गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी
शीख धर्माचे पहिले गुरू, संस्थापक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरुनानकांची जयंती कार्तिक पूर्णिमेला साजरी केली जाते. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी शीख आणि सिंधी लोकांचा अतिशय महत्त्वाचा पवित्र सण म्हणजे ‘गुरुनानक जयंती’! या दिवसाला ‘प्रकाश उत्सव’ तसेच ‘गुरुपर्व’, ‘गुरुपुरब’ असेही संबोधले जाते. याचा अर्थ ‘गुरूचा उत्सव!’ श्री गुरुनानक देवजींना आदरांजली वाहण्यासाठी, आशीर्वादासाठी, प्रार्थनेसाठी भक्त गुरुद्वारामध्ये जातात, नाहीतर घरी अखंड पठण करतात. मुख्यतः या दिवशी नानकजींच्या विचारांचे स्मरण करणे.
गुरुपूरबच्या दिवशी पहाटे अमृतवेळी भजन-कथा-कीर्तनानी कार्यक्रमांना सुरुवात होते. पवित्र ‘ग्रंथ गुरुसाहिब’ कापडाच्या चादरीने, फुलांनी सुशोभित करतात. हजारो भक्त या उत्सवात सामील होतात. देशाच्या विविध भागांतून प्रभातफेरी निघते. मिरवणुकीत ढाल-तलवारीचा स्टंट केला जातो. परेडमध्ये धार्मिक संगीत वाजविण्यासाठी स्थानिक बँड असतो. गुरुपूरब उत्सवाचा महत्त्वाचा भाग ‘फूड फेस्टिव्हल’. ‘लंगर भोजनात’ मानवतेच्या हेतूने, स्वतःच्या हातांनी लोक सर्व जाती-जमातींच्या लोकांना तिथे अन्न वाढतात. संध्याकाळी पुन्हा प्रार्थना, मध्यरात्री गुरू ग्रंथसाहिबमधील विशेष प्रार्थना म्हणून नानकजींचा जन्मोत्सव साजरा करतात.
गुरुनानकांचा जन्म १४६९मध्ये पाकिस्तानच्या पंजाबमधील तळवंडी गावी कार्तिक पौर्णिमेला हिंदू कुटुंबात झाला. आई तृप्तादेवी, वडील कालू खत्री यांचा एकुलता एक मुलगा नानक! आजही हे गाव पाकिस्तानात आहे. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धी असलेला नानकांचा वेळ अभ्यासासोबत आध्यात्मिक चिंतन व सत्संग यांत जात असे. गुरुनानकांच्या चमत्कारसहित बालपणातील काही घटना –
१. पुराणमतवादाविरुद्ध संघर्ष करीत वयाच्या ११व्या वर्षी दिलेले जानवे घातले नाही.
२. वडील व्यापारी, मुलगा नानक धान्य विकायचे सोडून गोरगरिबांना वाटून टाकत.
३. मेंढपाळांचे काम करताना नानकजी ध्यानांत मग्न! चरायला सोडलेले प्राणी दुसऱ्यांच्या शेतातील पीक खात. गावाचे प्रमुख पीक पाहायला येताच सारे पीक सुरळीत दिसायचे.
४. एकदा नदीत आंघोळीला गेले असता समाधी अवस्थेतच वाहून गेले. तीन दिवसांनंतर बाहेर आल्यावर, ‘कोणीही हिंदू नाही, कोणीही मुस्लीम नाही.सर्वजण मानव आहाेत’. असे सांगू लागले. देवाला सारे समान. तो निराकार आहे. देवापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांनी देवाचे नामस्मरण करावे.
१८व्या वर्षी नानकजींचा विवाह झाला. त्यांना दोन पुत्र होते. तरी त्यांचे मन परमार्थाकडे धाव घेत होते. नानकजींचा आवाज मधुर होता, संगीताचे ज्ञान होते. निसर्गाशी एकरूप होऊन ईश्वरभक्तीने ओथंबलेली स्वरचित भजने ऐकण्यासाठी ठिकठिकाणांहून लोक येत. नानकजींना पर्शियन, पंजाबी, सिंधी, अरबी भाषा येत होत्या.त्याच काळात परकीय भारत देश लुटताना, धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा, कर्मकांड पसरवत होते. अशा वेळी नानकजींनी लोकांमध्ये आध्यत्मिक चेतना जागृत करून समाजाला सुस्थित आणण्याचे काम केले.
ज्ञानप्राप्तीनंतर नानकजींनी आपली उद्दिष्ट्ये, तत्त्वे सांगण्यासाठी ३०व्या वर्षीच घर सोडले. चार सहकाऱ्यांसोबत आयुष्यातील चोवीस वर्षे दूरवर फिरले. आध्यत्मिक जीवनाच्या प्रवासात अनेक ठिकाणी मुक्काम केला. जातीभेद, कर्मकांड, मूर्तिपूजा या कुप्रथेला कडाडून विरोध केला.
१. एकदा प्रवासात मक्का येथे विश्रांतीसाठी झाडाखाली झोपले. नानकजींचे पाय मुस्लीम धर्माच्या पवित्र स्थानाच्या दिशेला होते. लोकांनी जाणीव करून देताच नानकजी म्हणाले, मी अतिशय दमलो आहे तुम्हीच माझे पाय वळवा. लोकांनी ज्या दिशेला पाय वळवले तेथे ते पवित्र स्थान दिसे. तेव्हा गुरुनानकजी म्हणाले, ‘ईश्वर एक आहे आणि चराचरात त्याचे वास्तव्य आहे’.
२. धर्मावर चर्चा चालू असताना गुरू नानकजी सुल्तानपूरच्या नवाबासोबत मशिदीत नमाजासाठी गेले. नवाब नानकजींना म्हणाले, आपण तर नमाज अदा केला नाहीत. नानक म्हणाले, ‘माफ करा, माझे मन माझ्या स्वामींकडे होते.’ नवाब खजील होऊन म्हणाले, खरे आहे. आम्ही देवाकडे काहीतरी मागण्यासाठी येतो. नानकजी, तुम्ही फक्त देवासाठी इथे येता.’ त्यावर नानकजी म्हणाले, ‘आपण सारी एकाच ईश्वराची लेकरे, फक्त नावे वेगळी.’ त्याला प्राप्त करण्यासाठी एकाग्रतेची गरज असते.
३. मुघलसम्राट बाबरच्या सैनिकांनी वास्तव्यास आलेल्या नानकांना कारागृहात कैद करताच ती अंधारी खोली नानकांच्या तेजांनी उजळून निघाली. ही बातमी सम्राट बाबरला समजताच ते स्वतः तेथे आले. नतमस्तक होत क्षमा मागितली. तेव्हा गुरुनानक म्हणाले, ‘दीनदुबळ्यांना टाचेखाली मारण्यापेक्षा गरिबांची सेवा करा नि रयतेची मने जिंका.’
गुरुनानकांनी हिंदू, मुस्लीम दोन्ही धर्मांतील चांगले ते निवडून लोकांना शिकवताना काही लोक शिकू लागले. यावरून शीख शब्द झाला. शीख शब्दाचा अर्थ शिकणारा! १६व्या शतकांत गुरुनानक यांनी शीख धर्माची स्थापना पंजाबमध्ये केली.
शीख धर्माचे तत्त्वज्ञान –
१. शीख हे एकेश्वरवादी आहेत. ते देवाला ‘वाहे गुरू’ म्हणतात. धार्मिक कार्य करण्यापेक्षा ते चांगले कृत्य करण्याला प्राधान्य देतात.
२. ‘गुरू ग्रंथ साहिब’ हा शिखांचा पवित्र धर्मग्रंथ आहे.
३. ‘नाम जपो’ (नामस्मरण करा), ‘विरत करो’ (इनामदारीने मेहनत करा), ‘वड छेको’ (अन्न वाटून खा).
४. पाच ‘क’कार – केस कापू नये, कंगवा, स्टीलचे कडे, कच्छा. (लांब सुटी विजार), कृपण (एक छोटे शस्त्र).
५. आपला कर्ता-धर्ता आणि पिता सारे काही परमेश्वरच आहे.
६. मानवतेत कोणतीही स्त्री, पुरुष व्यक्ती गुरुग्रंथसाहिबचे पठण, प्रवचन, कीर्तन करू शकते.
प्रत्येक गुरुद्वाराच्या बाहेर शीख ध्वज ‘निशान साहिब’ फडकत असतो. हा ध्वज शीख धर्माचे प्रतीक, जीवन जगण्याचा मूलभूत अधिकार घोषित करतो. निशाण साहिब हे त्यागाचे प्रतीक असलेल्या भगव्या रंगाचा कॉटन किंवा रेशमी कापडाचा त्रिकोणी ध्वज असून त्यावर असलेल्या चिन्हाला ‘खांदा’ म्हणतात. मध्यभागी खंडा, त्याभोवती असलेले चक्र, सैन्याचे (प्रतीक) चिन्ह, त्याच्या बाहेरील बाजूस मिरी, पिरी या वक्राकार ऐहिक आणि आध्यत्मिक शक्तीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन तलवारी.
शीख धर्मात दहा गुरू. सर्वांनी सर्वस्वाचा त्याग केला. गुरू गोविंद सिंह हे कर्मयोगी होते. त्यांनी नांदेड येथे स्वतःनंतर ‘गुरू ग्रंथ साहिब’या ग्रंथाला कायमचे गुरूपद दिले. ‘गुरुनानक यांनी पाया रचला आणि गुरू गोविंद सिंह यांनी कळस चढविला.’ आयुष्याच्या अखेरच्या काळांत नानकजींची ख्याती मोठ्या प्रमाणात वाढली. शेवटच्या काळात कुटुंबीय व अनुयायींसोबत, पाकिस्तानात राहिले. आपला पट्टशिष्य भाई लहाना याचे ‘अंगद’ असे नामकरण करून त्यांना उत्तराधिकारी केले. २२ सप्टेंबर १५३९ रोजी निधन झाले. देवाच्या भक्तीने मानवतेला उन्नत करणारे, मानवतावादी महापुरुष गुरुनानक यांना माझे नमन…!