विरोधी पक्षाने आणि मनोज जरांगें-पाटलांनी देवेंद्र फडणवीसांची जाहीर माफी मागावी
जालन्यातील आंतरवाली सराटी येथे शांततेत सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान दगडफेक करुन पोलीसांना लाठीचार्ज करण्यास भाग पाडणाऱ्या ऋषिकेश बेदरे-पाटील याला अटक करण्यात आली आहे. दगडफेक झाल्यानंतर दोनच दिवसांनी ऋषिकेश बेदरे ह्यांने शरद पवारांच्या भेटीला गेल्याचा फोटो पोस्ट केला होता. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आज आपली भूमिका मांडली.
नितेश राणे म्हणाले, जालन्यामध्ये झालेल्या दगडफेकीचा मास्टरमाईंड ऋषिकेश बेदरे दगडफेकींनंतर लगेचंच शरद पवारांच्या भेटीला जातो. त्यामुळे महाराष्ट्राला नेमकं कोण अशांत करण्याचा प्रयत्न करतयं याची उत्तरे महाराष्ट्राला मिळाली पाहिजेत. त्या दगडफेकींनंतर पोलीसांनी लाठीचार्ज का केला? कोणी आदेश दिले? यासाठी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरण्यात आले होते. आदरणीय देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आल्या त्याचबरोबर काड्या करण्याचे आरोप देखील करण्यात आले.
ऋषिकेश बेदरे-पाटील हा सामान्य कार्यकर्ता असुन त्याच्यामागे कोणी ताकद उभी केली? त्या दगडफेकीमागचे नेमके उद्दिष्ट काय? ही दगडफेक नेमकी कोणी करायला लावली? या सगळ्याची उत्तरे विरोधी पक्षाने आणि मनोज जरांगें-पाटलांनी द्यावी. आणि त्याच बरोबर सर्वांनी देवेंद्र फडणवीसांची जाहीर माफी मागावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली.