कथा : रमेश तांबे
आज कुणाल उशिरा घरी आला. त्याला पाहताच आई म्हणाली, “काय रे कुणाल आज उशीर का झाला. कुठे गेला होतास?” आईचे प्रश्न ऐकून कुणालला अगदी भडभडून आले. चेहरा गंभीर बनला आणि डोळ्यांत आसवांचा पूर. त्याच्या या अवताराकडे आई बघतच बसली. भानावर येऊन आई त्याच्या तोंडावर हात फिरवत म्हणाली, “काय रे काय झालं?” तोच कुणालने आईला मिठी मारली. अन् तो ओक्साबोक्सी रडू लागला. दुःखाचा भर ओसरताच कुणाल बोलू लागला. “आई माझा वर्गमित्र संदीप आजारी आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलाय. तीन दिवस झाले. आज आम्ही मित्रमंडळी त्याला बघून आलो. संदीपचे बाबा अपंग आहेत, त्यामुळे ते घरीच असतात अन् आई कुठल्याशा ऑफिसमध्ये काम करते. त्याची आर्थिक परिस्थिती तेवढी बरी नाही असे दिसते. ऑपरेशनसाठी तीन लाखांची गरज आहे. आता काय करायचं. आई संदीपचं ऑपरेशन कसं होणार? तो बरा होईल ना. अगं तो माझ्याच शेजारी बसतो. त्याचं इंग्रजी खूप चांगले आहे. तोच मला इंग्रजी शिकवतो. आज जे काही मला इंग्रजी येतं ते त्याच्याचमुळे!” कुणालच्या या नव्या अवताराकडे त्याची आई बघतच राहिली. कारण कुणाल तसा कोणामध्ये गुंतणारा मुलगा नव्हता. आपण भले आणि आपली मजा भली! याशिवाय त्याला काही दिसत नव्हतं. त्यामुळे कुणालचं मित्रासाठी रडणं, त्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करणं. ही गोष्ट आईसाठी नवीनच होती. आपल्या मुलाचं मन इतकं संवेदनशील आहे, तो दुसऱ्यांचा एवढा विचार करतो याचाच तिला आनंद वाटला आणि अभिमानही! तेव्हा आई काहीच बोलली नाही. दोन-चार दिवसांत आई संदीपचं प्रकरण विसरून गेली.
आठवडाभराचा वेळ निघून गेला. संदीपचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं. ३ लाख १५ हजारांचा खर्च झाला. महिनाभरात संदीप बरा होऊन शाळेत येऊ लागला. इकडे कुणालचं मन त्याला खाऊ लागलं. आपली आई चांगल्या कंपनीत काम करते. बाबांचा छोटासा पण चांगला चालणारा व्यवसाय आहे. तरीही त्यांनी संदीपला मदत का केली नाही? याचा त्याला रागही आला होता आणि वाईटही वाटले होते. आपण मित्रांनी मिळून पैसे दिले. पण आई-बाबांनी माहीत असूनही एकही रुपया दिला नाही याबद्दल त्याच्या मनात राग धुमसत होता.
एके दिवशी सायंकाळी ६ वाजता हॉलमध्ये आई-बाबा गप्पा मारत बसले होते. तितक्यात कुणाल त्यांच्यासमोर उभा राहिला आणि आई-बाबांना ताडताड बोलू लागला. माझा मित्र आजारी असतानादेखील आई-बाबा तुम्ही त्याला मदत का केली नाही? आम्ही छोट्यांनी मदत केली, पण तुम्ही काहीच नाही. मला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं अन् तुमचा रागही आला आहे. आई-बाबा दोघेही कुणालचं बोलणं मान खाली घालून निमूूटपणे ऐकत होते. कुणाल बराच वेळ बोलत होता. मित्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, समाजाचं देणं वगैरे वगैरे! त्याचे विचार, त्याची प्रगल्भता बघून आई-बाबांचा चेहरा समाधानाने फुलून गेला होता. दोघेही अश्रू भरल्या नजरेने कुणालकडे बघत होते. कुणालला कळेना हे दोघे असे का बघतात? मी त्यांना नको नको ते बोलतो आहे आणि ते मात्र गप्प!
तितक्यात दरवाजावरची बेल वाजली. बघतो तर काय संदीप आणि त्याची आई हजर! कुणालला जरा आश्चर्यच वाटलं. “अरे संदीप तू? इकडे कसा काय?” त्याच्या हातात पेढ्यांचा बॉक्स होता. तो झटकन पुढे आला आणि कुणालच्या आई-बाबांच्या पाया पडला. कुणालच्या आईने त्याला मिठीत घेतले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, “कसा आहेस बाळ” तितक्यात संदीपची आई बाबांना म्हणाली, “तुम्ही होतात म्हणून संदीपचं ऑपरेशन होऊ शकलं.” कुणालला काहीच कळेना. तो अवाक होऊन सारे बघत होता. ऐकत होता. मग संदीपच कुणालच्या हातात हात घेऊन म्हणाला, “कुणाल तुझे आई-बाबा म्हणजे देवमाणसं आहेत. महान आहेत. त्यांनी पैसे भरले नसते, तर आज माझे उपचार झाले नसते आणि मीही दिसलो नसतो. तुझ्याच बाबांनी संपूर्ण बिल भरले आहे! खरंच देवमाणसं आहेत ती!” संदीप बोलत असताना त्याची आई आपले डोळे पुसत होती. तिचा चेहरा कृतज्ञतेने भरून गेला होता. संदीपचे बोलणे पुरे होते न होते तोच कुणालाने आई-बाबांना मिठी मारली आणि म्हणाला, “मला तुमचा खूप अभिमान वाटतो.” आई-बाबा दोघेही कुणालची पाठ थोपटत म्हणाले, “अरे वेड्या तुझ्या मित्रासाठी आपण मदत करणार नाही असे का वाटले तुला! तू जर दुसऱ्यासाठी एवढा जीव टाकतोस, तर आम्हाला हे करावेच लागणार होते. ते आमचे कर्तव्यच आहे!”