प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
आपण अधूनमधून सहलीला जातो. शक्यतो आपण सहलीला एकटे जात नाही, तर सोबतीने जातो. कधी सोबतीस आपले कुटुंबीय असतात, तर कधी मित्रपरिवार. नोकरीतले वा ज्या सोसायटीत राहतो तेथील सोबती कधी एखाद्या प्रोफेशनल टूरने आयोजित केलेल्या सहलीसोबतही. क्वचित सगळीच अनोळखी माणसेही असतात. आपल्याला आपल्या माणसांच्या आवडीनिवडी आपल्याला माहीत असतात, स्वभाव माहीत असतात. त्याप्रमाणे झोपायच्या-उठायच्या- जेवायच्या वेळा, आवडीचे खाण्या-पिण्याचे पदार्थ, बोलण्याची-चिडण्याची कारणे माहीत असतात पण जेव्हा अनोळखी माणसांबरोबर आपण सहलीला जातो, तेव्हा पाहिजे तितका आनंद आपण कदाचित घेऊ शकत नाही. दुसऱ्या माणसाच्या पद्धतीने वागणे जमतेच असे नाही. खरं तर अनोळख्या प्रदेशात अनोळख्या माणसांसोबत आपण आनंद निर्मितीसाठी गेलेलो असतो आणि आपल्या दुःखात भरच पडते.
इथे चुकते कोणाचे? कोणाचेच नाही. कोणीही आपला स्वभाव बदलू शकत नाही. त्यामुळे समोरच्याने कसे वागावे, कसा विचार करावा, आपल्याशी कसे वागावे? हे आपण ठरवू शकत नाही. खूपदा आपल्या मनाविरुद्ध आसपास सगळे घडत असते त्यामुळे आपली चिडचिड होते.
चला तर मग आपण यावर उपाय शोधूया. आपण निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर काही ठिकाणे अशी असतात जी आपल्याला पाहायचीच असतात. एक उदाहरण घेऊया की एका ठिकाणी आपण अनेक किलोमीटरचा प्रवास करून पोहोचतो कारण, तेथील सूर्यास्तदर्शन हे अवर्णनीय असते. तिथे पोहोचल्यावर संपूर्ण परिसर निरखल्यावर आवडीच्या जागेवर कॅमेरे, मोबाइल सरसावून बसतो. आतुरतेने वाट पाहत असतो ती सूर्यास्ताची. सूर्यास्त आपल्या मनपसंत चौकटीत बंदिस्त करायचा असतो. आजूबाजूला असंख्य माणसे आपल्यासारखीच दूरवर प्रवास करून तिथे पोहोचलेली असतात. सगळ्यांचे लक्ष त्या सूर्यास्ताच्या क्षणाकडे एकवटलेले असते आणि अशा वेळेस अचानक काळ्या ढगांचे पुंजके समोरून येऊ लागतात आणि त्या ढगांमुळे समोरचे आकाश जवळजवळ काळवंडूनच जाते. सूर्य काय, सूर्याचा एक हलकासा किरणसुद्धा आपल्या दृष्टीस पडू शकत नाही. मग त्या बदलणाऱ्या रंगछटा… आणि आपल्या नजरेसमोर डोंगराआड जाणारा तो सोन्याचा गोळा कुठून दिसणार? जसजसा काळोख वाढू लागतो तसे आपल्याला परतावे लागते.
आपल्याला माहीत असते की यानंतर कधीच आपण हा सूर्यास्त पाहायला या ठिकाणी येऊ शकणार नसतो. आपण मित्र परिवाराच्या फोटोंमधून, यूट्यूबच्या व्हीडिओमधून हा सूर्यास्त पाहिलेला असतो; परंतु आपल्याला तो क्षण प्रत्यक्ष अनुभवायचा असतो, जे आपल्या नशिबात नसते. अशा वेळेस आपण काय करू शकतो? तर आपण काहीच करू शकत नाही. तर हे फक्त एक निसर्गाचे उदाहरण मी तुम्हाला दिले की, आपण निसर्गासमोर कसे हतबल असतो! निसर्ग जे काही घडवेल त्याला सामोरे जातो. वादळ, वारा, पाऊस, गारा, ढगफुटी, डोंगरावरून कोसळणारी दगडं, धुक्यात हरवून गेलेली वाट, जंगलातल्या आगी, अचानक कीटक- पक्षी- प्राण्यांनी केलेले हल्ले या सगळ्यांना सामोरे जात आपली वाट काढतो. निसर्गाला बदलायचा प्रयत्न करत नाही किंवा ते करणेही आपल्या हातात नसते. आपल्यातच काही बदल घडवून आणतो, उपाय शोधतो आणि आपले जगणे चालू ठेवतो. मग हीच गोष्ट माणसांच्या बाबतीत का नसावी बरे?
आपल्याला एखाद्या माणसासोबत रात्र काढायची आहे. तो घोरतो. त्याला कळतही नाही की तो घोरतो. मग आपणच कापसाचे गोळे कानात टाकून स्कार्फ बांधून झोपायचे. एखादा माणूस जास्त बोलत असेल, तर त्याच्यापासून थोडेसे पुढे मागे चालत मार्गक्रमण करायचे. छोटे-छोटे उपाय करत आलेल्या प्रसंगांना तोंड द्यायचे. ज्या सहलीसाठी, ज्या कारणास्तव आपण आलेलो आहोत त्याचा आनंद आपल्या परीने घेत राहायचा.
आता तुम्ही म्हणाल हे लिहिणे सोपे आहे, पण अनुभवणे कठीण आहे खरेच आहे. खरंच आहे… म्हणून अजून एक छोटेसे उदाहरण देते.
आपल्या राहत्या घरात बत्तीसाव्या मजल्यावर जर एक साप सरपटत आलेला आणि तो आपल्या बेडच्या आत शिरताना आपण पाहिले, तर काय आपण रात्रभर त्या बेडवर शांतपणे झोपू शकतो, नाही ना? आपण घरातल्यांना सावध करतो, त्या खोलीच्या बाहेर जाऊन त्याला बाहेरून कडी लावतो. सर्पमित्रांना बोलवतो. त्या सापाबरोबर घरात आणखी कुठे साप आहे का हे पण त्यांना शोधायला लावतो. म्हणजे खूप काही उपाय करतोच ना? ती गोष्ट आपण सोडून देत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात आलेल्या माणसांच्या स्वभावावर खरोखरी उपचार करता येत नाही. पण जे आहे ते स्वीकारून, त्यांना त्यांचा स्वभाव बदलायला न लावून, आपल्या परीने त्याच्यावर वेगवेगळे उपाय नक्कीच करता येतात. मी हे जे सगळे ढोबळमानाने लिहिले आहे, त्यापेक्षा खूप वेगळे खूप चांगले उपाय तुमच्याकडे पण असतीलच, तेही मला कळवा. ‘पुढच्याच ठेस मागचा शहाणा!’ या उक्तीनुसार सगळ्यांचे वाईटातील वाईट अनुभव घेऊन आपण जर अनोळखी लोकांबरोबर सहलीला गेलो, तर त्यापेक्षा कमी वाईट अनुभव आपल्या वाट्याला आले, तर आपल्याला वाईट वाटणार नाही!
छोट्या गोष्टींसाठी आयुष्यातील मोठे आनंद कोणी हिरावून घेता कामा नये, याची काळजी आपणच घ्यायची असते!