डेहराडून: उत्तराखंडच्या उत्तरकाशी येथील सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांना अखेर सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मजुरांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर १७व्या दिवशी या रेस्क्यू ऑपरेशनला यश मिळाले आहे.
उत्तराखंडमधील खराब हवामानामुळे या मजुरांच्या बचावकार्यात अडथळे होते. मात्र सर्व अडथळे तसेच अडचणी पार करून हे मजूर बोगद्याच्या बाहेर सुरक्षितरित्या आले आहेत.या मजुरांना बाहेर काढण्यासाठी लष्कराची मदत घेण्यात आली होती. मॅन्युअल तसेच व्हर्टिकल ड्रिलिंगचा वापर करण्यात आला होता.
मजूर बाहेर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात मिठाई वाटण्यात आली. या मजुरांच्या कुटुंबियांसाठी आजचा दिवस म्हणजे जणू दिवाळीच आहे. संपूर्ण दिवाळीसणादरम्यान ते या बोगद्यात अडकले होते. या मजुरांना बाहेर काढल्यानंतर प्राथमिक तपासानंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे.
Uttarkashi tunnel rescue | Uttarakhand CM Pushkar Singh Dhami meets the workers who have been rescued from inside the Silkyara tunnel. pic.twitter.com/8fgMiHPkAD
— ANI (@ANI) November 28, 2023
असे काढले मजुरांना बाहेर
या बोगद्यात खोदकाम पूर्ण झाल्यानंतर ८०० मिमी व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली होती. एनडीआरएफच्या टीमने पाईपच्या सहाय्याने मजुरांपर्यंत पोहोचली. त्यानंतर त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले.
मुख्यमंत्री पुष्कर धामींनी घेतली भेट
मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी बाहेर पडलेल्या सर्व कामगारांची भेट घेतली. केंद्रीय राज्यमंत्री व्ही के सिंहही तेथे उपस्थित होते. या मजुरांचे कुटुंबीयही या बोगद्याच्या बाहेर होते.