ऐकलंत का!: दीपक परब
सध्याचे २०२३ हे वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. वर्षाचा शेवट अनेक जण पार्टी करून, ट्रीपला जाऊन करतात. पण तुम्हाला जर वर्षाचा शेवट मनोरंजनात्मक करायचा असेल, तर तुम्ही काही मराठी चित्रपट पाहू शकता. डिसेंबर महिन्यामध्ये ‘लंडन मिसळ’, ‘बाजिंद’, ‘एकदा येऊन तर बघा’ असे काही मजेदार मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
त्यापैकी ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला रिलीज होणार आहे. भरत जाधव, ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, गौरव मोरे आणि माधुरी पवार या कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या दोन बहिणींची गोष्ट या चित्रपटात दाखविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भारतात तसेच लंडनमध्ये या चित्रपटाचे शूटिंग झालेले आहे.
तर दुसरा चित्रपट ‘बाजिंद’ही ८ डिसेंबर रोजीच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात पूजा बिरारी आणि हंसराज जगताप हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हंसराज आणि पूजा या नव्या कोऱ्या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री ‘बाजिंद’ या चित्रपटात बघायला मिळणार आहे. शर्वणी पिल्लई, सिद्धेश्वर झाडबुके, अनिल नगरकर, माधुरी पवार, उषा नाईक, प्रेमा किरण, ओंकार भोसले, प्रियंका राठोड या कलाकारांनी देखील या चित्रपटात काम केले आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. हा चित्रपट देखील ८ डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, ओंकार भोजने हे कलाकार या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत. तसेच सयाजी शिंदे, भाऊ कदम, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने, सुशील इनामदार या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.