- अर्थनगरीतून… : महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक
लग्नसराईचे दिवस सुरू झाले आहेत. वाढत्या महागाईच्या काळात एकूणच खरेदी आणि लोकांची खर्च करण्याची मानसिकता चर्चेत असते. यंदाही ही खरेदीयात्रा लक्षवेधी ठरली. यंदाच्या लग्नसराईच्या काळात तर बाजारात सुमारे सव्वाचार लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता आहे. अलीकडेच छटपूजेनिमित्त सामान्यजनांच्या जल्लोशाची झलक बघायला मिळाली. या काळात बाजाराने सुमारे आठ हजार कोटींची उलाढाल अनुभवली. दरम्यान, देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन मिळाल्यामुळे लॅपटॉप, काँप्युटर स्वस्त होण्याचीही शक्यता आहे.
दिवाळीनंतर लग्नाचा हंगाम सुरू होतो. लग्नाआधी लोक कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत भरपूर खरेदी करतात. ही खरेदी केवळ वधू-वरांसाठी नसते. या लग्नाला येणारे लोक शॉपिंगही करतात. यामुळेच देशात लग्नाचा हंगाम अब्जावधी डॉलर्सचा व्यवसाय घेऊन येतो. भारतीय रुपयात पाहिले तर हा आकडा ४.२५ लाख कोटी रुपये इतका आहे. या हंगामात लोक लग्नाच्या खरेदीवर प्रत्येक सेकंदाला सरासरी २१ लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करू शकतात. नोव्हेंबरच्या अखेरीस आणि डिसेंबरच्या मध्यापर्यंत देशात ३५ लाखांहून अधिक विवाह होणार आहेत. ‘रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडिया’चे ‘सीईओ’ कुमार राजगोपालन यांनी लग्नाच्या खर्चाशी संबंधित दागिने, कपडे, शूज आणि डिझायनर कपड्यांशी संबंधित व्यवसाय विक्री नोव्हेंबर ते जानेवारी अखेरीस आठ ते अकरा टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. यंदा महागाईचा फटका बसला असला, तरी हंगामाच्या पहिल्या आठवड्यात चांगला व्यवसाय अपेक्षित आहे.
‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चा अंदाज आहे की २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत एकूण विक्री सुमारे ४.२५ ट्रिलियन रुपये असेल. म्हणजेच या कालावधीत प्रत्येक सेकंदाला लग्नाच्या खरेदीवर २१.३७ लाख रुपये खर्च केले जातील. या काळात सोने परिधान करणे आणि भेटवस्तू देणे शुभ मानले जाते आणि कुटुंबे त्यांच्या लग्नाच्या बजेटचा मोठा भाग दागिन्यांवर खर्च करतात. देशात सोन्याची वार्षिक मागणी सुमारे ८०० टन आहे. त्यातील निम्म्याहून अधिक खरेदी लग्नासाठी केली जाते. भारत हा जगातील दुसर्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक असलेला देश आहे. टायटन कंपनीच्या तनिष्क, सेन्को गोल्ड लिमिटेड, त्रिभुवनदास भीमजी झवेरी लिमिटेड आणि कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेड यांना या काळात सर्वाधिक फायदा होण्याची अपेक्षा आहे. ‘मेटल्स फोकस लिमिटेड’चे प्रमुख सल्लागार चिराग शेठ म्हणाले की ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली असेल. इस्रायल-हमास युद्धामुळे किमती वाढल्याने लग्नाच्या दागिन्यांच्या मागणीवर फारसा परिणाम होणार नाही. ते म्हणाले की भारतीय लोक लग्नाच्या दागिन्यांसाठी महिनोनमहिने बचत करतात. किमती दोन किंवा तीन टक्के वाढल्या तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही.
दिवाळी सरली तरी देशात सणासुदीचा माहोल आहे. या काळात विविध वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असते. दिवाळीनंतर आता छठ पुजेचा हंगाम सुरू आहे. या काळात वस्तूंच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’च्या आकडेवारीनुसार गेल्या चार दिवसांमध्ये छठ पूजेच्या निमित्ताने आठ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या काळात कपडे, फळे, फुले, भाजीपाला, साड्या आणि मातीच्या चुलीचा व्यापार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. १७ नोव्हेंबरपासून छठ पूजा सुरू झाली. दरम्यान, बिहार आणि झारखंडव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये स्थायिक झालेल्या बिहारमधील लोकांनी विविध अंदाजांनुसार छठ पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. राज्यांच्या किरकोळ बाजारातून आठ हजार कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या वस्तूंची खरेदी करण्यात आली. एका अहवालानुसार, देशभरात २० कोटींहून अधिक लोक छठ पूजा साजरी करत आहेत. ‘काँफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (कॅट) या वर्षी प्रत्येक सणाच्या विक्रीचे आकडे जाहीर करत आहे. छठ पूजेच्या काळात विविध वस्तूंच्या विक्रीचे आकडेदेखील जाहीर केले आहेत.
छठ पूजा हा भारतातील लोकसंस्कृतीतला एक मोठा सण मानला जातो. छठ पूजेसाठी फळे, फुले आणि भाज्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते तर कपडे, साड्या, मेक अपचे सामान, अन्नधान्य, मैदा, तांदूळ, डाळी आणि इतर खाद्यपदार्थ, सिंदूर, सुपारी, लहान वेलची यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होते. पूजेचे साहित्य, नारळ, आंब्याचे लाकूड, मातीची चूल, देशी तूप आणि इतर वस्तूंची प्रचंड विक्री होते. स्त्रिया आपल्या मुलांच्या आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यासाठी छठ पूजा उपवास करतात. या पूजेमध्ये पतीसाठी लांब सिंदूर अतिशय शुभ मानला जातो आणि त्यामुळे छठपूजेच्या वेळी महिला नाकापासून कपाळापर्यंत सिंदूर लावतात. एकंदरीत, या काळात वस्तुंच्या विक्रीला मोठी चालना मिळते. त्याचा परिणाम बाजारात उलाढाल वाढण्यावर होतो.
दरम्यान, भारतात आता लॅपटॉप आणि संगणक ‘मेड इन इंडिया’ असणार आहेत. त्यामुळे येत्या काळात भारतात ते स्वस्त दरात खरेदी करता येतील. गेल्या काही वर्षांपासून देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारद्वारे ‘मेड इन इंडिया’वर भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने एचपी, डेल, लिनोवोसह २७ कंपन्यांना भारतात उत्पादन करण्यासाठी मान्यता दिली आहे. भारत सरकारच्या ‘प्रोडक्ट लिंक्ड इन्सेंटिव्ह’ (पीएलआय) योजनेंतर्गत या कंपन्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यानंतर या कंपन्यांना आयटी हार्डवेअरसाठी सरकारने आणलेल्या १७ हजार कोटी रुपयांच्या पीएलआय योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारला आयटी हार्डवेअरमध्ये ‘पीएलआय’साठी एकूण ४० प्रस्ताव प्राप्त झाले होते. आयटी हार्डवेअरमध्ये ‘पीएलआय’चा लाभ घेणार्या कंपन्या भारतात लॅपटॉप, पीसी आणि सर्व्हरसारखी उपकरणे तयार करतील. यासाठी सर्व कंपन्यांकडून एकूण तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. २७ पैकी २३ कंपन्या भारतात तात्काळ उत्पादन सुरू करतील आणि उर्वरित चार कंपन्या ९० दिवसांमध्ये उत्पादन सुरू करतील.
पुढील सहा वर्षांमध्ये या ‘पीएलआय’ योजनेंतर्गत ३.५ लाख कोटी रुपयांच्या उत्पादनांची निर्मिती आणि विक्री होण्याची शक्यता आहे. विविध कंपन्यांच्या गुंतवणुकीनंतर सुमारे पन्नास हजार लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळेल आणि दीड लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ‘पीएलआय’ योजनेचा दुसरा टप्पा मे महिन्यात अधिसूचित करण्यात आला होता. त्यासाठी १७ हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले होते. हे बजेट पहिल्या टप्प्याच्या दुप्पट होते. यामध्ये कंपन्यांना जास्त प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होता. ‘पीएलआय’चा पहिला टप्पा आयटी हार्डवेअरमध्ये फारसा यशस्वी झाला नव्हता. सरकारला २५०० कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे प्रस्ताव मिळण्याची अपेक्षा होती; पण फक्त १२० कोटी रुपयांचे गुंतवणूक प्रस्ताव मिळाले. काही काळानंतर सरकारने दुसरा टप्पा सुरू केला. त्यात ५८ कंपन्यांकडून गुंतवणुकीचे प्रस्ताव आले. ‘पीएलआय’च्या दुसर्या टप्प्यात आयटी हार्डवेअरमध्ये पाच हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे गुंतवणूक प्रस्ताव आले आहेत. केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅब्लेट आदी गॅझेटच्या आयात बंदीचा निर्णय मागे घेतला. ऑगस्ट २०२३ मध्ये भारताने लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यानंतर भारत लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालणार नाही, असे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी म्हटले आहे. एकंदरीत, येत्या काळात बाजारात खरेदीची तेजी कायम राहिल्याचे बघायला मिळाले तर फारसे आश्चर्य वाटायला नको.