जव्हार : जव्हार तालुक्यातील हातेरी (बोरीचा पाडा) गावातील १५ वर्षीय इ. ९वीतील शाळकरी विद्यार्थिनी गेल्या आठवडाभरापासून बेपत्ता आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जव्हार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, जव्हार हातेरी येथील सपना शिवराम खानझोडे (वय १५ वर्षे) ही विद्यार्थिनी भिवंडी तालुक्यातील गाडगे महाराज आश्रमशाळा भिवाळी येथे इ. ९वीत शिक्षण घेत आहे. ही मुलगी दीपावलीच्या सणानिमित्त आश्रमशाळेत सुट्टी असल्याने तिच्या घरी आली होती.
दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ती आश्रमशाळेत गणेशपुरी येथे स्पर्धा खेळण्यासाठी जाते असे सांगून गेली, मात्र त्यानंतर ती शाळेतून घरी आलेली नसून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन किंवा काहीतरी फुस लावून अथवा आमिष दाखवून पळून नेले आहे, असा संशय त्यांच्या कुटुंबाचा आहे.
त्या मुलीच्या कुटुंबाने जव्हार पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. बेपत्ता झालेली विद्यार्थिनी सपना हिचा रंग गव्हाळ, चेहरा गोल, उंची ४ फूट आणि गळ्यात साधी चेन, हातात पिवळ्या प्लास्टिकच्या बांगड्या, पायात सँडल, निळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस, सोबत शाळेची बॅग, मराठी भाषा बोलणारी असून वरील वर्णनाच्या मुलीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास जव्हार पोलीस ठाण्यात संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.