नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे
दुष्यंतकुमार हे नाव हिंदी साहित्याचा परिचय असलेल्या रसिकांना नवीन नाही. उलट इतके जुने आहे की, अनेकजण ते विसरले असण्याचीही शक्यता आहे! पण ज्यांनी ‘इश्क, हुस्न, चांद, रुसवाई, मुहब्बत, जुदाई,’ या शब्दांच्या पलीकडची शायरी वाचली त्यांच्यासाठी हे नाव खूप महत्त्वाचे आहे. सत्तरीच्या दशकात हिंदीत क्रांतिकारी विचारांचे जे साहित्यिक होते त्यातले अग्रगण्य नाव म्हणजे ‘दुष्यंतकुमार त्यागी’. केवळ ४४ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या दुष्यंतकुमारबाबत निदा फाजली या प्रसिद्ध गीतकारांनी म्हटले होते, “दुष्यंतकी नज़र उनके युगकी नई पीढ़ीके ग़ुस्से और नाराज़गीसे सजी-बनी है।” (दुष्यंतकुमार यांची कविता त्यांच्या काळातील तरुणांच्या मनातील वैफल्य आणि उद्वेगाच्या भावनेवर फुलली आहे.)
या कवीच्या कविता इतक्या गाजल्या की भोपाळमध्ये त्यांच्या नावाने एक संग्रहालय स्थापण्यात आले. त्यांच्या नावे २००९ साली एक पोस्टाचे तिकीटही जारी करण्यात आले होते. दूरचित्रवाणीवरील अगणित कार्यक्रमात त्यांच्या कविता, शेर, आजही सामील केले जातात. स्टारप्लस वाहिनीवर झालेल्या “सत्यमेव जयते” या कार्यक्रमाच्या जाहिरातीत ‘सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही, सारी कोशिश हैं के ये सुरत बदलनी चाहिये’ या ओळी वापरल्या गेल्या. इतकेच काय, अरविंद केजरीवालसारख्या व्यक्तीनेही ही कविता आपल्या भाषणात अनेकदा वापरली. खरे, खोटे, सगळेच राजकारणी तिच्या जबरदस्त आशयामुळे ती भाषणात वापरतात! अर्थात फक्त भाषणातच! दुष्यंतकुमार गीतकार नव्हते, मनस्वी, क्रांतिकवी होते. तरीही त्यांच्या कविता सिनेमात गेल्या, टीव्ही मालिकात गेल्या. डॉ. कुमार विश्वास तर त्यांच्या कवितांनी इतके प्रभावित होते की, त्यांना महाकवी म्हणत. त्यांनी ‘ए.बी.पी. न्यूज’वर ‘महाकवी’ याच नावाने त्यांच्यावर एक विशेष कार्यक्रम दोन भागांत सादर केला होता.
‘इरादा’(२०१७) या सिनेमात हरितक्रांतीमुळे पर्यावरणावर झालेले अतिघातक परिणाम, औष्णिक विद्युत प्रकल्पांच्या बेजबाबदार वर्तनामुळे भूजलस्त्रोतात झालेला युरेनियम-संसर्ग, त्याचे दुष्परिणाम, त्यातून पंजाबमध्ये आलेली कर्करोगाची भयानक लाट हा विषय हाताळला होता. सिनेमात अपर्णा सिंग आणि अनुष्का राजन यांनी दुष्यंतजींच्या
“हो गई है पीर पर्वतसी, पिघलनी चाहिये\इस हिमालयसे कोई गंगा निकलनी चाहिये” या कवितेतील ओळी वापरल्या होत्या. अशीच ‘हल्ला बोल’च्या(२००७) दिग्दर्शकांना दुष्यंतजींच्या ‘सायेमे धूप’ या कवितासंग्रहातील “मेरे सीनेमें नहीं तो तेरे सीनेमे सही, हो कहीं भी आग, लेकिन आग जलनी चाहिए.” या क्रांतिकारक ओळी वापरण्याचा मोह आवरता आला नव्हता.
व्यवस्थेविरुद्धच्या लढाईत हातात ‘शस्त्र नसेल तर रस्त्यावरचा दगड घ्या’ असे सांगणारा हा बंडखोर कवी प्रेयसीशी बोलताना किती रोमँटिक होतो पाहा –
“एक जंगल है तेरी आँखोंमें
मैं जहाँ राह भूल जाता हूँ…”
दुष्यंतकुमार यांच्या कवितेतील प्रेमाची अभिव्यक्ती अशी अगदी वेगळी आहे. दुसऱ्या ओळीत ते म्हणतात –
“तू किसी रेलसी गुजरती हैं,
मैं किसी पूलसा थरथराता हूँ…”
आत्मविश्वासू सुंदरी आणि तिचा बुजरा प्रियकर याचे किती चित्रमय वर्णन! नीरज घेवन यांच्या २०१५ साली आलेल्या ‘मसान’चे गीतकार वरुण ग्रोव्हर यांनी दुष्यंतकुमारांच्या वरील ओळी एका गाण्यात घेतल्या तेव्हा त्यांनी ते प्रांजळपणे जाहीर केले होते.
आगळी मनोभूमिका आणि चिंतनशील मूलभूत विचार देणारा हा कवी व्यक्तीपूजेच्या अगदी विरुद्ध होता. एखादा प्रबुद्ध माणूस जेव्हा लोकांना मार्गदर्शन करतो, त्याच्यापासून काही फायदा होतो तेव्हा लोक त्याचा देव करून ठेवतात, त्याची तत्त्वे न पाळता त्याचे भक्त बनून जातात. हे त्यांनी किती कलात्मकपणे सांगितले आहे! रहेनुमा म्हणजे मार्गदर्शक –
“रहनुमाओंकी अदाओंपे फ़िदा हैं दुनिया,
इस बहकती हुई दुनियाको सँभालो, यारों!”
‘कुणाचेही अंधपणे अनुकरण करू नका, कोणत्याही माणसाचा देव करू नका’ हे जवळजवळ ५० वर्षांपूर्वी सांगणारा हा कवी महानच होता. त्यांची एक कविता अत्यंत लोकप्रिय झाली आणि देशभर नेहमी उद्धृत केली जाते. तिचे शब्द होते –
“हो गई हैं पीर पर्वत-सी पिघलनी चाहिए,
इस हिमालयसे कोई गंगा निकलनी चाहिए।”
पीर म्हणजे पिडा. ‘आता डोंगराएवढी झालेली वेदना संपायला हवी. दु:खाच्या पहाडातूनच नदीच्या सुखाचा प्रवाह निघाला पाहिजे.’ असे सांगून ते म्हणतात, “मला तर सर्व मुळातूनच बदलायचे होते, आताशी कुठे या व्यवस्थेच्या भिंती हलू लागल्यात, पण मला पायाच उखडून टाकायचा आहे.”
“आज यह दीवार, परदोंकी तरह हिलने लगी,
शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए।”
कवीचे स्वप्न व्यक्तिगत नाही. सगळा समाज त्यात यायला हवा म्हणून कवी म्हणतो, प्रत्येक रस्त्यावर, गल्लीगल्लीत, गावागावांत मृतवत होऊन पडलेला समाजघटक जागा झाला पाहिजे. विजयपथावर आक्रमण करत निघाला पाहिजे.
हर सड़कपर, हर गलीमें, हर नगर, हर गाँवमें,
हाथ लहराते हुए हर लाश चलनी चाहिए।
कारण माझा हेतू केवळ आरडाओरडा करून काहीतरी दिखावा करणे हा नाहीच. माझी तळमळ यासाठी आहे की जगाचे हे विषम, अन्यायी चित्र अमुलाग्र बदलले पाहिजे.
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं,
सारी कोशिश हैं, ये सूरत बदलनी चाहिए।
मी या लढाईत कमी पडलो, थंडावलो, तर मित्रा तू ही मशाल हातात घे, माझ्यातली आग विझली तर ती तुझ्या हृदयात तरी लागू दे! ‘मेरे सीनेमें नहीं तो तेरे सीनेमें सही,
हो कहीं भी आग,
लेकिन आग जलनी चाहिए।’
यासाठी दुष्यंतजी दुसऱ्या कवितेत म्हणतात, आपली नाव जरी जर्जर आहे तरी लाटांशी टक्कर देण्याची हिंमत तिच्यात आहेच. फार काही नसले तरी क्रांतीचा लख्ख उजेड पडेपर्यंत टिकेल, अशी तेलात भिजलेली एक वात आणि पणती आहे. फक्त एक ठिणगी आणा म्हणजे सकाळ होईपर्यंत जळू शकणारा दिवा तरी पेटवू या –
इस नदीकी धारमें ठंडी हवा आती तो हैं,
नाव जर्जर ही सही, लहरोंसे टकराती तो हैं।
एक चिनगारी कहीसे ढूँढ लाओ दोस्तों,
इस दिएमें तेलसे भीगी हुई बाती तो हैं।
भोपाळच्या ‘स्मार्ट सिटी प्रोजेक्ट’अंतर्गत स्व. दुष्यंतकुमार यांचे घर २०१७ साली पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. सिटी स्मार्ट होणार असेल, तर कवीच्या घरांचा काय उपयोग ना? जिथे देशच स्मार्ट होण्याच्या गडबडीत आहे तिथे कवीच्या घराची काळजी कुणाला असणार?
तरीही असा एक काळ होता की, या कवीने असंख्य युवकांच्या हृदयात घर केले होते ती आठवण ठेवायला काय हरकत आहे? म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!