पुणे : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे (Shri Ram Mandir) निर्माण पूर्णत्वास आले असून लवकरच प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. यानिमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी येत्या ८ महिन्यांत राज्यातील १५ लाख भाविकांना अयोध्येतील श्री राम मंदिरात दर्शनासाठी नेण्यात येणार असल्याची घोषणा केली. देशातील सर्वात मोठी दिवाळी २२ जानेवारी २०२४ रोजी साजरी होणार आहे, अशी घोषणा बावनकुळे यांनी यावेळी केली.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने मेरी माटी, मेरा देश अंतर्गत सेल्फी विथ मेरी माटी उपक्रमाची नुकतीच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. हा विश्वविक्रम यशस्वी करण्यात योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी रविवारी पुण्यात एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बावनकुळे बोलत होते. ते म्हणाले की, राजेश पांडे यांच्यावर येत्या ८ महिन्यात राज्यातील लाखो भाविकांना अयोध्येतील श्री राम मंदिराच्या दर्शनासाठी नेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
बावनकुळे म्हणाले की, देशात राबविण्यात आलेला मेरी माटी, मेरा देश’ हा उपक्रम ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांना समर्पित आहे. देशातील १ कोटी ४० लाख नागरिकांनी या उपक्रमात भाग घेतला. राज्यातील ‘सेल्फी विथ मेरी माटीचा जागतिक विक्रम कौतुकास्पद असून चीनला मागे टाकल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमात विश्वविक्रमासाठी योगदान देणाऱ्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. या विश्वविक्रमासाठी सुमारे २५ लाख नागरिकांनी सेल्फी पाठवले. पांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, जागतिक विक्रमासाठी सुमारे १० लाख ४२ हजार सेल्फींचा विचार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले.
कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर, कुलसचिव डॉ. विजय खरे, राष्ट्रीय सेवा योजना सल्लागार समिती सदस्य राजेश पांडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरात येत्या २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत. मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, तीन मजली राम मंदिराच्या तळमजल्याचे बांधकाम डिसेंबरअखेर पूर्ण होईल आणि २२ जानेवारीला अभिषेक सोहळा होणार आहे.