पंकज त्रिपाठी यांनी शेअर केले नवे पोस्टर
मुंबई : नव्या भारताचं स्वप्न बाळगणारे भारताचे माजी पंतप्रधान आणि एक उत्तम कवी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. यातील अटलजींची भूमिका साकारणारा हरहुन्नरी अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हा सगळ्यांचाच आवडता अभिनेता आहे. अटलजींच्या वेशातला त्याचा पहिला लूक समोर आल्यापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली होती. आनंदाची बाब म्हणजे आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.
‘मैं अटल हूँ’ (Main Atal hoon) असं या चित्रपटाचं नाव आहे. अटलबिहारी वाजपेयी हे भाजपकडून निवडून आलेले देशाचे पहिले पंतप्रधान होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी भारताला विकसित करण्याच्या दृष्टीने अनेक कामे केली आणि भारतीयांच्या मनात एक आदराचे स्थान मिळवले. त्यांची हीच कारकीर्द ‘मैं अटल हूँ’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे.
पंकज त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर ‘मैं अटल हूँ’ या सिनेमाचं एक पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत पाठमोरे उभे असलेले दिसत आहेत. पोस्टखाली त्यांनी लिहिलं आहे,”एक कवी ज्यांनी इतिहास पुन्हा लिहिला”. ‘मैं अटल हूँ’ हा सिनेमा १९ जानेवारी २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरवर ‘हार्ट ऑफ स्टोन…मॅन ऑफ स्टील’ असं लिहिलं आहे.
‘मैं अटल हूँ’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) याने सांभाळली आहे. तर या सिनेमाचं कथानक ऋषी विरमानी आणि रवी जाधव यांनी लिहिलं आहे. भानुशाली स्टुडिओ लिमिटेड आणि लीजेंड स्टुडिओच्या बॅनरअंतर्गत विनोद भानुशाली, संदीप सिंह आणि कमलेश भानुशाली यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.