विशेष : प्रा. प्रशांत पुंडलिक शिरूडे
जगातील सर्वात मोठी आणि महान लोकशाही म्हणून भारताकडे आदराने पाहिले जाते. त्याचे सर्व श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान भारतीयांचेच आहे. मित्रांनो पण जोपर्यंत आपल्याकडे सुशिक्षित आणि सुसंस्कारित मानवधन तयार होत नाही, तोपर्यंत याच संविधानाचा वापर आपल्या सोयीप्रमाणे लावला जाईल. विवेक, त्याग, प्रामाणिकपणा, निष्ठा, विश्वास, प्रेम, जिव्हाळा याने युक्त असे मानवधनच लोकशाहीचा उत्तम उपयोग घडवून आणू शकेल.
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि समाजवाद या मूल्यांची जोपासना करत भारतीय नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार व कर्तव्य ज्या दिवशी मिळाले तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. हा दिवस आपण संविधान दिवस (Constitution Day) म्हणून साजरा करीत आहोत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संध्याकाळी ५ वाजता त्यावेळच्या भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाकडे सुपूर्द केली. या संविधान निर्मितीला सुरुवात जुलै १९४६ पासून झाली. या संविधान निर्मितीच्या समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद व त्यातील मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. तत्पूर्वी ब्रिटिश पंतप्रधान ॲटली यांनी ब्रिटनच्या संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा व स्वतंत्र राज्यघटना निर्मितीच्या हक्काचा कायदा संमत करून घेतला होता. या संविधान निर्मितीच्या समितीत सुरुवातीला ३८९ सभासद होते, पण फाळणीनंतर ते २९९ झाले. ही राज्यघटना तयार करायला २ वर्षं ११ महिने १८ दिवस इतका कालावधी लागला. या भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य म्हणजे ही जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. राज्यघटना बनविताना बाबासाहेबांनी जगातील अनेक देशांच्या राज्यघटनांचा सखोल अभ्यास केला. आपल्या राज्यघटनेमध्ये एकूण ३९५ कलमे असून २२ परिशिष्टे व ८ विभाग आहेत. आपली राज्यघटना ही खरोखर किती परिपक्व आहे? याचे उत्तम उदाहरण म्हणजे, आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांचा काळ लोटला आहे. पण भारतीय लोकशाही दिवसागणिक परिपक्व होताना दिसते. तेच आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये लोकशाहीबद्दल वेगळेच चित्र बघावयास मिळते. यावरूनच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे काय क्षमतेची दूरदृष्टी होती याची कल्पना येते. म्हणूनच खऱ्या अर्थाने त्यांना महामानव का म्हणतात याची प्रचिती येते. दुर्दैवाने म्हणावे लागते की, ब्रिटिशांनी या देशात जात, धर्म, स्त्री, पुरुष या सर्व प्रकारचे भेदाभेद पार करीत सार्वत्रिक शिक्षणाला सुरुवात केली. जर या देशावर इंग्रजांचे राज्य नसते, तर कदाचित भीमराव रामजी आंबेडकर या विद्यार्थ्याला शिक्षणही घेता आले नसते. जेव्हा ते शिकत होते, तेव्हा सार्वजनिक पानवठ्यावर त्यांना पाणीही मिळत नव्हते. त्यांचे वडील त्यावेळी लष्करात सुभेदार पदावर होते तरी सुद्धा राहायची जागा गावकुसाबाहेर होती. पण या महामानवाने आपल्या संपूर्ण देशाला प्रेम, प्रज्ञा, समता, बंधुता व करुणेचाही वारसा दिला, राज्यघटनेचा व हिंदू कोड बिलाचाही वारसा दिला.
संसदेला राज्यघटनेत बदलत्या कालक्रमातील गरजेनुसार राज्यघटनेतील मूलभूत संरचनेला धक्का न लावता बदल करता येतात. राज्यघटनेत काही बदल हे संसदेच्या साध्या बहुमताने करता येतात, तर काही बदल संसदेच्या विशेष बहुमताने करता येतात. तर काही बदल करताना संसदेच्या विशेष बहुमतासोबतच निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या संमतीने करता येतात.याशिवाय जे घटक शिल्लक राहतात, त्यावर कायदे करण्याचा अधिकार केंद्राला असतो.राज्यघटना सर्वसामान्य माणसाने का समजून घ्यावी? जर राज्यघटना आपल्याला समजली, तर एक गोष्ट मी निश्चितपणे सांगू शकतो की, तुमच्यावर कोणीही, कोणत्याही प्रकारचा अन्याय करू शकणार नाही. तुम्हाला सर्व प्रकारच्या अन्यायाला कायदेशीर बळ देणारी ही आपली राज्यघटना आहे. संविधान दिन आपण २६ नोव्हेंबर २०१५ पासून साजरा करण्यास सुरुवात केली. भारत सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५वी जयंती साजरी करत असताना त्यांना एक प्रकारे श्रद्धांजली म्हणून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. या दिवशी बाबासाहेबांनी संविधानाचे कामकाज ठरवून पूर्ण केले. सर्व जाती, धर्म, पंथ, स्त्री, पुरुष कायद्यासमोर समानतेचा संदेश देणारे सगळ्यांना कायद्याचे समान संरक्षण देणारे राज्य कायद्याचे असेल, एखाद्या लहरी व्यक्तीचे किंवा हुकूमशाहीचे नसेल, हे सांगणाऱ्या राज्यघटनेची आठवण करून देणारा हा दिवस.
हा दिवस साजरा करण्यामागे संविधानाबाबत जनजागृती करणे हेही एक महत्त्वाचं कारण आहे, कारण समाजात मोठ्या प्रमाणात संविधानाबाबत अनभिग्यता असल्यामुळेच समाजात अन्याय करणाऱ्यांची व अन्याय सहन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे थांबवायचे असेल, तर राज्यघटना अभ्यासलीच पाहिजे. राजकारणातील अराजकता, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचाराला प्राप्त झालेली सामाजिक मान्यता, रस्त्या-रस्त्यावर होणारे गटा-गटांतील संघर्ष, लहान-सहान कारणांसाठीही होणाऱ्या हत्या, शब्दा-शब्दाने पेटणारे रणकंदन, राजकारण्यांची शिवराळ भाषा, इतिहासाचे विडंबन, राष्ट्रपुरुषांची अवहेलना यामुळे संविधानातील सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय विचार, अभिव्यक्ती, विश्वास यांचे स्वातंत्र्य, दर्जा व संधीची समानता, हे सगळे भासमान वाटतंय. खरंच प्रत्येक व्यक्तीला हे अधिकार मिळाले, तरच संविधान दिन साजरा करण्याचा अधिकार आपल्याला आहे.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…