
- गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण
मागील आठवड्यात टाटा ग्रुप हा ‘टाटा टेक्नॉलॉजीज’ हा आयपीओ घेऊन आला. आयपीओची खरेदीसाठी बोली लावण्याची प्रक्रिया २२ नोव्हेंबरला सुरू होऊन ती २४ नोव्हेंबरला संपली. टाटा ग्रुप हा जवळपास २० वर्षांनी आयपीओ घेऊन आला आहे. यापूर्वी २००४ मध्ये टाटांची दिग्गज आयटी कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (टीसीएस)चा आयपीओ बाजारात आला होता.
‘टाटा टेक्नॉलॉजीज’ ही एक आघाडीची जागतिक अभियांत्रिकी सेवा कंपनी असून जागतिक स्तरावर मूळ साधन उत्पादकांना उत्पादन विकास आणि डिजिटल उपाय प्रदान करते. तसेच कंपनी संकल्पना डिझाइन, टीअर-डाऊन आणि बेंचमार्किंग, वाहन आर्किटेक्चर, बॉडी आणि चेसिस इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम आणि डायग्नोस्टिक्स इत्यादी सेवा उपलब्ध करून देते. तर कंपनीची जागतिक स्तरावर १८ वितरण केंद्रे आहेत. जिथे ११००० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल. म्हणजे त्यातील संपूर्ण रक्कम प्रवर्तक टाटा मोटर्ससह विक्री करणाऱ्या भागधारकांना जाईल. ऑफर फॉर सेल अंतर्गत टाटा मोटर्स ४.६२ कोटी शेअर्स, अल्फा टीसी होल्डिंग्स ९७.१० लाख शेअर्स आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड ४८ लाख शेअर्सची विक्री करेल.
टाटा टेक्नॉलॉजीज आयपीओच्या इश्यूचा आकार आधीच्या ९.५७ कोटी शेअर्सवरून ६.०८ कोटी इक्विटी शेअर्सवर कमी करण्यात आला आहे. कंपनीने या वर्षी मार्चमध्ये सेबीकडे आपली कागदपत्रे दाखल केली होती आणि जूनमध्ये नियामकाकडून मंजुरी देण्यात आली. इश्यूमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजने टाटा मोटर्सच्या पात्र भागधारकांसाठी १०% कोटा राखून ठेवला होता. फेस व्हॅल्यू २ असणाऱ्या या शेअरसाठी प्राईज बँड अर्थात खरेदी मागणी पट्टा हा ४७५ ते ५०० होता. किमान खरेदीसाठी एका लॉटसाठी ३० शेअर्सच्या पटीत मागणी करावयाची होती. अपेक्षेप्रमाणे हा आयपीओ ओव्हर सबस्क्राइब झाला आहे. आता ह्या कंपनीचे लिस्टिंग कसे होते, याकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेले आहे. आता हा शेअर ५ डिसेंबर २०२३ ला लिस्ट होईल.
अल्पमुदतीसाठी निर्देशांकाची दिशा आणि गती तेजीची आहे. पुढील आठवड्यासाठी निर्देशांक निफ्टीची १९९०० ही अत्यंत महत्त्वाची विक्रीची पातळी आहे. निर्देशांक जोपर्यंत या पातळीच्या खाली आहेत. तोपर्यंत निर्देशांकात मोठी तेजी येणार नाही. मध्यम मुदतीसाठी सेन्सेक्स निफ्टीची १९४०० ही महत्वाची खरेदीची पातळी असून यापुढील काळात जर ह्या पातळ्या तुटल्या तरच शेअर बाजारात आणखी मोठी घसरण होवू शकेल. अजूनही निर्देशांक ‘नो ट्रेड झोन’ मध्ये आलेले आहेत. आता जोपर्यंत निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीची दिशा स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ‘होल्ड कॅश इन हॅंड’ हेच धोरण अवलंबणे योग्य ठरेल. पूर्वी खरेदी केलेल्या शेअर्समध्ये स्टॉपलॉस पद्धतीचा वापर करावा, करणे योग्य ठरेल. शेअर्स खरेदी - विक्री करीत असताना स्टॉपलॉसचा वापर करणे आवश्यक आहे. शुक्रवारी निफ्टी १९७९४ अंकांना बंद झाली.
सोने या धातूचा विचार करता ६१९०० ही अत्यंत महत्त्वाची विक्री पातळी असून जोपर्यंत सोने या पातळीच्या खाली आहे तोपर्यंत सोन्यात मोठी वाढ होणार नाही. कच्च्या तेलाचा विचार करता कच्चे तेल ६५०० ते ६१७० या पातळीत अडकलेला असून ज्यावेळी या पातळीतून कच्चे तेल बाहेर पडेल त्यानंतर कच्च्या तेलात वाढ किंवा घसरण होईल.
samrajyainvestments@gmail.com