- अर्थभूमी : उमेश कुलकर्णी
भारत आणि चीन या दोन देशांत सातत्याने स्पर्धा सुरू असते. तेथील स्वस्त उत्पादनांची भारतीयांना नेहमीच भुरळ पडत आली आहे. भारतीय बाजारपेठा तर चीनच्या उत्पादनांनी भरून वाहत असत. अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चीनचे हे भारतीय बाजारपेठेतील वर्चस्व मोडून काढण्यासाठी त्यांच्या काही पोर्टल्सवर बंदी घालण्याचा मार्ग अनुसरावा लागला. हा धोका भारताने वेळीच ओळखला म्हणून त्यावर उपाययोजना केली गेली. आता भारतासाठी सुखद स्थिती आली आहे. प्रख्यात गुंतवणूकदार मोबियस मार्क यांनी एका विधानाने सर्वांना चकित तर केले आहे, पण भारतीय बाजारपेठांमध्ये हास्याची झुळूकही पसरवली आहे. मोबियस यांच्या मते, सध्या चीनमध्ये जी मंदी आली आहे तिचा सर्वात मोठा लाभ भारताला होत आहे. चीनमधील बाजारपेठांमध्ये मंदी असल्याने त्याचा सर्वाधिक लाभ हा भारत घेत आहे. भारतात जो पैसा येत आहे तो अगदीच महत्वपूर्ण आहे आणि सातत्याने त्यात वाढच होत आहे, असे मोबीयस यानी म्हटले आहे. १९८८ पासून चीनमधील थेट परकीय गुंतवणूक आता प्रथमच सप्टेंबरच्या तिमाहीत उणे अंकांमध्ये आली असल्याचे मोबियस यांनी सांगितले. यात अधिक चांगली बाब अशी आहे की केवळ पोर्टफोलिओ गुंतवणूकच नव्हे तर खासगी गुंतवणूकही वाढत आहे. खासगी गुंतवणूक वाढली तर भारतात रोजगार निर्मिती वाढते आणि त्यामुळे अर्थातच उत्पादनाचा ओघ वाढतो, हे तर सिद्धांतच आहेत. शांघाय स्टॉक एक्सचेंजमध्ये १९८८ पासून प्रथमच ३०० पैकी सर्वोच्च टॉप कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी कोसळली आहे आणि ती आता उणे झाली आहे. हा खरेतर चीनसाठी मोठा धक्का आहे. गेल्या १२ महिन्यांत या कंपन्यांनी ६ टक्के इतका उणे परतावा दिला आहे. मोबीयस यांना गुंतवणुकीसाठी उभरत्या बाजारपेठांचे गॉडफादर म्हणूनही ओळखले जाते. भारतीय कंपन्यांसाठी जो गुंतवणूक परतावा येत आहे, त्यामुळे मोबियस विशेष प्रभावित झाले आहेत. मोबीयस यांच्या मते जेव्हा आम्ही भारतीय बाजारपेठांचे निरीक्षण करतो, तेव्हा कितीतरी कंपन्यांच्या गुंतवणुकीवर उच्च परतावा मिळतो. गुंतवणुकीवर परतावा हा अर्थशास्त्रातील कंपनीची कामगिरी तोलण्यासाठी उत्तम निकष आहे. चांगल्या अर्थव्यवस्थेचे हे एक उत्तम निदर्शक लक्षण आहे. त्याचा अर्थ असा होती तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी भरपूर पैसा आहे आणि यावर परतावाही चांगला मिळतो आहे. ८७ वर्षीय मोबियस यांच्या मते आम्ही पाहिलेली ही एक रंजक अशी घटना आहे.
चीनला मंदीने घेरले आहे आणि त्यामुळे त्यांची उत्पादकता थंडावली आहे. त्यात काही उत्पादने ही बंद झाली आहेत. कोणत्याही अर्थव्यवस्थेत असे चढ-उतार येत असतात. पण चीनने इतरांच्या दौर्बल्याचा फायदा घेत आतापर्यंत आपली अर्थव्यवस्था सुधारली आहे. आता त्यांना त्यांचेच औषध मिळाले आहे. मार्क मोबियस यांच्या मते येत्या पाच वर्षांत सेन्सेक्स एक लाख रुपयाची पातळी गाठेल. तसे झाले तर भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. मोबियस पुढे म्हणतात की पुढील जनरेशन म्हणजे १५ ते २५ वयोगटातील तरुण भारतीय कंपन्यांसाठी उत्तम प्रेरक आहे. भारताकडे कंपन्या जेव्हा आकर्षक प्रस्ताव म्हणून पाहतात त्यांत या तरुणांचा वाटा फार मोठा आहे. या तरुणपिढीचा लाभ उठवण्याचा प्रयत्न जग करेल आणि हे तरुण अधिकाधिक श्रीमंत होत आहेत. सर्वजग भरातील कंपन्या या तरुणांचा लाभ उठवण्याचा प्रयत्न करतील. हे तरुण महत्त्वाकांक्षी आहेत. त्यामुळे त्यांचा कंपन्यांना लाभच होणार आहे. खर्च करण्याची त्याची इच्छा आहे आणि त्यातून भारतात नवीन अर्थव्यवस्था उभी राहील, असा मोबियस यांना विश्वास वाटतो. मोबियस यांनी मोबियस कॅपिटल पार्टनर्सच्या संचालक पदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या मते आम्ही अशा कंपन्या शोधत आहोत की ज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता अधिक तीव्रतेने उपयोगात आणली जात आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थेचे जेथे डिजिटलायझेशन झाले आहे आणि विशेषतः उभारत्या बाजारपेठांमध्ये त्यांना जास्त अपेक्षा आहे. भारत हा अर्थातच त्यासाठी सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे, असे मोबीयस म्हणतात. चीनकडून निर्यात कमी झाली तर कमोडिटी मार्केट्स म्हणजे वस्तूच्या बाजारपेठेला धक्का बसू शकतो. कारण ही बाजारपेठ चीनकडून आयात होणाऱ्या आयातीसाठी अत्यंत संवेदनशील आहे.
चीनने जर धातू आणि इतरही तत्सम वस्तू कमी किमतीवर निर्यात करण्यास सुरुवात केली, तर मागणी कमी असल्याने भारतीय उत्पादकांना त्याचा फायदा होऊ शकतो. अर्थात भारताचे अर्थसचिव टी सोमनाथन यांचे मत मात्र वेगळे आहे. त्यांच्या मते, चीनमधील मंदीचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही. सरकार भांडवली विनिमयास रेटा देत राहील. आज चीन ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली असली तरीही सध्या तिची गती मंदावत आहे. त्यामुळे भारताला त्याचा नक्कीच लाभ होणार आहे. याचा अर्थ असा नव्हे की भारत चीनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून पुढे जाणार आहे. तो पल्ला गाठण्यासाठी अजून बराच अवकाश आहे. सोमनाथन यांच्या मते भारतापेक्षा चीनकडे वित्तीय तूट कितीतरी जास्त आहे. त्यामुळे चीनच्या मंदीचा भारतावर नकारात्मक परिणाम फारसा होणार नाही. जो आर्थिक डाटा नुकताच जारी करण्यात आला आहे त्यानुसार चीनमध्ये असलेली मंदी ही अधिक सखोल, कायमस्वरूपी असेल, असाच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भांडवली खर्च हा कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आवश्यक घटक मानला जातो. सध्या भारतात भांडवली खर्च म्हणजे केवळ सरकारी खात्यात जास्त आहे, खासगी गुंतवणूक तर थांबली आहे. रस्ते, महामार्ग, पूल आदी बाबतीत खर्च केला जातो. पण सोमनाथन यांच्या मते ज्या मंत्रालयांना त्यांची मागणी असेल त्याप्रमाणे निधी पुरवण्यात येईल. केवळ भारताचा प्रश्न खर्च करण्याची क्षमता हाच आहे. एप्रिल ते सप्टेंबर या काळात मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक केली जाईल, अशी अपेक्षा आहे. भारताचे लक्ष्य यापुढे चीनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून जाण्याचे असले पाहिजे. ते साध्य करण्यास खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. जूनमध्य़े जागतिक रेटिंग एजन्सी मुडीजने चीनच्या वाढीचे भाकीत कमी केले. दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनची वाढ आता ३.५ टक्के असेल असे भाकीत करण्यात आले आहे. वास्तविक पूर्वी ते ४.५ टक्के इतके होते. देशांतर्गत आणि भूराजकीय कारणांसाठी चीन मंदीला सामोरे जात आहे. भारताने आता आपले उत्पादन क्षेत्र अधिकाधिक जोरकस करून गुतवणुकीला आकर्षित केले पाहिजे. भारत आता चीनला पर्यायी गुंतवणुकीचे स्थळ म्हणून उदयास येत आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. भारताचा लाभ आणि चीनचे नुकसान हे हातात हात घालून चालले आहेत. भारताच्या दृष्टीने अत्यंत सुखद असे चित्र आहे. चीनची अर्थव्यवस्था आज अगदीच डळमळीत झाली नसली तरीही तिला कुठेतरी जोरदार धक्का बसला आहे. त्यात मोदी यांनी चिनी वेबसाईट्स बंद करून चीनला आणखी जोरदार दणका दिला आहे. त्यामुळे चिनी उत्पादने भारतात येण्यास आता निश्चितच बंधने आली आहेत. तसेच भारतीयांचे चिनी वस्तूंबद्दलचे आकर्षणही उतरले आहे. त्यामुळेही चीनला फटका बसला आहे. चीनमध्ये मंदी किती काळ राहील हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत ती आहे तोपर्यंत भारताला लाभ करून घेता येईल.