
आध्यात्मिक पुस्तके हमखास मिळण्याचे मुंबईतील ठिकाण म्हणजे गिरगावातील बलवंत पुस्तक भांडार. डिजिटलच्या युगात वाचन संस्कृती कमी होत चालली असली तरी देखील, आजही आध्यात्मिक पुस्तके वाचण्याची अनेकांना ओढ आहे. हा अनेक पिढ्यांचा प्रवास निरंतर सुरू आहे. याविषयी दैनिक प्रहारच्या ‘गजाली’ कार्यक्रमात गिरगाव येथील आध्यात्मिक व धार्मिक पुस्तक भांडारचे संचालक मकरंद परचुरे यांनी संवाद साधला. दैनिक प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे, संपादक डॉ. सुकृत खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी गप्पांचा फड रंगला तो केवळ आध्यात्मावर. पुस्तकांबरोबर सुरू झालेल्या आपल्या आध्यत्मिक प्रवासातील अनेक आठवणींना मकरंद परचुरे यांनी उजाळा दिला.आपल्याला आलेले अद्भुत अनुभव त्यांनी कथन केले.
अल्पेश म्हात्रे
पूर्वीच्या काळी प्रपंच करून झाला की, माणूस आध्यात्माकडे वळत होता. आता मात्र तरुणपणीच आध्यात्माकडे वळण्याचा जुन्या पिढीबरोबरच नव्या पिढीचा ओढा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. आध्यात्मिक पुस्तके व ज्याेतिषांचा सल्ला घेऊन नव्या जोमाने पुन्हा पुढे जाण्याचा आत्मविश्वास अंगी येतो असे वाचकांना वाटते. गिरगाव येथील बलवंत पुस्तक भांडारचे संचालक मकरंद परचुरे यांनी गुरुवारी प्रहार आयोजित ‘गजाली’ कार्यक्रमात प्रहार टीमसोबत संवाद साधला. त्यांनी आपला पूर्वीचा संघर्षाचा काळात ते गिरगावातील आध्यात्मिक पुस्तकांचे एक मोठे दालन कसे तयार केले याचा प्रवास सांगितला. या वेळी ते म्हणाले की, आध्यात्मिकतेकडे वाढत चाललेला ओढा ही एक चांगली सुखावणारी बाब असली तरी पुस्तके वाचणाऱ्यांचे प्रमाण मात्र खूपच कमी होत चालले आहे.
त्यांनी या पुस्तक भांडारातील आपल्या अनेक आठवणी सांगितल्या, ते आजोबांच्या बरोबर पुस्तकाच्या दुकानात जाऊन बसत. तेव्हा मोठ मोठे साहित्यिक दुकानात येत व गप्पांचा फड रंगत असे. त्या दुकानात एक बाकडे आहे. त्या बाकड्यावर अनेक दिग्गज मंडळी बसून गेली आहेत. त्या ठिकाणी विचारांची देवाण-देवाण झाली. त्यामुळे त्या बाकड्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच ते जेथे बसतात, त्या खुर्चीला देखील एक वलय प्राप्त झाले आहे. कारण त्या खुर्चीवर अनेक महंत, साधू- संत, विचारवंत बसून गेले आहेत म्हणूनच अनेक महान व्यक्तींचा वावर असणाऱ्या या पुस्तक भांडाराला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
परचुरेंनी या पुस्तक भांडाराबरोबर जोडलेल्या आपल्या अनेक आठवणी सांगितल्या. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच हा पुस्तकांचा पसारा नंतर इतका वाढला की, एअर इंडियाची नोकरी चालून आली असताना आपण मात्र वडिलांना साथ देण्याच्या उद्देशाने ती नाकारली आणि दुकानात रमलो. हा व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय घेतला. मात्र ऑनलाइन व झटपट हवे असणाऱ्यांच्या आताच्या पिढीला पुस्तके वाचून अथवा त्याचे सार जाणून घेण्यात रस नाही याची खंतही त्यांना वाटते. ज्योतिष एक शास्त्र आहे, मात्र त्याच्या जास्त आहारी जाऊ नये असे त्यांनी आवर्जून सांगितले. तर प्रत्येकाचा जास्त भर हा आपल्या कर्मावर व नामस्मरणावर हवा असा सल्लाही त्यांनी दिला. देवळात जाणे आवश्यक आहे, यावर बोलताना ते म्हणाले की, देवळात जाऊन आपल्याला मनशांती मिळते तसेच तेथील स्थानालाही खूप महत्त्व असते, तेथील लहरींचा आपल्यावर सकारात्क प्रभाव पडतो. त्यासाठी देवळात जावे. अलीकडे वास्तुशास्त्राचा बाजार झाला आहे असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले, वास्तुशास्त्रावर आपला अजिबात विश्वास नाही.
कारण वास्तुशास्त्राप्रमाणे आपल्या घरात बदल घडवून आणणे सर्वांनाच शक्य नसते. पूर्वीची घरे ही मानवी गरज बघून बांधली गेली होती. त्यांना शौचालय बाहेर होते. आता शौचालय घरात आल्याने मानवी जीवनात थोड्याफार समस्या निर्माण झाल्या आहेत. कारण वास्तूमध्ये नकारात्क लहरींचा प्रभाव पडतो. मात्र त्याला आता पर्याय नाही. घरातील धार्मिक वातावरण व नामस्मरणाने परिस्थितीत बदल केला जाऊ शकतो. समाजात स्वतःला वास्तुशास्त्रज्ञ म्हणणाऱ्यांचाही सुळसुळाट झाला आहे. प्रत्येक व्यक्तीने नामस्मरणावर भर दिला पाहिजे, नामस्मरणाने मनाची शक्ती वाढते. नामस्मरण करतेवेळी कोणाचेही नाव घ्या, शेवटी ते एकाच ठिकाणी पोहोचते.
ईश्वरभक्ती करताना सुद्धा मनापासून करा. आपले दुर्दैव असे की, आपण आता इतर धर्मातील अथवा पाश्चात्त्य संस्कृती अंगीकारतोय, आपली संस्कृती आपण विसरतोय, त्यामुळे आपलेच नुकसान होत आहे. एकीकडे मराठीचा बालेकिल्ला असलेला गिरगाव आता मराठी टक्का कमी झाल्यामुळे व इतर संमिश्र भाषिकांची वाढ झाल्याचे बघून आपल्याला वाईट वाटते. त्यामुळे मराठी संस्कृती हळूहळू लोप पावत चालली आहे. जीवनात प्रत्येकाने भगवद्गीता ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथेचा अभ्यास केला पाहिजे. तसेच नामस्मरणाला कोणताही पर्याय नाही. नामस्मरणाची कधीही माळेवर मोजदाद करू नये, त्याने मीपणा वाढतो, आपण या धर्तीवर कोणीही नाही, मी पणा सोडला पाहिजे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
वाचनाला आध्यात्मिकतेची जोड
वैष्णवी भोगले
गिरगावातील ‘बलवंत पुस्तक भांडार’चे संचालक मकरंद परचुरे यांच्याशी वाचनाला अाध्यात्मिकतेची जोड याविषयी खूप साऱ्या गप्पा रंगल्या. १९०१ साली पुराणिक आणि मंडळी या नावाने माधवबाग येथे पुस्तक व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. गिरगावातील पुस्तक भांडार हे अाध्यात्मिक आणि धार्मिक पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहे.
त्यांनी आपल्या प्रकाशन संस्थेंतर्गत आध्यात्मिक, मन:शांती देणाऱ्या साहित्यावर आधारित पुस्तक प्रकाशनांवर भर दिला. तणावमुक्तीचे उपाय सुचवणारी पुस्तके, संगीत, योग, ज्योतिष आदी विविध विषयांवरील पुस्तके मिळण्याचे हे ठिकाण आहे. ते प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असले तरी ते ज्यांच्याकडे समाजाला देण्यासारखे, सांगण्यासारखे ठोस काही आहे, अशा व्यक्तींना शोधून काढत, त्यांची गाठभेट घेऊन त्यांना लिहिण्यासाठी प्रवृत्त करत. नव्या लेखकांचा ते सातत्याने शोध घेत असत. मनोहर जोशी, नीला सत्यनारायण यांसारख्या दिग्गज व्यक्तींचा वारसा त्यांना लाभला आहे. त्याचबरोबर त्यांनी नव्या लेखकांनाही प्रोत्साहन दिले.
आचार्य अत्रे यांचे अप्रकाशित साहित्य शोधून ते ‘अप्रकाशित अत्रे’ नावाने प्रकाशित करण्याची कल्पना नरेन परचुरे यांचीच होती असे मकरंद परचुरे म्हणाले. ‘नवयुग वाचनमाले’चे सहा संच शाळा-शाळांमध्ये अवांतर वाचनासाठी उपलब्ध करून देण्याचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. बालमोहन शाळेने हे संच अवांतर वाचन-अभ्यासासाठी मुलांना दिले. परचुरे प्रकाशन संस्था ही अनेक मोठ्या लेखकांचे लिखाण प्रकाशित करणारी प्रतिष्ठित संस्था म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर,आचार्य अत्रे, ना. सी. फडके, जी. ए, कुलकर्णी अशा प्रख्यात लेखकांचे साहित्य प्रकाशित करत ‘परचुरे प्रकाशन’ने आपली एक अभिजात परंपरा निर्माण केली. मोठ्या लेखकांशी त्यांनी प्रकाशनाची परंपरा जोडून ठेवली. मात्र त्यांनी स्वत: व्यवसायाची सूत्रे हातात घेतल्यानंतर जुन्याबरोबरच नव्या लेखकांनाही जोडून घेण्याचा प्रयत्न संचालक मकरंद परचुरे यांनी केला.
‘वाचनाचा लळा, फुलवी जीवनाचा मळा’ कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी ग्रंथांचे व वाचनाचे महत्त्व याचे अतिशय सुरेख वर्णन केले आहे. आजचा विचार करता मुलांच्या वाचनासाठी शिक्षक आणि पालकवर्ग किती जागृत आहे ही चिंतनीय बाब आहे. अध्ययनासाठी व ज्ञान ग्रहणासाठी वाचन हे अतिशय महत्त्वाचे कौशल्य आहे. आज शहरातील खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांवरचा अभ्यासाचा ताण व महाविद्यालयीन युवकांचे मोबाइल वेड, बिझी शेड्यूल यातून या सर्वांना अवांतर वाचनाची संधी मिळायला हवी आणि अशी संधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकांनी सतत प्रयत्नशील असायला हवे. माहिती-तंत्रज्ञान झपाट्याने आपल्याला कवेत घेतयं हे खरं आहे पण म्हणून वाचनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वाचन आपली बुद्धिक्षमता वाढवण्यास आणि जीवनाबद्दल नवीन दृष्टिकोन प्रदान करण्यास मदत करते. चांगली पुस्तके तुमच्यावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतात आणि आयुष्यात तुम्हाला योग्य दिशेने नेतात. आपण जितका अधिक अभ्यास कराल तितके आपण वाचनाच्या प्रेमात पडत जातो असे परचुरे म्हणाले. वाचक वर्ग कमी असो वा जास्त अनेक वाचक हे भीतीपोटी अाध्यात्मिक, ज्योतिष आदी पुस्तके वाचतात. आताची तरुण पिढी ही हातचे सोडून पळत्याच्या मागे धावत असते. त्यामुळे प्रत्येकजण आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींच्या भीतीपोटी तणावमुक्तीचे उपाय सुचविणाऱ्या पुस्तकांचा शोध घेत असतात. कारण त्यामधून आपल्याला सकारात्क गोष्टी आत्मसात करता येतील. तसेच आजच्या पिढीने भगवतगीता, दासबोध, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा अभ्यासले तरी खूप आहे. नेहमी एक पुस्तक वाचा व आपण त्या पुस्तकामधून काय शिकलो याचे चिंतन करा, असे परचुरे यांनी सांगितले.