अवकाळी पाऊस हा आता निसर्गातील नियमित होणारा प्रकार झाला आहे आणि त्यामुळे त्याच्याशी तोंड देण्याच्या उपाययोजना सरकाराने केल्या पाहिजेत. अवकाळी पाऊस हा नित्यनियमाने येऊन शेतीची नासाडी करत आहे. हवमान बदल यावर हा विषय सोडून देता येणार नाही. नाशिकच नव्हे तर अकोला, यवतमाळ आणि इतर कित्येक शेतीबहुल प्रांतात त्याने धुमाकूळ घातला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -