गुवाहाटी: भारत आणि ऑस्ट्रेलिया(india vs australia) यांच्यात आज २८ नोव्हेंबरला पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा सामना रंगणार आहे. हा सामना निर्णायक असणार आहे कारण आजच्या सामन्यावरून भारत विजयी आघाडी घेणार की ऑस्ट्रेलियाचे आव्हान जिवंत राहणार हे स्पष्ट होणार आहे.
खरंतर, या मालिकेचे सुरूवातीचे दोन सलग सामने भारताने जिंकले आहेत. अशातच आजच्या सामन्यात जर टीम इंडियाने विजय मिळवला तर मालिका त्यांच्या नावे होईल. त्यामुळे या मालिकेत विजयी आघाडी मिळवण्याच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी हा करो वा मरो सामना असणार आहे.
ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामन्यात भारताला चांगली टक्कर दिली मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात ते हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करतील.
गुवाहाटीत आहे हा सामना
हा सामना गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये आज संध्याकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या मैदानावर दोन सामने झाले आहेत. पहिल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ १२०चा आकडाही पार करू शकले नाही तर दुसऱ्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने २२५चा आकडा पार केला होता. अशातच या पिचचे आकलन करणे कठीण आहे. या मैदानावर आधीही भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकमेकांविरुद्ध भिडले आहेत. २०१७मध्ये झालेल्या येथील सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ८ विकेटनी मात दिली होती.
दोन्ही संघाचे संभाव्य प्लेईंग ११
ऑस्ट्रेलिया – ट्रेविस हेड, स्टीव स्मिथ, जोश इंगलिस, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, ग्लेन मैक्सवेल, मॅथ्यू वेड (विकेटकीपर आणि कर्णधार), जेसन बेहरेनडोर्फ/सीन एबॉट, नाथन एलिस, एडम जम्पा आणि तनवीर संघा.
भारत: यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड़, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा.