Thursday, January 16, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यUnseasonal Rain : अवकाळी पावसाचा खरिपाला फटका, तर रब्बीला दिलासा

Unseasonal Rain : अवकाळी पावसाचा खरिपाला फटका, तर रब्बीला दिलासा

  • मराठवाडा वार्तापत्र : अभयकुमार दांडगे

मराठवाड्यात रविवारी रात्री व सोमवारी पहाटे जोरदार अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसासोबतच गारपीट व वीज पडल्याने हिंगोली जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला व दोघेजण गंभीर जखमी झाले. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यात सर्वाधिक अवकाळी पावसाची नोंद झाली. नाशिक व नगर जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे छत्रपती संभाजी नगर येथील जायकवाडी धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान मराठवाड्यातील या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील तूर व कापूस या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा व ज्वारी या पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे.

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली तसेच नाल्यांना व ओढ्यांना पाणी आले. मध्यरात्री पावसाचा जोर वाढला होता. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात गोजेगाव शिवारात प्रचंड पाऊस पडल्याने त्या परिसरातील नागरिकांना खंडोबा मंदिरात आश्रय घ्यावा लागला. रात्री दोन वाजता त्या ठिकाणी वीज कोसळल्याने राजू शंकर जायभाये या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तसेच त्याच्यासोबत असलेले दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर औंढा नागनाथ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातही या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. किनवट तालुक्यातील पिंपरी या गावात शिवनाथ गुट्टे यांच्या आखाड्यावर मध्यरात्री वीज कोसळली. त्यामध्ये त्यांची दुभती म्हैस दगावली, तर हदगाव तालुक्यातील तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पावसाचे पाणी शिरल्याने रुग्णांचे प्रचंड हाल झाले. या ठिकाणी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचा कॅम्प सुरू आहे. त्यामुळे महिलांची या ठिकाणी मोठी गर्दी होती. रात्रभर त्या ठिकाणी असलेल्या महिलांना रात्र जागून काढावी लागली. काल मध्यरात्रीच्या अवकाळी पावसामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती लागलेली आहे. गेल्या वर्षभरापासून त्या ठिकाणी असलेल्या इमारतीची कोणीही दुरुस्ती केलेली नसल्याने रुग्णांना अगोदरच कठीण परिस्थितीत उपचार करून घ्यावे लागत होते. कालच्या अवकाळी पावसामुळे तर या ठिकाणी असलेल्या रुग्णांचे व त्यांच्या नातेवाइकांचे प्रचंड हाल झाले. नांदेड जिल्ह्यात काल रात्री ५५ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली. तर जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव, भोकर, मुदखेड, लोहा, हिमायतनगर, नायगाव, कंधार, माहूर व किनवट तालुक्यात प्रचंड पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात असलेल्या येलदरी धरणात पाण्याची पातळी वाढली आहे. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे त्या ठिकाणी ७२ मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली. या अवकाळी पावसामुळे परभणी जिल्ह्यातील मानवत, परभणी, सेलू तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कुरुंदा व हट्टा या भागात मुसळधार पाऊस झाला. विजेच्या कडकडाटामुळे त्या भागातील जनावरे देखील सैरावैरा धावू लागली होती. रात्रीचा पाऊस खूप मोठा असल्याने अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. तसेच काही कौलारूची घरे देखील कोसळली. या वादळी वारे व पावसात झाडे उन्मळून पडली. भारतीय हवामान खात्याने दोन दिवसापूर्वीच मराठवाड्यातील काही जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात आणखी मोठा पाऊस पडण्याचा इशारा देखील हवामान खात्याच्यावतीने देण्यात आला आहे. मराठवाड्यातील शेतकरी कोरडवाहू पिके घेतो. कोरडवाहू पिकांवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे भविष्य अवलंबून आहे. सध्या खरीप हंगामात मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी तूर व कापूस हे पीक घेतले होते. कालच्या अवकाळी पावसामुळे या दोन्ही पिकांचे प्रचंड नुकसान झाले. तूर व कापसाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे, तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा व ज्वारी या पिकांना जीवदान मिळाले आहे. रविवारी मध्यरात्री दोनच्या नंतर पावसाचा जोर वाढला होता. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात गोरेगाव व पुसेगाव येथे प्रचंड पाऊस झाला. पहाटे पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर मोठा होता. मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला असल्याने येथील शेतकरी धास्तावला आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -