Thursday, November 7, 2024
Homeसाप्ताहिककोलाज२४ x ६० x ६० = ८६४००!

२४ x ६० x ६० = ८६४००!

संवाद: गुरुनाथ तेंडुलकर

तुझ्या लहानपणी एका कीर्तनात मी एक कथा ऐकली होती. द्युतात राज्य आणि सर्व संपत्ती गमावलेले पाच पांडव द्रौपदीसह वनवासात निघून गेले. तिथे एक साधीशी झोपडी बांधून राहू लागले. आठवडाभर उलटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण त्यांच्या भेटीसाठी आले. सर्वप्रथम ते युधिष्ठिराला भेटले. तो एका दगडावर बसून सकाळचं कोवळं ऊन घेत बसल्या बसल्या पेंगत होता. श्रीकृष्णानं युधिष्ठिराला विचारलं, “काय करतो आहेस?”
“आराम करतोय. दुसरं काय करणार?” युधिष्ठिरानं उत्तर दिलं.
श्रीकृष्ण हसून पुढे निघाले. भीमाला भेटले. भीमाने रानातून टोपलीभर फळं आणली होती. तो बसून खात होता.
“काय भीमा, काय करतोस दिवसभर?” श्रीकृष्णानी विचारलं.
“काय करणार? खातो आणि झोपतो. आता ही टोपली संपवणार आणि झाडाखाली मस्तपैकी ताणून देणार.”

श्रीकृष्णांनी अर्जुनाची भेट घेतली. तो एका तळ्याच्या काठावर बसून दगड तळ्यात भिरकावत बसला होता.
श्रीकृष्णानं त्यालाही तोच प्रश्न विचारला, “काय करतोस दिवसभर?”
“काय करणार? भरपूर मोकळा वेळ मिळालाय. आराम करतोय. माशांना दगड मारतोय.”
नकुल, सहदेव दोघांनी तर रंगीबेरंगी दगड जमवून आपापसांत सारीपाट मांडला होता.
श्रीकृष्णांना आश्चर्य वाटलं. “हे काय तुम्ही दोघं द्यूत खेळताय? हस्तिनापुरात द्यूत खेळूनही तुमची हौस अद्याप भागली नाही का?”
ते दोघंजण थोडे खजील झाले आणि द्यूत थांबवून श्रीकृष्णाला म्हणाले, “दुसरं करण्यासारखं काय आहे आमच्याकडे? शस्त्र नाहीत. अस्त्रं नाहीत. भरपूर मोकळा वेळ आहे. करायचं काय या वेळाचं तेच कळत नाही.”

भगवान श्रीकृष्ण हसले आणि द्रौपदीकडे गेले. ती देखील उगचच इकडून तिकडे फिरत काहीतरी गुणगुणत होती. एकंदरीत काय तर पाचही पांडव आणि दौपदी चक्क आराम करत होते. आजच्या भाषेत सांगायचं तर टाइमपास करत होते. आता मात्र श्रीकृष्ण थोडे गंभीर झाले. त्यांनी सर्वांना एकत्र बोलावून त्यांची कानउघाडणी केली आणि म्हणाले, “वनवासात येऊन आठवडा उलटला नाही, तर तुम्ही असे सुस्तावल्यासारखे झाला आहात. बसून बसून वेळेचा अपव्यय करता आहात. हे योग्य नाही. तुम्ही माझ्याबरोबर चला. तुम्हाला मी इंद्रदेवाकडे घेऊन जातो. तिथे तुम्ही काहीतरी नवीन काम शिका.”

“आता काय शिकायचं आहे? हस्तिनापुरात सगळं शिक्षण झालंय आमचं.” सर्व पांडव एकमुखानं उत्तरले. “अजून बरंच काही शिकायचं आहे तुम्हाला. इंद्रलोकात गेल्यानंतर हा धर्मराज पूजापाठ शिकेल. मंत्रोच्चार आणि धार्मिक कार्य करण्यासाठी पौरोहित्य कसं करायचं ते शिकेल. भीम पाककला शिकेल. निरनिराळे चविष्ट पदार्थ बनवायला शिकेल. अर्जुन मृदंगवादन आणि नृत्य शिकेल, नकुल सहदेव अश्वविद्या शिकतील. घोड्यांची निगा राखणं, सारथ्य करणं शिकतील आणि द्रौपदी तू… तू घरकाम शिकून घे, एखाद्या राजकन्येचा श्रृंगार कसा करायचा, तिची करमणूक कशी करायची. तिची मर्जी राखून तिला आनंदात कसं ठेवायचं हे मानसशास्त्र शिक.” श्रीकृष्णांनी अधिकारवाणीनं सुनावलं.
“पण… पण श्रीकृष्णा, आम्ही तर राजघराण्यातील आहोत. ही असली हलकी कामं आम्ही का शिकावी?” पांडवांनी नाराजीनं विचारलं.

“वेळ आली की समजेल. आता कोणताही प्रश्न न विचारता ताबडतोब माझ्यासोबत चला.” श्रीकृष्ण दटावणीच्या सुरात म्हणाले. पांडवांचा नाईलाज झाला. पण श्रीकृष्णाची आज्ञा मोडणं त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे ते काहीशा नाखुशीनंच श्रीकृष्णासोबत इंद्रलोकात गेले. तिथे श्रीकृष्णाने अगोदरच त्यांची राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था करून ठेवली होती.

पुढे… पुढे १२ वर्षांचा वनवास संपवून १ वर्षाचा अज्ञातवासाचा कालखंड सुरू होण्याआधी भगवान श्रीकृष्ण पुन्हा पांडवांच्या भेटीला आले आणि इंद्रलोकातून ते त्यांना थेट विराट राजाच्या राज्याबाहेर आणून सोडलं. तिथे त्या सहाही जणांनी वेषांतर केलं. थोरल्या युधिष्ठिराने मंत्रपठण करणाऱ्या दशग्रंथी ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि नाव धारण केलं कंकाचार्य. भीमाने बल्लव नावाच्या आचार्याचं सोंग घेतलं. अर्जुन बृहन्नाडा नावाचा नर्तक बनला. नकुल आणि सहदेवांनी अनुक्रमे घोड्याची निगा राखणाऱ्याचं आणि अश्वरथाच्या सारथ्याची रूपं धारण केली… द्रौपदीनं स्वतः एक गरिबाघरच्या निराधार बाईचं सोंग घेतलं आणि विराटराजाच्या राणीच्या दासीचं काम करायला सज्ज झाली. पुरतं एक वर्ष त्या सर्वजणांनी अज्ञातवासात घालवलं. त्यावेळी राजवाड्यातील किंवा राजदरबारातील कुणालाही “हे लोक नेमके कोण आहेत.” याची शंकादेखील आली नाही.

अज्ञातवास संपवून पुन्हा हस्तिनापूर परतताना मात्र द्रौपदीसह सर्व पांडवांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर अक्षरशः लोटांगण घातलं आणि गहिवरून म्हणाले, “बंधू, आम्ही चुकलो… बारा वर्षांपूर्वी, वनवासात आल्यानंतर मिळालेला मोकळा वेळ, जो आम्ही आराम करण्यात वाया घालवणार होतो त्याला तू योग्य वळण लावलंस म्हणून आज आम्ही अज्ञातवासातून सहीसलामत बाहेर पडू शकलो…”

गेल्या आठवड्यात एका कॉलेजमध्ये मला “टाइम मॅनेजमेंट” म्हणजे “वेळेचं व्यवस्थापन” या विषयावर व्याख्यानासाठी बोलावलं होतं. त्या व्याख्यानाची तयारी करण्याच्या निमित्तानं ही गोष्ट मला आठवली. आज आपण आपल्या आजूबाजूच्या सर्वसामान्य माणसांकडे नजर टाकली, तर काय चित्र दिसतं ते जरा डोळसपणे पाहूया. लोकल रेल्वेतून, बसमधून प्रवास करणाऱ्या माणसांपैकी ज्यांना बसायला जागा मिळाली असते, असे नव्वद टक्के प्रवासी मोबाइलवर काही ना काही तरी पाहात असतात. बहुतेक वेळा हे सर्वजण व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा इन्स्टावर असतात. एक-एक मिनिटांचे चटकदार रिल्स पाहात स्वतःची सवंग करमणूक करतात. काहीजण चॅटिंग करतात, तर काहीजण एकाकडून आलेले व्हीडिओ अनेकांना पाठवून “शहाणे करून सोडावे सकळजन” ही समर्थांची उक्ती आचरणात आणतात.

रेल्वेत आणि बसमध्ये बसलेले तर सोडा, गर्दीत उभे राहिलेले प्रवासी देखील मोबाइलवर “बिझी” असतात. या नादात अनेकदा आपलं उतरण्याचं ठिकाण कधी येऊन गेलं याचं भान न राहिल्यामुळे २-२ स्टेशनं पुढे जातात आणि पुन्हा मागे येतात. अगदी रस्त्यातून चालताना देखील माणसं मान खाली घालून मोबाइलच्या स्क्रीनवर डोळे लावून चालल्यामुळे अपघात झाल्याची उदाहरणं आपण पाहतो.

अनेक गृहिणी तर घरातली कामं बाजूला ठेवून वर्षानुवर्षं रेंगाळणाऱ्या सीरिअल्स बघतात. तिथं रमल्यामुळे जेवणात दोनदा मीठ घातलं जातं, दूध उतू जातं, भाजी करपते. अलीकडे तर काही घरांत जेवणच बनवलं जात नाही. झोमॅटो किंवा स्विगीवरून दररोजचं जेवण वेगवेगळ्या हॉटेलातून मागवलं जातं. घरगुती कलहाच्या आणि कौटुंबिक वादाच्या मालिका पाहून पाहून अनेक स्त्रीयांची मनं संशयाने अथवा विकृतीनं पछाडून त्यांना मानसिक विकार आणि शारीरिक व्याधी जडल्याची उदाहरणं आहेत.

काही पुरुषवर्ग ‘ऑफिस ते घर, व्हाया बीअर बार’ असा प्रवास करून शिणवटा उतरवण्याच्या नावाखाली पैसा आणि आरोग्य दोघांची नासाडी करतात. काहीजण घरी गेल्यानंतर बारमाही चालणारे क्रिकेटचे सामने बघतात. विद्यार्थी वर्ग अभ्यासाव्यतिरिक्त इतर अनेक गोष्टीत मग्न असतात. वेगवेगळे ‘डे’ साजरे करतात. सेल्फी काढून अपलोड करतात. एफबी आणि इन्स्टा तर जणू अभ्यासक्रमातला एक अविभाज्य विषयच असल्यासारखे वागतात. परीक्षेतल्या मार्कांपेक्षा आपल्या पोस्टला किती लाइक्स मिळाले हे त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं. आपलं हे या अशा प्रकारचं वागणं योग्य आहे का?

कुणी म्हणेल की, आपला रिकामा वेळ कुठे आणि कसा खर्च करावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात दखल देण्याचा कुणालाही अधिकार नाही. हा व्यक्तीस्वातंत्र्याचा विषय आहे. हो मान्य… पण करमणुकीच्या नावाखाली आपण आज जे काही करतोय, त्याचा उद्याच्या आयुष्यात थोडा तरी उपयोग होणार आहे का? हा एकच प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारावा.

“मला बरंच काही करायचं आहे पण त्यासाठी वेळच मिळत नाही.” असं म्हणणाऱ्यांनी आपल्या दिवसभरातील प्रत्येक घटनेकडे डोळसपणे पाहून थोडं आत्मपरीक्षण करायला हवं. टीव्हीसमोर बसण्याच्या वेळात कपात करून थोडा व्यायाम, योगासनं, प्राणायाम वगैरे करून आरोग्य सुधारता येऊ शकतं.

फेसबुकवरच्या कधीही न भेटलेल्या मित्रांशी चॅट करून चकाट्या पिटण्याऐवजी करण्यापेक्षा एखाद्या जवळच्या नातेवाइकाला किंवा मित्राला प्रत्यक्ष भेटून किंवा किमान फोन करून संबंध अधिक दृढ करता येऊ शकतात. एखाद्या भाषेतील दररोज ५ नवीन शब्द पाठ केले आणि त्यांचा वाक्यात उपयोग कसा करायचा हे शिकलं, तर ३ वर्षांत ती भाषा बऱ्यापैकी आत्मसात करता येते. दररोज एक श्लोक पाठ केला, तर २ वर्षांत ७०० श्लोकांची भगवद्गीता संपूर्ण पाठ होऊ शकते.

दररोज झोपण्यापूर्वी तासभर आधी मोबाइल स्वीच ऑफ करून पुस्तकाची १०-२० वाचली, तर वर्षभरात २०-२५ पुस्तकं वाचून पूर्ण होतात. असं करता करता पुढच्या १० वर्षांत दोन-अडीचशे पुस्तकांच्या वाचनातून आपण कितीतरी अधिक ज्ञानसमृद्ध होऊ शकतो. टाइमपास न करता वेळेचा नीट उपयोग केला, तर स्वतःचा उत्कर्ष सहज साधता येतो. त्यासाठी आपल्याला मिळालेल्या दररोजच्या नव्या कोऱ्या दिवसांतील २४ तासांतील ८६४००० सेकंदांत नेमकं काय काय करायचं? हे मात्र प्रत्येकाचं प्रत्येकानेच ठरवायला हवं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -