Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीकापणी केलेली भातपिके तरंगली पाण्यावर!

कापणी केलेली भातपिके तरंगली पाण्यावर!

भात, पेंढा, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी

वाडा : वाडा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाने शेतात कापून ठेवलेल्या भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून नेत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. भाताबरोबरच पेंढा, भाजीपाला पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान, पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून मुख्यमंत्र्याकडे करण्यात येत आहे.

वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. यावर्षी पाऊस समाधानकारक पडला असल्याने उत्पन्न चांगले आहे. भातपिक सर्वत्र पिवळ्या सोन्यासारखे चमकत होते. हळव्या व निमगरव्या भाताची कापणी झाली होती, आता गरव्या भाताची कापणी सुरू असतानाच रविवारपासून पाऊस पडत असल्याने शेतात कापून ठेवलेल्या करपांवर पाणी गेल्याने ती तरंगु लागली आहेत, त्यामुळे भात व पेंढा असे दोन्हीही खाण्यायोग्य न राहिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

हळवे व निमगरव्या भाताची कापणी करून शेतकऱ्यांनी आपल्या भाताची उडवी शेतात किंवा खळ्यावर रचून ठेवली होती, त्यातही पाणी गेल्याने भाताच्या दानाचे तुकडे पडणार असून, त्यामुळे व्यापारी हे तांदुळ आता घेणार नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तर पेंढाही काळा पडणार असून, तो जनावरांना खाण्यास योग्य राहणार नाही.

भात पिकांबरोबर पेंढा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, हा पाऊस रब्बी पिकांसाठी दिलासा देणारा मानला जात आहे. रब्बीसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे. तालुक्यातील बिलावली येथील संदीप पाटील यांच्या शेतात कापून ठेवलेले भातपिक शेतातच तरंगु लागले. खरीवली येथील बबन बागुल यांचे १५० भातांच्या भाऱ्यांचे नुकसान झाले असून, हीच परिस्थिती संपूर्ण तालुक्याची आहे.

शेतकरी भात झोडून झाल्यानंतर तो व्यापाऱ्यांना पेंढा विकत असतो. त्यानंतर व्यापारी त्यांचे मोठे गठ्ठे बनवून मुंबई, वसईतील तबेल्यांना विकत असतात, मात्र अवकाळी पावसाने पेंढा व्यापाऱ्यांचे लाखोंनी नुकसान झाले आहे.

दरम्यान, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पष्टे यांनी मुख्यमंत्री, कृषीमंत्र्यांकडे केली आहे.

कापणी केलेल्या भाताची कडपे दोन दिवस उन्हात सुकण्यासाठी ठेवली असता गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पडत असलेल्या पावसाने करपे भिजली असून, काही ठिकाणी ती तरंगु लागली आहेत. लोंगामधील भाताचे दाणे परिपक्व असल्याने या दाण्यांना शेतातच कोंब फुटू लागले आहेत. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, गावागावात हीच परिस्थिती पहावयास मिळत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -