Tuesday, October 8, 2024
Homeक्रीडाIND vs AUS 3rd T20 : मॅक्सवेलचे झुंजार शतक, अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा...

IND vs AUS 3rd T20 : मॅक्सवेलचे झुंजार शतक, अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा विजय

गुवाहाटी: शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून ठेवणाऱ्या अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने(australia) भारतावर मात केली आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला ५ विकेटनी हरवले. ग्लेन मॅक्सवेलचे झुंजार नाबाद शतक ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले. ग्लेन मॅक्सवेलने ४८ चेंडूत नाबाद १०४ धावांची खेळी केली. यात त्याने ८ चौकार आणि ८ षटकार ठोकले.

शेवटच्या एका चेंडूत ऑस्ट्रेलियाला २ धावांची गरज असताना मॅक्सवेलने प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलवर चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यासोबतच ऑस्ट्रेलियाने मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत आता भारत २ आणि ऑस्ट्रेलिया १ अशा गुणसंख्येवर आहे. त्यामुळे पुढील २ सामने निर्णायक ठरणार आहेत.

तत्पूर्वी, पहिल्यांदा फलंदाजी करण्यास उतरलेल्या भारतीय संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने २२२ धावांचा टप्पा गाठला होता. ऑस्ट्रेलियासाठी हे आव्हान नक्कीच मोठे होते मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जबरदस्त खेळी करताना भारताचे हे आव्हान परतून लावले.

भारताकडून ऋतुराज गायकडवाने ५७ बॉलमध्ये १३ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर नाबाद १२३ धावा केल्या. मात्र त्याच्या या धावा भारताला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. सलामीला आलेला यशस्वी जायसवाल ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला इशान किशन भोपळा न फोडताच पॅव्हेलियनमध्ये गेला. दोन फलंदाज झटपट परतल्यानंतर भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने पिचवर आपले पाय जमवले आणि जोरदार फटकेबाजी सुरू केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -