Wednesday, April 30, 2025

ठाणे

महिलेचा खून करणारा ४८ तासात गजाआड

महिलेचा खून करणारा ४८ तासात गजाआड

भिवंडी शहर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

भिवंडी : भिवंडी शहरातील देह व्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती असलेल्या हनुमान टेकडी या परिसरातील एका खोलीत हत्या करण्यात आली होती. सेक्स वर्कर महिलेच्या या हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी ओडिसा राज्यात पळून जात असताना पश्चिम बंगाल येथील खरगपूर रेल्वे स्थानकात अवघ्या ४८ तासात अटक करण्यात भिवंडी शहर पोलिसांना यश आले आहे. आकाशकुमार उर्फ पप्पू देवेंद्र मलिक (वय २४ ) रा.बालासोर ओडिसा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी रात्री तरुणाचे महिले सोबत किरकोळ कारणावरून भांडण होऊन वाद विकोपाला गेला. संतप्त तरुणाने खोलीतील दगडी पाटा वरवंटा महिलेच्या डोक्यात मारून तिची हत्या केली. या वेळी घटनास्थळी तातडीने पोलिस पथकासह दाखल झालेले भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार यांनी चौकशी केली. त्यानंतर या प्रकरणी तातडीने पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक देशमुख, भिवंडी शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव कुंभार,पोलिस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तपासा साठी तैनात केली होते. त्यांना हा आरोपी आपल्या मूळ गावी पळून गेला असल्याची माहिती मिळाली.

पोलिस उपनिरीक्षक रवींद्र पाटील, पोलिस शिपाई नितीन नंदीवाले, संजय भोसले हे तातडीने त्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले. आरोपीस आपल्या मूळगावी जाण्यासाठी पश्चिम बंगाल येथील खरगपूर रेल्वे स्थानकात रेल्वे बदली करावी लागते. त्यामुळे आरोपी हा गीतांजली एक्स्प्रेस मधून खरगपूर रेल्वे स्थानकात उतरताच पोलिस पथकाने आरोपी आकाशकुमार उर्फ पप्पू देवेंद्र मलिक यास ताब्यात घेतले. न्यायालयाने १ डिसेंबरपर्यंत आरोपीस पोलिस कोठडी ठोठावली आहे.

Comments
Add Comment