Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीएकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही

एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही

नवीन आराखडे तयार करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे : प्रशासकीय इमारतीचे आराखडे करतांना आगामी ५० वर्षांचा सर्वांगीण विचार करता एकही शासकीय कार्यालय भाड्याच्या जागेत राहणार नाही यादृष्टीने नवीन इमारतीचे आराखडे तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शहरातील विविध विकासकामांच्या पाहणी दौऱ्यावेळी दिले.

यावेळी सहकार आयुक्त अनिल कवडे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, अपर कामगार आयुक्त शैलेश पोळ आदी उपस्थित होते.

विकास कामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर काळानुरुप गरजेनुसार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विस्तारित इमारत आदी शासकीय इमारतीचे काम नव्याने पूर्ण करण्यात आले आहे. नोंदणी भवन, शिक्षण भवन, कृषी भवन, सहकार भवन, कामगार भवन आदी इमारतींचे काम सुरु आहेत तर काही इमारतींच्या कामांच्या प्रशासकीय व तांत्रिक मान्यताही देण्यात आल्या आहेत.

आगामी काळातही विविध शासकीय इमारती नव्याने बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहेत. प्रशासकीय इमारतीचे आराखडे तयार करताना संबंधित विभाग प्रमुखाला विश्वासात घेऊनच आराखडे तयार करावेत. आराखड्यात प्रामुख्याने वीज, वाहनतळ, अग्निशमन यंत्रणा या बाबतीत सुरक्षितेच्यादृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करा. यासाठी नामांकित, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांची नेमणूक करावी.

इमारती पूर्ण झाल्यावर देखभाल दुरुस्तीवरचा खर्च कमीत कमी झाला पाहिजे. वाहनतळाचे नियोजन करताना कार्यालयातील मनुष्यबळाबरोबर नागरिकांच्या वाहनाचांही विचार करावा. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचे वारंवार मार्गदर्शन घ्यावे. इमारत पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना समाधान वाटले पाहिजे.

सारथी येथील बैठक सभागृहात ध्वनी प्रणाली व प्रकाश व्यवस्था अत्याधुनिक बसवावी. पुरेसा सुर्यप्रकाश, हवा खेळती राहील याची काळजी घेऊन काम करावे. नूतन कार्यालयाच्या इमारतीचे दरवाजे, खिडक्या मजबूत आणि पुरेशा उंच बनवाव्या. सहकार आयुक्त कार्यालयाच्या इमारतीचा आराखडा पारंपरिक न राहता त्यामध्ये नाविन्यता असली पाहिजे. वाहनतळ जागेचा विचार करता ते दुमजली करा, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

प्रस्तावित कामगार भवन परिसरातील येथील नागरिकांसोबत चर्चा केल्यानंतर ते म्हणाले, कामगार भवन बांधकामाच्यावेळी विरोध करु नये. या कामांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक ते सहकार्य केले जाईल. विकासकामांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील श्री. पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी भांबुर्डा येथील सारथी मुख्यालय, ‘शिक्षण भवन’ वास्तू बांधकाम, शिवाजी नगर येथील प्रस्तावित ‘कृषी भवन’ इमारत, साखर संकुल येथील सहकार आयुक्त कार्यालय आणि वाकडेवाडी येथील ‘कामगार भवन’ इमारतीच्या जागेची पाहणी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -