काल नेमाडेंच्या उपस्थितीत झाली चित्रपटाची अधिकृत घोषणा
मुंबई : भारतीय साहित्य (Indian Literature) क्षेत्रातील सर्वोच्च ‘ज्ञानपीठ’ (Jnanpith Award) पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांच्या कोसला (Kosala) कादंबरीचे अनेक चाहते आहेत. पुण्यात शिक्षणासाठी एका छोट्याशा गावातून आलेल्या पांडुरंग सागवीकर या नायकाची द्विधा मनस्थिती दर्शवणारी ही कादंबरी. मनात सतत न्यूनगंड बाळगून असणाऱ्या लोकांसाठी ही कादंबरी नक्कीच एक मैलाचा दगड आहे. याच कोसला कादंबरीवर आधारित नव्या चित्रपटाची (New Marathi Movie) काल दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत अधिकृत घोषणा करण्यात आली. स्वतः भालचंद्र नेमाडे देखील या सोहळ्याला उपस्थित होते.
भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या वयाच्या पंचविशीत लिहिलेल्या या कादंबरीतून समाजाचं एक वेगळं रुप पाहायला मिळतं. अनेक वर्षे लोटली तरीही मराठी साहित्यविश्वात कोसला कादंबरीची चर्चा होते. ‘कोसला – शंभरातील नव्याण्णवांस…’ असं या नव्या सिनेमाचं नाव असणार आहे. निर्माण स्टुडिओज आणि मेहूल शाह यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. आदित्य राठी आणि गायत्री पाटील या दोघांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
या कादंबरीतील मुख्य पात्र पांडुरंग सागवीकरची भूमिका कोण साकारणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या पांडुरंगला कसे अनुभव येतात, त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथे आलेले अनुभव यांचा प्रवास म्हणजे कोसला. त्यामुळे या नायकाच्या मनाच्या अवस्थेचे चढउतार दाखवण्यासाठी तितक्याच कसलेल्या आणि अनुभवी कलाकाराची निवड करणे आवश्यक होते. त्यानुसार मराठीतील एक हरहुन्नरी कलाकार सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. ते या भूमिकेला न्याय देतील यात शंका नाही.
View this post on Instagram
भालचंद्र नेमाडे म्हणतात…
चित्रपटाबद्दल साहित्यिक भालचंद्र नेमाडे म्हणाले, ‘’ साहित्याइतकेच माझे चित्रपटांवरही प्रेम आहे. मला चित्रपटांमध्ये पाहाण्याव्यतिरिक्त काही करता आले नाही. मात्र सयाजी शिंदे या मित्रामुळे माझा पाय चित्रपटांपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत ‘कोसला’ साठी अनेक जण मला भेटले परंतु त्यांना ते जमले नाही. मला यांच्याबाबतीतही तसेच वाटले. वर्षभरात म्हणतील काही जमत नाही आणि सोडून देतील. परंतु यांची चिकाटी अफाट होती. ते इथपर्यंत पोहोचले. त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत आणि त्यामुळे मला उभारी मिळाली. पुढच्या कादंबऱ्या लिहिण्याचा उत्साह यांनी मला दिला आहे.’’
मी स्वतः या कादंबरीतील उतारे पाठ केले होते : सयाजी शिंदे
अभिनेते सयाजी शिंदे म्हणतात, ‘’जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हाच ही कांदबरी आली होती. तेव्हा मी स्वतः या कादंबरीतील उतारे पाठ केले होते. बोलण्यासाठी आणि अभिनयासाठी त्याचा कसा वापर होईल, याचा विचार करायचो. त्यानंतर बराच काळ लोटला. अनेकांचा या कादंबरीवर चित्रपट करण्याचा विचार होता. याच दरम्यान मला मेहुल सरांचा फोन आला. आम्ही नेमाडे सरांसोबत एक-दोन मिटिंग केल्या आणि अखेर नेमाडे सरांनी ‘कोसला’ला संमती दिली. सरांच्या सगळ्या नियमांचे पालन करत आता या चित्रपटाची सुरूवात होत आहे.’’ या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता आहे.