नवी दिल्ली : तुम्ही कस्टम विभागाचे नाव खूपदा ऐकले असेल पण आज अशी घटना समोर आली आहे जी जाणून थक्क व्हाल. यात एका सँडविचमुळे एका महिलेला कस्टम विभागाने रोखले आणि तिला मोठा दंडही ठोठाविण्यात आला. जर आपण भारतीय रुपयात बोललो तर हा दंड एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यूझीलंडची एक महिला ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यावर तिच्यासोबत हा प्रकार घडला. ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यावर तिने तिच्याकडे असलेल्या सँडविचबद्दल माहिती न दिल्याने तिला मोठा दंड भरावा लागला, तेव्हा ती अडचणीत आली. या महिलेचे वय ७७ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.
या महिलेने न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च विमानतळावर ग्लूटेन-फ्री चिकन आणि सॅलड सँडविच आणि मफिन घेतले होते. मात्र, विमानातून उतरताना तिची बॅग तपासली असता त्यात सँडविच आढळून आले. महिलेच्या निष्काळजीपणामुळे तिला तब्बल १ लाख ६४ हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला. या महिलेने क्राइस्टचर्च ते ब्रिस्बेन या फ्लाइटसाठी ग्लूटेन-फ्री चिकन आणि सॅलड सँडविच पॅक केले होते. फ्लाइटच्या साडेतीन तासांच्या प्रवासात सँडविच खाण्याचा महिलेचा बेत होता, पण ती सँडविच खायला विसरली. यानंतर विमान लँड झाल्यावर ब्रिस्बेनला पोहोचल्यावर तिने कस्टम डिक्लेरेशन फॉर्म पूर्ण केला, पण त्यात तिने सँडविचबद्दल लिहिले नाही.
महिलेची बॅग तपासली असता त्यात सँडविच आढळून आले. कस्टम डिक्लेरेशन फॉर्ममध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती न दिल्याने अधिकाऱ्यांनी तिला दंड ठोठावला आहे. जो तीन हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये १ लाख ६४ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. महिलेला विसरण्याची समस्या असल्याचे समजते.