Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीदै. प्रहार साहित्य रत्नचे पहिले मानकरी डॉ.शंकर बोऱ्हाडे यांचे निधन, साहित्य क्षेत्राची...

दै. प्रहार साहित्य रत्नचे पहिले मानकरी डॉ.शंकर बोऱ्हाडे यांचे निधन, साहित्य क्षेत्राची हानी

नाशिक (प्रतिनिधी) – दैनिक प्रहारचे आधारस्तंभ, दैनिक प्रहार नाशिक आवृत्तीच्या प्रथम वर्धापन दिनी राणे प्रकाशन तर्फे साहित्य रत्न म्हणून गौरविलेले अत्यंत प्रगल्भ,व्यासंगी अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले प्रा. डॉ शंकर बोऱ्हाडे यांच्यावर काळाने अचानक झडप घातल्याने उत्तर महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.प्रा. बोऱ्हाडे यांच्या अकाली जाण्याने साहित्य क्षेत्राची प्रचंड हानी तर झालीच, दैनिक प्रहारने एक हितचिंतक, मार्गदर्शक गमावला असून विद्यार्थ्यांचा मित्र प्राध्यापक हरपल्याने विद्यार्थी वर्गाची मोठी हानी झाली आहे.त्यांच्या निधनावर प्राचार्य प्रशांत पाटील, विश्वास ठाकूर यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

डॉ. शंकर बोऱ्हाडे हे गेली ४० वर्षे साहित्य क्षेत्रात सक्रिय असून त्यांचे मरणगाथा (कवितासंग्रह), कडा आणि कंगोरे (व्यक्तिचित्र संग्रह) उजेडा आधीचा काळोख (ललित) देशभक्त शेषराव घाटगे (चरित्र) विडीची गोष्ट (उद्योगाचे चरित्र) शोध डॉ वसंतराव पवारांचा, लोकपरंपरेचे सिन्नर ही संपादित पुस्तके प्रसिद्ध असून त्यांनी सार्वजनिक वाचनालयात विश्वस्त म्हणून काम केले आहे. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांचा सहभाग होता. मराठीचे प्राध्यापक असणारे डॉ.बोऱ्हाडे यांनी साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रात आपले योगदान दिले. गेल्या वर्षी नाशिक मध्ये संपन्न झालेल्या पहिल्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अनेक नव्या साहित्यिकांना घडविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

“समाजातील तळागाळातील जनतेच्या प्रश्नाचा वेध ,शोध घेणारे परिवर्तनवादी लेखक होते.प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपल्या जीवनाची वाटचाल सुरू केली आणि डॉक्टरेट पर्यंतचा अभिमानास्पद प्रवास पूर्ण केला. नाशिक येथे संपन्न झालेल्या 94.व्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या आयोजनात आम्ही एकत्रित काम केले तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे,शाखा जलालपुर शाखेचे अध्यक्ष म्हणून अनेक वैविध्यपूर्ण उपक्रमात त्यांचे मार्गदर्शन होत असे. नाशिक मधील अनेक संस्थांना जोडणारे ते दुवा होते . निरपेक्ष पणें प्रेम करणारा, जिंदादिल सच्चा मित्र आपल्यातून गेला आहे हे दुःखदायक आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली.” – विश्वास ठाकूर, संस्थापक चेअरमन, विश्वास बँक

छगन भुजबळ,मंत्री,अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य.

ज्येष्ठ साहित्यिक व माझे अत्यंत जवळचे स्नेही डॉ. शंकरराव बोऱ्हाडे यांच्या निधनाची बातमी माझ्यासाठी अत्यंत दुःखद व धक्कादायक आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

नाशिकमध्ये झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनात त्यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली, तसेच नाशिकमध्ये झालेल्या शेकोटी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. विडी कामगारांच्या प्रश्नांना देखील त्यांनी साहित्यातून वाचा फोडत त्यांच्या प्रश्नांवर मोठे काम केलं. तब्बल चार दशकांहून अधिक काळ साहित्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. बोऱ्हाडे यांनी सार्वजनिक वाचनालय नाशिक, लोकहितवादी मंडळ नाशिक अशा संस्थांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. आपल्या कामातून त्यांनी नाशिकच्या साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या निधनाने नाशिकच्या साहित्य क्षेत्राचे कधीही न भरून निघणारे नुकसान झालं आहे.

बोऱ्हाडे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो आणि मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -