विशेष: स्वाती पेशवे
दिपावलीची ओळखच मुळात दीपांच्या लक्ष रांगोळ्यांमध्ये सामावली आहे. अनेक घरांमध्ये दररोज सांजवात लागत असली आणि शहरांमध्ये दर दिवशीच दिवाळीसारखाच दिव्यांचा झगमगाट बघायला मिळत असला तरी दिवाळीतल्या रोषणाईला लाभलेला मांगल्याचा परिaसल्याचे कोणीही नाकारणार नाही. महत्त्वाचे म्हणजे दिवाळीच्या मुख्य दिवसांनंतरही काही दिवस हा सण रुंजी घालताना दिसतो. सणाचे मुख्य दिवस सरले तरी तुळशी विवाहाच्या निमित्ताने तोच उत्साह आणि धार्मिकता घराच्या चौकटींवर चिकटून राहताना दिसते. मनातले दिवेही अजून लुकलुकतच असतात. त्याचा मंद प्रकाश दिवाळीतल्या आनंदाचे कोनाडे उजळवतच असतो. अशातच साजरी होते ती त्रिपुरारी पौर्णिमा. दिवाळीच्या मंगलपर्वातील असाच एक महत्त्वपूर्ण आणि झगमगीत दिवस.
आपल्या पोथ्यापुराणांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व विषद करून सांगितले आहे. समस्त जगताला त्रास देणाऱ्या राक्षसापासून सुटका करून घेण्यासाठी देवांनी शंकराकडे अर्चना केली तसेच मदतीसाठी शिवाची प्रार्थना केली. त्याला प्रतिसाद देत शंकराने या राक्षसांची तीन पुरे जाळून टाकली तसेच त्यांचा वध केला आणि जनांची छळापासून मुक्तता झाली. हाच दिवस देव दिवाळीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी केली जाते. ही कार्तिक पौर्णिमा इतर सर्व पौर्णिमांपेक्षा मोठी असते. त्यामुळेही त्रिपुरारी पौर्णिमा मेळ्याला विशेष महत्त्व आहे.
त्रिपुरारी पौर्णिमेला सायंकाळी लोक घरात तसेच घराबाहेरही दीप प्रज्वलित करतात. या दिवशीच्या पूजेला विशेष महत्त्व असते. घराबाहेर देवतांची पूजा केली जाते. त्यानंतर नदीमध्ये दिवे दान करून लोकोत्सव साजरा केला जातो. त्यामुळेच या दिवशी पवित्र नद्यांचे काठ दिव्यांनी उजळलेले दिसतात. अनेक ठिकाणी या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो. सार्वजनिक उद्यानांमध्ये, सोसायट्यांच्या प्रांगणांमध्ये दीप लावले जातात. कार्तिकी पौर्णिमा हा एकादशीपासून सुरू होणारा तुळशीच्या लग्नाचा शेवटचा दिवस असतो. याशिवाय कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी बुद्धांचा एक शिष्य, धम्म सेनापती सारीपुत्र याला निर्वाण प्राप्त झाले, असे बौद्ध मत आहे. त्यामुळेच पौर्णिमा मेळ्यात बौद्ध स्त्री-पुरुष उपोषण व्रत करतात. सर्व उपासक आणि भक्त बुद्धाला नमन करण्यासाठी आणि धम्म शिकवण घेण्यासाठी एकत्र जमतात. या अर्थानेही या पौर्णिमेचे महत्त्व लक्षात घेणे गरजेचे आहे.
दिवस एक असला तरी त्याच्याशी संबंधित कथांमध्ये तसेच साजरीकरणामध्ये मात्र वैविध्य पाहायला मिळते. उदाहरणार्थ, उत्तर भारतात पौर्णिमेचा हा दिवस स्कंदजयंती म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने स्कंदमूर्तीची (कार्तिकेयची) पूजा करतात. कार्तिक पौर्णिमेचा चंद्र कृतिका नक्षत्र असताना दिवशी स्कंदाचे म्हणजेच कार्तिकेयाचे दर्शन घेतल्यास भक्तांना मोठे पुण्य प्राप्त होत असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळेच या दिवशी कार्तिक स्वामींच्या मंदिरात विशेष गर्दी पाहायला मिळते. भाविक रांगा लावून देवाचे दर्शन घेतात. कार्तिकेय हा शिव आणि पार्वतीचा पुत्र आहे. स्त्रियांनी इतर वेळी कार्तिकेयाचे दर्शन घेऊ नये असा प्रघात आहे. मात्र कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया कार्तिकेयाचे दर्शन घेऊ शकतात. त्यामुळेच या दिवशी या देवतेच्या दर्शनाला महिलांची विशेष गर्दी पाहायला मिळते. या दिवशी कृतिका महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यामध्ये शिवपूजनाचे विशेष महत्त्व दिसून येते.
याच दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला अशी श्रद्धा आहे. त्यामुळेच या दिवशी शिवाबरोबर विष्णूचीही पूजा केली जाते. हा भगवान विष्णूचा पहिला अवतार आहे. मत्स्य पुराणानुसार, प्रलय संपेपर्यंत वेद, सप्तऋषी, धान्य आणि राजा सत्यव्रत यांचे रक्षण करण्यासाठी देवाला हा अवतार घ्यावा लागला. त्यामुळे विश्वाची निर्मिती पुन्हा सोपी झाली. आजही त्याचे स्मरण ठेवले जाते. त्यानिमित्ताने विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून देवाला आणि नंतर ते प्रसाद म्हणून भाविकांना अर्पण केले जातात. याला अन्नकोट आसन म्हणतात. देशाच्या प्रत्येक भागात त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा केला जातो. मंदिरातील दगडी दीप प्रज्वलित करून सायंकाळी वाती प्रज्वलित केल्या जातात. भगवान शंकरासमोर त्रिपुरी वात अर्पण करून भक्त उत्सव साजरा करतात. त्रिपुरवात नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारची असते. तिन्हीसांजेला दिवेलागण झाल्यानंतर ती घरातील देवांसमोर वा मंदिरांमध्ये प्रज्वलित केली जाते. त्रिपुरवात जळण्यास वेळ लागत असल्यामुळे विझेपर्यंत भाविक स्तोत्रपठण वा अन्य धार्मिक कृत्ये करतात. नामजप केला जातो. वात शांत झाल्यानंतर भाविक स्थान सोडतात. या दिवशी मंगल कार्ये केली जातात.
शास्त्रात या पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान करण्याचे मोठे महत्त्व सांगितले आहे. असे मानले जाते की, ही तिथी सृष्टीच्या सुरुवातीपासूनच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पुराणांमध्येही हा दिवस स्नान, उपवास आणि तपस्या या संदर्भात मोक्ष प्रदान करणारा सांगण्यात आला आहे. शिवपुराणानुसार तारकासुराला तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली असे तीन पुत्र होते. भगवान शिवाचा पुत्र कार्तिकेयाने तारकासुराचा वध केला तेव्हा त्याच्या पुत्रांना खूप वाईट वाटले. त्यामुळे देवांचा सूड घेण्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले. ब्रह्माजी प्रकट झाल्यावर त्यांनी अमर होण्याचे वरदान मागितले; परंतु ब्रह्माजींनी त्यांना याशिवाय दुसरे वरदान मागायला सांगितले. तेव्हा तिघेही ब्रह्मदेवाला म्हणाले, तू आमच्यासाठी तीन नगरे बांध. या शहरांमध्ये बसून आकाशातून संपूर्ण पृथ्वीभोवती फिरू आणि हजार वर्षांनी एका ठिकाणी भेटू. आपली तिन्ही नगरे एकत्र होतील, तेव्हा एकाच बाणाने त्यांचा नाश करणारा देवच आपल्या मृत्यूचे कारण होईल. ही इच्छा व्यक्त केल्यानंतर ब्रह्माजींनी त्या तिघांना वरदान दिले.
भगवान ब्रह्माकडून आपल्याला हवे ते वरदान मिळाल्यामुळे तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली यांना खूप आनंद झाला. ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून मयदानवांनी त्यांच्यासाठी तीन नगरे बांधली. त्यापैकी एक सोन्याचे, एक चांदीचे आणि एक लोखंडाचे होते. सोन्याची नगरी तारकाक्षची, चांदीची नगरी कमलाक्षची आणि लोखंडाची नगरी विद्यामालीची… आपल्या शौर्याने या तिघांनी या तिन्ही जगावर ताबा मिळवला. मात्र या राक्षसांच्या भीतीने इंद्राबरोबरच सर्व देव भगवान शंकराचा आश्रय घेण्यासाठी गेले. देवतांचे शब्द ऐकून भगवान शिव त्यांच्या मदतीला धावून गेले आणि या त्रिपुरांचा नाश करण्यास सज्ज झाले. देवांच्या आज्ञेनुसार विश्वकर्माने भगवान शिवासाठी एक दिव्य रथ बांधला. त्रिपुरांचा नाश करण्यात देवांनीही अनन्यसाधारण साथ दिली. जसे की, चंद्र आणि सूर्य दिव्य रथाची चाके बनले तर इंद्र, वरुण, यम, कुबेर हे लोकपाल रथाचे घोडे बनले. हिमालय धनुष्य बनला. एवढेच नाही, तर भगवान विष्णू स्वतः बाण बनले आणि अग्निदेव त्याचे टोक बनले. भगवान शिव अशा दिव्य रथावर स्वार होऊन त्रिपुरांचा नाश करण्यासाठी निघाले तेव्हा राक्षसांमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर दैत्य आणि देवतांमध्ये भयंकर युद्ध झाले. त्रिपुरी सरळ रेषेत येताच भगवान शिवाने दैवी बाण मारून त्यांचा वध केला. भगवान शिवाला त्रिपुरारी असे म्हणण्यामागील कारण त्यांनी या त्रिपुरांचा अंत करण्यामध्ये दडले आहे.
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्रिपुराची समाप्ती झाल्यामुळेच याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाते.
पुराणांमध्ये अशा अनेक कथा वाचायला मिळतात. परंपरेनुसार पुढील पिढीपर्यंत त्या पोहोचवल्या जातात. अर्थातच काळानुसार त्यातील सत्यासत्यतेवर चर्चा होते. समाज त्यापुढे अनेक प्रश्न उपस्थित करतो. त्यावर बरे-वाईट भाष्य केले जाते. या सगळ्यांमागे प्रत्येकाचा विचार वा धारणा असते. मात्र क्षणभर हे सगळे मतभेद वा मतमतांतरे बाजूला ठेवून विचार केला, तर लक्षात येते की, अशा प्रत्येक कथेमधून समाजाला काही एक शिकवण देण्याचा विचारच बघायला मिळतो. कारण समाज बदलला असला तरी सुष्ट आणि दुष्ट शक्तींमधील संघर्ष काही संपत नसतो. उपद्रव्यमूल्य दाखवून देणारे काही नतद्रष्ट सतत समाजातील स्वास्थ्य धोक्यात आणतच असतात. त्यांच्या त्रासाने व्यथित, भयभीत झालेला एक वर्ग प्रत्येक काळात त्रस्तता अनुभवतच असतो. अशांची मुक्तता करण्यासाठी कोणी तरी पुढे येण्याची आणि दुष्ट शक्तींचे अस्तित्त्व संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याची गरज असते.
त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस हेच सांगून जातो. तमाचा नाश होतो, तेव्हा घरे-दारे आणि लोकांची मने उजळून निघतात. देवळे-रावळे गजबजतात. लोकांचा वावर निर्धोक होतो. आजही याच जाणिवेने आणि अपेक्षेने हा दिवस साजरा करायला हवा. दुष्टांना अभय देणारी तीन पुरे जळाली, तशी जनांना नडणारी सगळी दु:खालये जळून तिथे सुखाची वहिवाट वाढो, ही अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करता येते.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…