मराठी पाटी नसल्यास प्रति कामगार २००० रुपये दंड
मुंबई : मनसेने (MNS) अमराठी पाट्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेला दुजोरा देत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Boards) लावण्यासाठी दुकानदारांना २५ नोव्हेंबर पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, ही मुदत उलटून गेल्यावरही काहीजणांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने (BMC) अशा दुकानांवर धडक कारवाई सुरु केली आहे.
मुंबई महापालिकेचे कर्मचारी आज सकाळपासूनच सर्व दुकानांची पाहणी करत आहेत. कुलाबा परिसरातील नाईकी स्पोर्टस ब्रँडच्या आऊटलेटवर महापालिकेने कारवाई केल्याचे समोर आले आहे. मराठी पाट्या नसल्यास प्रति कामगार २००० रुपये दंड आकारणार, अशी माहिती आहे. आस्थापना टॅली प्रमाणपत्रावर (Establishment tally certificate) कामगारांचा जो आकडा असतो त्यानुसार दंड आकारला जातो, असं एका महापालिका अधिकार्याने स्पष्ट केले आहे.
मराठी पाट्यांच्या मुद्द्यावर नवी मुंबईत मनसैनिक देखील आक्रमक झाले आहेत. पुढील दोन दिवसांत मराठी पाट्या लावा नाहीतर मनसे स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा त्यांनी दिला आहे. सीवूडमधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये मनसे कार्यकर्ते घुसले आणि आंदोलन सुरु केलं. या मॉलमधील ज्या आस्थापनांवर मराठी पाट्या नाहीत त्यांना पुढील दोन दिवसांत त्या लावण्याचा निर्वाणीचा इशारा मनसेने दिला आहे.