
तेलंगणा प्रचाराचा आज शेवटचा दिवस; पंतप्रधान मोदीजींनी घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन
हैदराबाद : तेलंगणातील (Telangana) ११९ विधानसभा मतदारसंघासाठी ३० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया (Assembly Election 2023) पार पडत आहे. प्रचाराच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तीन दिवसांच्या तेलंगणा दौर्यावर आहेत. पंतप्रधानांनी आज सकाळी तिरुपती बालाजी मंदिरात भगवान व्यंकटेश्वराचं दर्शन घेतलं. त्यांनी मंदिरात पूजा-अर्चाही केली. याचे फोटो पंतप्रधान मोदी यांच्या अधिकृत X (Twitter) खात्यावरून शेअर करण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करून लिहिले, 'तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात १४० कोटी भारतीयांच्या उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्धीसाठी शुभेच्छा.' पंतप्रधानांची सुरक्षा पाहता मंदिर प्रशासनाकडून व्हीआयपी (VIP) दर्शन बंद करण्यात आलं होतं. तीन दिवसांच्या तेलंगणा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज पंतप्रधान मोदी हैदराबादमध्ये पोहोचणार आहेत. तिथे ते दोन जाहीर सभा आणि मेगा रोड शो करणार आहेत.
At the Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala, prayed for the good health, well-being and prosperity of 140 crore Indians. pic.twitter.com/lk68adpgwD
— Narendra Modi (@narendramodi) November 27, 2023
पंतप्रधान मोदी आज दुपारी १२ वाजता महबूबाबाद आणि दुपारी २ वाजता करीमनगरमध्ये जाहीर सभांना संबोधित करतील. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता पंतप्रधान मोदींचा हैदराबादमध्ये रोड शो होणार आहे. तो आरटीसी क्रॉसरोडपासून सुरू होईल आणि काचेगुडा क्रॉसरोडपर्यंत जाईल. मोदी यांच्या तेलंगणा दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस असून मोदी सायंकाळी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर मोदी काय बोलतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.