सिडको (प्रतिनिधी)– किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून १६ वर्षीय मुलाचे एका वाहनातून अपहरण करण्यात आले होते. यावेळी त्यास मारहाण करत असताना त्याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी अंबड पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार २४ नोव्हेंबरला मृत राजा गब्बर सिंग याचे संशयितांबरोबर किरकोळ भांडण झाले होते. याचा राग मनात धरून २५ नोव्हेंबरला संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास मृत राजा सिंग यास अंबड गाव बसं स्थानक येथून अपहरण करीत त्यास एका खडी क्रेशर येथे नेऊन मारहाण करण्यात आली होती.
ही मारहाण करीत असतांना राजा गब्बर सिंग याचा मृत्यू झाला.तो मृत झाला असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यास संशयतांनी वाडीव-हे परिसरानजीक एका हॉटेल नजीक नेऊन फेकून दिले. सकाळी आठ वाजेच्या सुमारास याच भागात गायी चारणा-या गुराख्यास मृत राजा सिंग दिसल्याने वाडीवऱ्हे पोलिसांना याबाबत कळवण्यात आले. या प्रकरणी त्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
मात्र राजा सिंग याचे वडील गब्बर सिंग यांनी अंबड पोलिसात अपहरण केल्याबाबत गुन्हा दाखल केला होता. याबाबत चौकशी करताना अंबड पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीदराने दिलेल्या माहिती नुसार मयत राजा सिंग याचे अपहरण करण्यात आले होते. यातील संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी केलेला मारहाणीत राजा सिंग याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरा पर्यत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. दरम्यान याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत खतेले करीत आहेत.