रवींद्र तांबे
पाण्याचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी व पाणी वाया जावू नये म्हणून पाणीकपात केली जाते. त्याचप्रमाणे पुढे पाणीटंचाई होऊ नये, त्यासाठी पाइपलाइन बदलणे किंवा इतर दुरुस्तीची कामे सुरळीत फार पाडण्यासाठी पाणीकपात करण्यात येते. सध्या पाइपलाइन दुरुस्त केल्यास उद्या पाणीपुरवठा सुरळीतपणे होऊ शकतो. मात्र खबरदारी म्हणून ज्या ठिकाणी नादुरुस्त पाइपलाइन अथवा इतर दुरुस्ती असेल, त्याचे काम योग्यप्रकारे होणे आवश्यक आहे. जेणेकरून पुढे पाणीकपात करण्याची वेळ येणार नाही. त्यासाठी पाण्याचा योग्यवेळी योग्य पुरवठा व्हायला हवा. असे जरी असले तरी पावसाळ्यातील पावसाचा अंदाज घेता राज्यात पुरेसा पाऊस लागलेला नाही. तेव्हा आतापासून पाणीकपात करावी लागेल. म्हणजे नागरिक पाण्याचा जपून वापर करतील. त्यामुळे पाणी जपून वापरण्याची सवय राज्यातील नागरिकांना होईल.
पावसाळा सुरू असतानासुद्धा काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जाण्याची वेळ आल्याने पाणीपुरवठा विभागाला पाणीकपात करावी लागली होती. आता तर मुंबई महानगरपालिकेच्या आदेशानुसार मुंबईत २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दुरुस्तीचे काम हाती घेतल्यामुळे दहा टक्के पाणीकपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे, असे असले तरी याची जास्त झळ चाळीत अथवा झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना बसते. तेव्हा पाणी जपून वापरले पाहिजे. त्याचप्रमाणे उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करायला हवा. त्यासाठी पाण्याचा साठा करून ठेवला पाहिजे, असे जरी असले तरी चार बाय चारच्या खोलीत राहणाऱ्या नागरिकांना जागेच्या पायी पाण्याचा साठा करून ठेवणे कठीण होते. अशावेळी बऱ्याच ठिकाणी दरवाजाच्या बाहेरील बाजूला प्लास्टिकचा ड्रम पाणी भरून ठेवला जातो. जवळजवळ १३ दिवस चालणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुळे नंतर पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यात आला तरी केवळ मुंबईतील नागरिकच नव्हे; तर राज्यातील नागरिकांना सुद्धा पाण्याची कपात करावी लागेल. कारण यावर्षी पुरेसा पाऊस पडलेला नाही, याचा विचार महाराष्ट्रातील सुजाण नागरिकांनी करणे गरजेचे आहे.
आतापासून टँकरने पाणीपुरवठा काही भागात केला जात आहे. सध्या हिवाळा सुरू असला तरी अजून कडक उन्हाळा बाकी आहे. त्यामुळे नागरिकांची तहान भागविण्यासाठी आतापासून पाणीकपात करावी लागेल. त्यात पावसाळ्यात नद्या, नाले तुडुंब भरले तरी पुरेसा पाऊस न पडल्यामुळे सध्या नदीनाल्यांची पाण्याची पातळी कमी झालेली आहे. काही ठिकाणी नद्या-नाल्यातील पाण्याचा खळखळणारा आवाज बंद पडलेला आहे. तेव्हा राज्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणीकपात आतापासून सरसकट करावी लागेल. तसेच गगनचुंबी इमारतींमध्ये चौवीस तास पाणी सुरू असते. त्यात अनेक ठिकाणी पाण्याची गळतीसुद्धा पहायला मिळते. तेव्हा त्या पाइपलाइनची दुरुस्ती अतिशय महत्त्वाची असते. त्यामुळे अशा सोसायट्यांवर करडी नजर पाणीपुरवठा विभागाची असली पाहिजे. तसेच काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय होताना दिसतो. अशा वेळी शासन स्तरावर निर्बंध घातले पाहिजेत. अन्यथा त्यावर कायदेशीररीत्या कारवाई करणे आवश्यक आहे. जेणेकरून पाण्याचा अनावश्यक वापर होणार नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे, यावर्षी मुळात पावसाचे उशिरा आगमन झाले. ते सुद्धा नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करून टाकले. यात काही निरपराध नागरिकांना आपल्या जीवाला मुकावे लागले. त्यात शेतकरी राजाला दुबार पेरणी करण्याची वेळ आली. मात्र राज्यात पुरेसा पाऊस पडला नाही हे मात्र निश्चित. तेव्हा मुंबईच काय राज्यातील नागरिकांनी सुद्धा आपल्याकडे पाणीकपात आहे, असे गृहीत धरून पाण्याचा वापर काटकसरीने केला पाहिजे. तो सुद्धा योग्य कामासाठी पाण्याचा वापर करावा.
आता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील पाणीपुरवठा विभागाने वेधशाळेचा अंदाज घेऊन पाण्याची आजपासून काटकसर करायला हवी. तशा प्रकारच्या सूचना नागरिकांना दिल्या गेल्या पाहिजेत. जे पाण्याचा गैरवापर करतील, त्यांच्यावर योग्यप्रकारे कायदेशीर दंड आकारला गेला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी पाण्याचा अतिवापर होत असतो. तेव्हा पाणी ही निसर्गाने दिलेली मानवाला विनामूल्य देणगी आहे. तिचा योग्यप्रकारे वापर केला गेला पाहिजे. तेव्हा दुरुस्तीचे कारण पुढे जरी केले तरी हिवाळ्यात पाणीकपात करण्याची वेळ का आली, याचा विचार होणे आवश्यक आहे. यासाठी देखरेख अतिशय महत्त्वाची असते. पाइपलाइनचे वेळच्या वेळी काम करणे गरजेचे आहे. त्यासाठी गस्तीवर तसेच देखभाल करणारा कर्मचारी वर्ग व्यवस्थितपणे काम करतात का? यावर वरिष्ठांचे नियंत्रण असायला हवे म्हणजे सलग तेरा दिवस दहा टक्के पाणीकपात करण्याची वेळ येणार नाही. याचा जास्त फटका सर्वसाधारण जनतेला सहन करावा लागतो.
आता पाण्याचा स्वच्छ आणि सुरळीतपणे पुरवठा होण्यासाठी पाणीकपात करण्यात आली आहे. तेव्हा पाणीकपात केल्याने पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच योग्य कामासाठी पाण्याचा जपून वापर करण्यात यावा. तेव्हा आता जरी मुंबई महानगरपालिकेने दुरुस्तीसाठी मुंबईकरांची पाणीकपात केली तरी यापुढे मुंबईकरांना अधिक दराने पाण्याची तहान भागवावी लागणार आहे.