तारेवरची कसरत

Share

ओंजळ: पल्लवी अष्टेकर

प्रसिद्धीच्या वलयापासून दूर, समाजासाठी चांगले कार्य करू इच्छिणाऱ्या काही व्यक्ती आपण आपल्या सभोवताली पाहत असतो. काही वेळा या व्यक्तींचे आयुष्य म्हणजे तारेवरची कसरत असते; परंतु त्याची त्यांना खंत वाटत नाही. यातल्याच एक म्हणजे मंदाकिनीताई भट. आयुष्याला झुंज देण्याची या व्यक्तींची क्षमता खरंच वेगळी असते. त्यासाठी उसने अवसान आणण्याची गरज त्यांना भासत नाही, त्यांच्या स्वभावातील प्रामाणिकपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या उभारणीत स्वतःला झोकून देणारे वासुदेव विष्णू भट या समाजसेवकाची मुलगी – म्हणजे मंदाकिनीताई भट. त्या एकूण पाच बहिणी व एक भाऊ ग्रंथालय क्षेत्रात कार्यरत. त्या १९६३ मध्ये एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्या, १९६५ मध्ये त्यांनी ग्रंथालयशास्त्राचा कोर्स केला आणि १९६६ पासून बारा वर्षे गिरगावातील शारदा सदन शाळेत ग्रंथपाल म्हणून नोकरी केली.“वाचन हे क्षेत्र ज्ञानसमृद्धीने भरलेले आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी लहानपणापासून स्वत:ला वाचनाची सवय लावावी,” असे त्या म्हणतात. त्यानंतर त्या दादरच्या बालमोहन विद्यामंदिर येथे १९७८ पासून लेखनिक म्हणून नोकरी करून २००२ मध्ये सेवानिवृत्त झाल्या.

१९७० मध्ये त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग घडला. त्या विवाहबद्ध झाल्या; परंतु अनेक वाईट प्रसंगांना सामोरे जात, वर्षभरातच त्या माहेरी परतल्या. आई-वडिलांनी प्रेमानं परत त्यांना स्वीकारलं. शाळेत अर्धवेळ नोकरी करत असल्याने, दुसरा काहीतरी अर्थाजनासाठी व्यवसाय करणं मंदाकिनीताईंना आवश्यक होतं. त्यांचं अक्षर चांगलं सुवाच्च होतं, त्याचा फायदा घेऊन लेखकांच्या लिखाणाची मुद्रण प्रत तयार करून द्यावी असं ठरवलं. प्रथम निराशाच पदरी पडली; परंतु त्यांचा जिद्दी स्वभाव, चिकाटी, संयम, आत्मविश्वास त्यांच्या कामी आला आणि कामाला सुरुवात केली. मंदाकिनीताईंना पहिले काम सन १९७४ एप्रिलमध्ये मिळालं. त्या काळातले मानधन म्हणजे, त्यावेळी एका फुलस्केप पानाला लिहिण्याचा मेहनताना मिळायचा पंचवीस पैसे. पहिलं काम मिळाले सहाशे पृष्ठांचे. त्याचे १५० रुपये मिळाले. त्यावेळी झालेला आनंद त्यांना अजूनही आठवतोय. तो अवर्णनीय होता. त्यांच्या कष्टाचे फळ त्यांना हळूहळू मिळत होते.
१९७४ पासून २००० पर्यंत मंदाकिनीताईंनी जवळजवळ २५० मान्यवर, नवोदित लेखक, नाट्यसंस्था, सिनेसंस्था, प्रकाशन संस्था, शाळा, क्लासेस, सहली काढणाऱ्या ट्रॅव्हल्स यांचे सर्वांचे मिळून पाच ते सहा लाख पृष्ठांचे लेखन केले. त्याच्या जोडीला छपाई व्यवसाय, मुद्रित शोधत असे अनेक उपक्रमही केले. अशी सर्व कामे करून थोडी आर्थिक स्थिरता आली. १९७६मध्ये त्या एसएनडीटीच्या बी.ए. सुद्धा झाल्या.

अकरावीनंतर १२ वर्षांचा कालावधी मधे गेला होता. पण जिद्द असेल, तर मार्ग सापडतोच ना? त्यांच्या आवडीच्या एकेक क्षेत्रात मंदाकिनीताई पारंगत होत होत्या. या सर्व गोष्टी करत असताना मराठी वृत्तपत्र संघ, आर्य महिला समाज, सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, आयुर्वेद विज्ञान मंडळ, सावरकर राष्ट्रीय स्मारक, अशा जवळजवळ १५/२० संस्थांमध्ये सहभाग घेऊन त्या कार्य करीत होत्या. त्यावेळी काही दिवाळी अंकांचेही काम केले. लेख लिहिले. अशावेळी अनेक पुरस्कार, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रं त्यांना प्राप्त झाली. १९६५ ते २००२ पर्यंतचा काळ पुढे सरकत होता. अनेक अडचणी आल्या, तसेच आनंदाचे क्षणही उपभोगले. केलेल्या मेहनतीचे चीज होत होते. प्रकृती साथ देत होती. मंदाकिनीताईंचा आय़ुष्याकडे असणारा नेहमी सकारात्मक दृष्टिकोन यासाठी कारणीभूत तर होताच, शिवाय १९८० पासून त्यांचे योगासने, प्राणायाम, बराचसा चालत प्रवास हे त्यांच्या निरोगी आयुष्याचे फलित होते. बालमोहन शाळेत कै. दादासाहेब रेगे यांच्या आशीर्वादामुळे २६ वर्षे त्यांनी पूर्ण वेळ नोकरी केली. नोकरी, व्यवसाय, समाजसेवा, घराच्या कामात मदत अशी तारेवरची कसरत करावी लागत होती. पण मंदाकिनीताईंना त्यात आनंद मिळत होता.

सर्व मान्यवरांचे लेखन करता करता त्यांना खूप वाचायला मिळाले. लेखन कसं करायचं हे समजायला लागले. मनात विचार आला की त्यांनी स्वत: ही लिहायला पाहिजे, आपले विचार प्रकट करता आले पाहिजेत. समाजासाठी काम करता – करता वेगवेगळे सामाजिक दृष्टिकोनही समजत होते. त्यातून जीवनाविषयीची प्रगल्भता तर वाढत होतीच. छोटे छोटे लेख त्या लिहीत होत्या. १९८५ पासून इतरांचे लेखनाचे काम मंदाकिनीताईंनी हळूहळू बंद केले आणि त्यांनी स्वतःच ‘लेखक’ बनायचा विचार मनाशी पक्का केला.

१९९९ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाने मंदाकिनीताईंना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ पुस्तक लिहायला प्रवृत्त केले आणि त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले. त्यांच्यासाठी ही निश्चितच समाधानाची गोष्टं होती. अरुण मानकरांच्या आग्रहावरून दुसरे पुस्तक प्रकाशित झाले. त्यांचे हे पुस्तक हस्ताक्षरावर होते. एकूण विविध विषयांवर त्यांची सतरा-अठरा पुस्तके प्रकाशित झाली. त्यासाठी संदर्भ गोळा करणे, आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे, मासिके, कोश यांच्या आधारे ते त्यांच्या शब्दांत लिहून पुस्तकांची निर्मिती केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वडिलांवर कोणी लेखन केलेले त्यांच्या माहितीत नव्हते. ही खंत त्यांच्या मनात बरेच दिवस होती. त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर त्यांच्यावर त्यांनी दोन वर्षांपूर्वी एक छोटेखानी पुस्तक प्रसिद्ध केले – त्याचे नाव आहे. ‘तेजोभास्कर.’ अजूनही तीन-चार पुस्तके लिखाणासाठी हातात हात घालून उभी आहेत, ती प्रकाशित व्हावीत अशी इच्छा आहे. त्या नुकतेच १ डिसेंबरला ऐंशीव्या वर्षात पदार्पण करतील. त्यांचा जीवनाबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन वाखाणण्यासारखा आहे.

सर्वांनाच त्यांनी एक सुंदर, महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे, “भूतकाळ चांगला-वाईट कसाही असला तरी त्यात रममाण होऊ नये. भविष्यकाळातील स्वप्ने रंगवायला गेलो, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करायला हवा. ती पूर्ण होतील याची शाश्वत नसते. त्यामुळे वर्तमानकाळ छान जगण्याचा प्रयत्न केला, तर उगवणारी पहाट सुंदर असेल या भावनेतून जगले पाहिजे”. स्वत: मंदाकिनीताई सुद्धा याच भावनेतून जगतात. “आजच्या समाजकारणाकडे आणि राजकारणाकडे डोळसपणे पाहायला शिकलात, तरच उदयाच आपले भविष्य उज्ज्वल असेल”, असाही संदेश त्यांनी सर्वांना दिला आहे.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

52 minutes ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

1 hour ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

3 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

4 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

4 hours ago