दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडतात, आपण पाहतो आणि विसरून जातो. न्यूटन अगोदर कित्येकजणांनी झाडावरून सफरचंद पडताना पाहिले असेल. मात्र न्यूटनने सफरचंद पडताना पाहिल्यानंतर त्यावर विचार केला. त्या प्रसंगाचा सखोल अभ्यास केला. विविध थिअरीज अभ्यासल्या. त्यातून त्याने शोध लावला तो गुरुत्वाकर्षणाचा. तिची गोष्ट पण अशीच काहीशी. तिच्यासारखे कितीतरी विमानाने प्रवास करत होते. तिचं विमान रद्द झालं हे सुद्धा अनेकांच्या बाबतीत घडलेय. इथे मात्र ती वेगळी ठरली. या रद्द झालेल्या विमानामुळे तिच्या करिअरच्या विमानाने मात्र उंच उडान घेतली. ही आगळीवेगळी गोष्ट आहे, ‘रिफंड मी डॉट इन’च्या आकांक्षा अंशूची.
२००७ मध्ये आकांक्षाने पत्रकार होण्यासाठी दिल्लीला उड्डाण केले. एका वकिलाची मुलगी असल्याने समाजात बदल घडवण्याची तिची इच्छा होती. हा बदल पत्रकारितेच्या माध्यमातून घडवू शकतो, याचा तिला आत्मविश्वास होता म्हणूनच ती उत्तम पत्रकारितेचं शिक्षण घेण्यासाठी दिल्लीत आली. मात्र इथलं वास्तव तिला वेगळंच जाणवलं. आकांक्षा ही वर्णाने सावळी. त्यामुळे माध्यमांमध्ये आपल्याला डावलण्यात येत आहे, याची तिला जाणीव झाली. अशा वर्णधारीत व्यवसायाकडे तिने पाठ फिरवली.
रोंडा बायर्नचं “द सीक्रेट” या पुस्तकावर तिची विशेष श्रद्धा होती. “जेव्हा तुम्हाला खरोखर काहीतरी हवे असते, तेव्हा सर्व विश्व तुम्हाला ते साध्य करण्यात मदत करण्यासाठी कट रचते.” हे त्या पुस्तकाचं सार. हे सार तिच्या जीवनात सुद्धा उतरलं. अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर तिच्या हातात अनेक कॅम्पस प्लेसमेंट्स होत्या. एक महत्त्वाकांक्षी मुलगी असल्याने, ती नेहमीच तिच्या चेकलिस्टशी प्रामाणिक राहिली आहे. तिने बंगळूरु येथील एका छोट्या संस्थेत जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या ६ वर्षांच्या कार्यकाळात तिने संस्थेत ट्रेनी ते एक्झिक्युटिव्हपर्यंत विविध भूमिका बजावल्या.
२०१४ मध्ये तिची बंगळूरुची फ्लाइट रद्द झाली. या मान्यताप्राप्त एअरलाइन्स याबद्दल काहीही करू शकत नाहीत, या विचाराने ती अस्वस्थ झाली. तिला माहीत होते की, अशी घटना घडल्यास युरोपमधील विमान कंपन्या प्रवाशांना भरपाई देतात. पण तिला भारताबद्दल खात्री नव्हती. संशोधनाद्वारे, तिला हे समजले की, भारत देखील हवाई प्रवासी हक्क प्रदान करतो. मात्र सुमारे ९९% लोकसंख्येला हे माहीतच नाही. ते त्यांच्या हक्कांबद्दल अनभिज्ञ आहे. या घटनेने तिला लोकांसाठी काहीतरी करण्याची किंवा लोकांना त्यांचे हक्क सहज मिळू शकतील, असे व्यासपीठ निर्माण करण्याची प्रेरणा दिली.
व्यवसाय सुरू करण्याचा तिचा विचार जबरदस्त होता. मात्र तिने ज्यांच्याशी सल्लामसलत केली, त्यांच्यापैकी बहुतेक लोकांनी योग्य व्यावसायिक पार्श्वभूमी आणि निधी नसताना इतक्या लहान वयात व्यवसायात येण्याची तिची कल्पना नाकारली. परदेशात बसलेले दोन लोक म्हणजे – ‘रिफंड मी डॉट इन ग्रुप’च्या सीईओ इव्ह ब्युचनर आणि सीटीओ श्री जोआकिम हर्टेल यांनी तिला व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहित केले. भारतात, तिने तिच्या भावाशी याबद्दल सल्लामसलत केली आणि त्यानेसुद्धा तिला पाठिंबा दिला. तो म्हणाला, “नवीन गोष्टी करून पाहण्यास घाबरू नकोस. नंतर पश्चाताप करण्यापेक्षा प्रयत्न करणे चांगले आहे.” पुढे तिने तिच्या आधीच्या कंपनीतील तिच्या गुरू आणि तिच्या सीईओशी संपर्क साधला. ज्यांनी तिला प्रेरित केले आणि विश्वास दिला की, ती हे करू शकते. २०१६ मध्ये, तिने भारतातील पहिली-वहिली फ्लाइट नुकसानभरपाई कंपनी, रिफंड मी डॉट इन refundme.inची स्थापना केली. पुरेसा पैसा नाही, टीम नाही, कोणाचा पाठिंबा नाही, नवीन कल्पना, व्यावसायिक पार्श्वभूमी नाही. असं सारं काही नसताना पण, तिने हार मानली नाही आणि ऑफिसची जागा, कंपनी नोंदणी आणि संपूर्ण टीम सेट करण्यात स्वत:ला झोकून दिले. रिफंड मी डॉट इन शून्यातून उभी केली.
“विश्वास महत्त्वाचा आहे.” आकांक्षा म्हणते. तिच्या दृढ विश्वासामुळे आणि समस्यांवर ठोस उपाय शोधण्याच्या इच्छेने तिला संपूर्ण उद्योजकीय प्रवासात प्रेरित केले. तंत्रज्ञानाबद्दलची तिची आवड आणि त्याचा वापर करण्याच्या समजामुळे तिला हे व्यासपीठ तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले. प्रवासादरम्यान, तिने एअरलाइन्स उद्योगातील अनेक त्रुटी आणि हवाई प्रवासी हक्कांच्या सरकारी धोरणांना जवळून पाहिले, अनुभवले. विमानास होणारा विलंब, सामानाची चुकीच्या पद्धतीने हाताळणी, सामान हरवण्याची वारंवार प्रकरणे इत्यादींसाठी कोणतीही भरपाई मिळत नसल्याचे तिच्या नजरेस आले. तिला हे सगळे नीट करायचे होते.
२०१७ मध्ये, तिने सरकारला समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन केले आणि आता ती अभिमानाने सांगते की, सरकारने २०१९ मध्ये एअर पॅसेंजर चार्टर कायद्यामध्ये उड्डाण विलंब आणि हरवलेल्या सामानाची भरपाई समाविष्ट करून सुधारित केले जे लवकरच नियंत्रित केले जाईल. तीन वर्षांनंतर, रिफंड मी डॉट इनने मिस्टर बोई अॅप्लिकेशन लाँच केले आहे. हा एक वैयक्तिक प्रवासी सहाय्यक ऐप् आहे जो सर्व प्रवाशांना आवश्यक असलेला वन स्टॉप सोल्यूशन आहे जसे की – एअरलाइन आणि विमानतळ माहिती, ऑनलाइन कॅब बुक करणे, विलंब अंदाज, जेवण बुकिंग आणि
बरेच काही.
‘रिफंड मी डॉट इन’मुळे आज अगणित विमान प्रवाशांना लाभ होत आहे. एक छोटीशी कल्पना आंतरराष्ट्रीय व्यवसाय उभारू शकते, हे आकांक्षाने सिद्ध केलं आहे तेदेखील स्वत:च्या कर्तृत्वाने, शून्यातून जग उभारत. खरी ‘लेडी बॉस’ अशीच तर असते आकांक्षा अंशू हिच्यासारखी!