Friday, March 21, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनसारं साठीकाही मराठी…

सारं साठीकाही मराठी…

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील गाजरमळा गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सहशिक्षक या नात्याने सनी गायकवाड यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची सुरुवात झाली. समर्पित वृत्ती, विद्यार्थ्यांविषयी आत्मीयता आणि कार्यतत्परता या गुणांच्या आधारे मुख्याध्यापक पदापर्यंतचा प्रवास त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला. गाजरमळ्याची एकशिक्षकी शाळा एका छोट्याशा वस्तीवर भरत होती. अवघे १२ विद्यार्थी असलेल्या या शाळेचा कायापालट करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. या शाळेकरिता आर्थिक सहकार्य हवे होते, तरच तिचा विकास शक्य होता. ही गरज ओळखून सनी यांनी शाळेसोबत पालकांचे पाठबळ उभे केले.

शाळेत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर आदर्श व स्वच्छसुंदर शाळा म्हणून अवतीभवती तिचे नाव होऊ लागले. ‘शनिवार आमचा, मराठी वाचनाचा’ हा सनी सरांचा उपक्रम यशस्वी ठरला. यानिमित्ताने विविध पुस्तकांशी मुलांची मैत्री झाली. कोरोना काळात मुलांकरिता त्यांनी चालवलेल्या उपक्रमांची दखल प्रसारमाध्यमांनाही घ्यावी लागली. विकासाच्या सर्व प्रकारच्या संधी मुलांना प्राप्त झाल्या पाहिजेत, असे त्यांचे मत होेते. शाळेच्या माध्यमातून अशा संधी उपलब्ध करून देण्याकरिता सनी सर तत्पर राहिले. ज्ञानार्जनात व ज्ञानाच्या विकासात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यावर त्यांनी भर दिला. गाजरमळ्याचे हेच सनी सर यंदाच्या ‘अशोक चुरी स्मृती आदर्श राज्य शिक्षक’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. मराठी अभ्यासकेंद्राच्या पालक संमेलनात येत्या डिसेंबर महिन्यात हा पुरस्कार देण्यात येणार आहे. ‘जयवंत चुनेकर’ हे मराठीच्या जतन संवर्धनाच्या कामात नेहमी अग्रणी राहिले. मराठी अभ्यासकेंद्राशी त्यांचे नाव नेहमी दृढपणे जोडलेले राहील. त्यांची आठवण जिवंत ठेवणारा ‘प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कार’ केंद्रातर्फे दिला जातो. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता हा पुरस्कार सुजाता पाटील यांना जाहीर झाला आहे.

सृजन विद्या प्रसारक मंडळाच्या संस्थापक सदस्य या नात्याने अलिबागमधील कुरुलमध्ये त्यांनी मराठीतून अध्ययन अध्यापनाचा पाया घातला. शेतकरी, कामकरी, मजुरांच्या मुलांसाठी स्वयंअर्थसहाय्यित मराठी शाळा चालवणे सोपे नव्हते. पण २००४ सालापासून पती प्रसाद पाटील व समविचारी सुहृद यांच्यासोबत हे आव्हान सुजाताताईंनी लीलया पेलले. वर्गाच्या चार भिंतीतील पुस्तकी शिक्षणापलीकडे जाऊन संवेदनशील माणूस घडविणे हे ध्येय मानून त्या आपले कार्य करत राहिल्या.

अलिबाग आणि जवळच्या परिसरात बांधकाम क्षेत्रातील अनेक मजूर आणि कामगार भारताच्या विविध राज्यांतून स्थलांतरित होऊन येतात. या मजुरांच्या मुलांना मराठीतून शिकणे आनंददायी व्हावे म्हणून त्यांची शाळा विशेष परिश्रम घेते. यासंदर्भातील उपक्रमांची व प्रयोगांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे.

गावोगावी आज इंग्रजी शाळांची दुकाने उभी राहिली आहेत. पालकांना भुलवून पैसे उकळण्याचे काम या शाळांमधून सर्रासपणे चालते. पण मराठीतून नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकवण्याकरिता सनी सर व सुजाताताईंसारखी माणसे सखोल परिश्रम घेत आहेत. ज्ञानरचनावादाच्या आधारे मराठीतून शिक्षणाची वाटचाल करत आहेत. समाजही त्यांच्या शाळांचे महत्त्व ओळखून पाठीशी उभा राहत आहे, ही किती मोठी गोष्ट आहे! मराठीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांत घडत असलेल्या छोट्या-छोट्या गोष्टीची दखल घेतली जाणे गरजेचे आहे. मराठीच्या पडझडीपासून मराठीला जपायचे, तर हे प्रयत्न उचलून धरले पाहिजेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -