गुवाहाटी: भारताचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने(ruturaj gaikwad) ठोकलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या(IND Vs AUS) तिसऱ्या टी-२० सामन्यात २२२ धावांचा डोंगर उभा केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २२३ धावांचे आव्हान दिले आहे.
भारतासाठी ऋतुराज गायकवाडने ५७ चेंडूत नाबाद १२३ धावांची खेळी केल्या. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या या खेळीत १३ चौकार आणि ७ षटकार ठोकले. यासोबतच तिलक वर्मा ३१ धावांवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाने या सामन्यात टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. भारताने आपले दोन फलंदाज झटपट गमावले. यामुळे भारताच्या गोटात शांतता पसरली होती. मात्र त्यानंतर आलेल्या ऋतुराज गायकवाडने जबरदस्त नाबाद १२३ धावांची खेळी केली. यामुळे संघाला दोनशेहून अधिक धावांचा टप्पा गाठता आला.
सामना सुरू झाल्यानंतर सलामीला आलेला यशस्वी जायसवाल ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर आलेला इशान किशन भोपळा न फोडताच पॅव्हेलियनमध्ये गेला. दोन फलंदाज झटपट परतल्यानंतर भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने पिचवर आपले पाय जमवले आणि जोरदार फटकेबाजी सुरू केली.
त्याने ५७ चेंडूत तब्बल १३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने १२३ धावांची आतषबाजी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने या सामन्यात ३९ धावांची खेळी केली. तर तिलक वर्मा ३१ धावांवर नाबाद राहिला.