क्राइम: ॲड. रिया करंजकर
प्रॉपर्टी म्हटलं की, तिथे रक्ताच्या नात्यांमध्ये वाद-विवाद आलेच समजा, असा आताच काळ आहे. प्रॉपर्टी, मालमत्तेसाठी लोक आपली जिव्हाळ्याची नाती विसरत चाललेली आहेत. एकमेकांचे हाडाचे वैरी बनत चाललेले आहेत. ही सख्खी भावंडे का? असे या भावंडांकडे बघूनही वाटत आहे.
संजय, मिलिंद व सीमा ही सख्खी तीन भावंडे माहीमसारख्या मुंबईमध्ये लहानाची मोठी झाली व वडील असतानाच या तिन्ही भावंडाची रितीरिवाजाप्रमाणे लग्नंही झाली. प्रत्येकजण आपापल्या संसाराला लागलं. माहीम या ठिकाणी पागडी सिस्टममध्ये या कुटुंबाचे वडिलोपार्जित घर होतं. ते संजय यांचे आजोबा अनंत यांच्या नावावर होतं आणि पागडी सिस्टम म्हटली की, तिथे मालक हा आलाच. अनंत हे गेल्यानंतर संजय याच्या वडिलांनी म्हणजेच प्रभाकर यांनी ते आपल्या नावावर न करता वडिलांच्या नावावर तसंच ठेवलं. स्वतःच्या नावावर करून घेण्यात त्यांनी वेळ घालवला. प्रभाकर यांचे निधन झालं, त्यानंतर आपोआप ती रूम प्रभाकर यांची पत्नी अलका यांच्या ताब्यात आली. आपल्या नावावर करण्याऐवजी अलका यांनी ती दोन मुलांपैकी कुठल्या तरी एका मुलाच्या ताब्यात द्यायची, असा विचार केला आणि संजय, मिलिंद व सीमा यांना विश्वासात घेऊन प्रॉपर्टीचे विभाजन करायचे त्यांनी ठरवले.
सीमा हिला त्यांनी आपले दागिने व रूमच्या हिश्श्यात जेवढे पैसे येतील, तेवढी रक्कम तिला देण्यात आली. म्हणजेच त्या रूममधला मुलीचा हिस्सा त्यांनी दागिने आणि रकमेच्या रूपात सीमाला देऊन टाकला. तसं त्यांनी प्रतिज्ञापत्र बनवून घेतलं होतं व मिलिंद या दोन नंबर मुलाला त्यांनी प्रभादेवी येथील एक घर व संजय या मोठ्या मुलाला त्यांनी माहीमचा रूम जो वडिलोपार्जित आहे, तो देण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे त्यांनी पेपर, मृत्युपत्र सर्व काही बनवून ठेवलं. त्यामध्ये त्यांचा दोन नंबर मुलगा मिलिंदने स्वतः एनओसीचे पेपरही बनवले.
मुलीला आपण अगोदर दिलेलं आहे, त्यामुळे तिच्या सहीची गरज भासणार नाही, असा विचार त्यांनी केला व संजय याला माहीमच्या रूमचे पेपर बनवून ते पागडी सिस्टमच्या असलेल्या मालकाला देण्यास सांगितले. त्यावेळी मालकाने “मी तुझ्या नावावर करण्यासाठी अमुक एक रक्कम घेईल, असं संजयला सांगितलं.” त्यावेळी संजय यांनी लीगल पद्धतीने सल्ला घेऊन त्याला सांगितलं की, “ही माझ्या वडिलांची रूम आहे आणि ती त्यांच्या वडिलांची म्हणजे माझ्या आजोबांची रूम असून, ती वडिलोपार्जित माझ्याकडे आलेली आहे, तसेच मी या घराच्या ब्लड रिलेशनमध्ये येत असल्याने माझ्याकडून कोणत्याही प्रकारची रक्कम न घेता तुम्ही कायद्याचा विचार करून ती व्यवस्थित ट्रान्स्फर करून द्यावी.”
तो पागडी सिस्टम जी आहे त्याचा तो मालक होता, तोच आता डेव्हलपर बनला होता आणि ती चाळ तो स्वतः डेव्हलप करणार होता, म्हणून आपलेच रूम आपल्या ताब्यात कसे येतील, याचा तो विचार करत होता आणि संजय याला थोडं बिल्डर लॉबीतील ज्ञान असल्यामुळे हा आपल्या प्रत्येक ठिकाणी आडवा येत आहे, असा विचार हा मालक कम बिल्डर करत होता. संजयने दिलेले पेपर बघून त्याच्या लक्षात आलं की, इथे संजय याच्या बहिणीची सही नाही म्हणून त्याने बहिणीचा नंबर घेऊन तिच्याशी संपर्क साधला व तिला सांगितलं की, “संजयने सादर केलेल्या पेपरमध्ये तुझी सही नाही.”
हे समजताच सीमा हिने आपल्या आईचं घर म्हणजे आईची प्रभादेवीला राहत होती आणि जो रूम संजय याचा दुसरा भाऊ मिलिंद याला मिळालेला होता. त्या ठिकाणी ती गेली आणि तिने सरळ सांगितलं की, “माहीमचा रूम आहे त्याच्यात मला हिस्सा पाहिजे.” आई हिने स्पष्ट सांगितली, “मी जिवंत आहे आणि मला अधिकार आहे की, कुठल्या मुलाला काय द्यायचं त्याप्रमाणे रूमच्या अर्ध्या किमतीची रक्कम मी तुला अगोदरच दिलेली आहे आणि एवढेच नाही, तर तुला दागिने दिलेले आहेत त्याच्यामुळे माहीमच्या रूममध्ये तुझा काहीही अधिकार नाही.” माहीमचा रूम आता डेव्हलपरकडे चालला होता आणि प्रभादेवीचा रूम अगोदरच तयार झालेला होता. त्यामुळे साहजिक मिलिंदच्या नावावर तो होणार होता. तरी सीमा बोलायला लागली की, “त्या दोघांना एक एक रूम मला काय? मला पण रूम पाहिजे.” तेव्हा संजय तिला बोलला की, “दोनच रूम आहेत एक मला आणि एक मिलिंदला मिळाला आणि एका रूमच्या अर्धा हिस्सा हा आम्ही तुला दिलेला आहे.” त्यावर ती म्हणाली की, “मला अर्धा हिस्सा नको, तुम्हाला रूमच्या किमतीएवढे पैसे पाहिजेत.” यावर आई अलका म्हणाल्या, “आम्ही तुला रूमची अर्धी किंमत दिलेली आहे आणि एवढेच नाही, तर त्याच्या दुप्पट दागिनेही तुला दिलेले आहेत म्हणजे तुला एका घराची रक्कम पूर्ण मिळालेली आहे.”
तरीही सीमा ऐकायला तयार नव्हती कारण, तिला समजलेलं होतं की, माहीममधली रूम डेव्हलपला गेल्यानंतर त्याची किंमत दुप्पट वाढणार आहे. त्यामुळे सीमा आपल्याला मिळालेली रक्कम ही सध्याच्या रूम रेटप्रमाणे मिळालेली आहे व जी रूम अजून अस्तित्वात आलेली नाही, त्या रूमची अर्धी रक्कम मागत होती. “मला जर रक्कम मिळाली नाही, तर मी कुठेही सह्या करणार नाही”, अशी धमकी ती आपली आई आणि भावांना देऊ लागली होती.
अलका तिला म्हणाली की, “तुला अगोदरच आम्ही दिलेला आहे आणि त्याच्यावर तू सही केलेली आहेस की, मला एवढी रक्कम आणि दागिने मिळालेले आहेत.” तर सीमा बोलू लागली “बिल्डरला जी एनओसीची सही पाहिजे ती मी देणार नाही त्यासाठी मला तुझी माहीममध्ये रूम होणार आहे त्याची अर्धी रक्कम देण्यात यावी.” पण अलका हिने अस्तित्वात असलेल्या आत्ताच्या रूमप्रमाणे तिची किंमत मुलीला दिलेली होती. पण बिल्डरने तिला भडकवल्यामुळे ती भविष्यात होणाऱ्या व जी अजून अस्तित्वातच आली नाही, त्या रूमची किंमत मागू लागली होती. म्हणजे पागडी सिस्टममध्ये मालकाने संजयकडे रक्कम मागितली होती, रूम नावावर करण्यासाठी. संजयने ब्लड रिलेशन दाखवून मी रक्कम देण्यासाठी कायदेशीर बांधिल नाही, ती आपोआप ट्रान्सफर झाली पाहिजे, असं मालकाला सांगितल्यावर त्याने आपलं डोकं लावून त्या पेपरचा अभ्यास करून त्यावर बहिणीची सही नाही, हे हेरलं आणि बहिणीला कॉन्टॅक्ट करून भावंडांमध्ये भांडण लावून देण्याचं काम या चाळमालकाने केलं.
सीमा हिने आपला हिस्सा अगोदरच घेतलेला होता आणि त्याचा उपयोगही तिने केलेला होता. तरीही आपल्या भावाला जास्त काहीतरी भविष्यात मिळणार आणि आपलं नुकसान होतंय हा विचार मनात तिच्या घर करून लागला आणि भविष्यात होणाऱ्या गोष्टीसाठी ती आताच भावासोबत आणि आईसोबत भांडण करत होती. आपला हिसाब मिळूनही ती भावाच्या आयुष्यामध्ये दादागिरी करत होती.(सत्यघटनेवर आधारित)